Yoga Day

    अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ह्यांचे वर्णन आहे.  ह्यांना जर जाणले तर तन आणि मन ह्यांच्या संतुलनाने आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. पण वास्तविकता अशी आहे की एका ठिकाणी आपण शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम, आहार… ह्यांवर लक्ष केंद्रित करून चालत आहोत.  पण रोज नोकरी, धंद्यामध्ये जो ताण-तणाव वाढत आहे त्याला कमी करण्यासाठी ध्यान-धारणा हवी.  त्यासाठी आपण म्हणतो कि ‘ आमच्या कडे वेळ कुठे आहे? ’ मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी रोज सकारात्मक विचार जिथून मिळतील असे लेख, पुस्तके, प्रवचन….  वाचावे किंवा ऐकावे.  मनाला वारंवार प्रशिक्षित करण्यावर लक्ष द्यावे.  जसं डोळ्यामध्ये एक छोटासा कण ही गेला तर बघायला त्रास होतो.  तसेच मनामध्ये एखादा नकारात्मक विचार गेला तर संबंधांमध्ये प्रेमाने वागायला ही त्रास होतो. 

    Meditation आणि Medication ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे.  Mediary  (मेडीअरी) हा एक लॅटिन शब्द आहे.  ज्याचा अर्थ ‘बरे करणे’ आहे.  शरीरावर लागलेले घाव Medication अर्थात औषधोपचाराने ठीक केले जातात.  तसेच मनावर लागलेले घाव Meditation ने ठीक होतात.  योग म्हणजेच स्वतःचा स्वतःशीच संवाद  तसेच ईश्वराशी संवाद.  हा संवाद जर चांगल्या भावनांनी, विचारांनी केला तर मनाचे रोग, चिंता, भय… हे ठीक होऊ शकतात. 

एक व्यापारी नेहमी जहाजाने प्रवास करायचा.  त्या जहाजामध्ये अनेक कारागिर, इंजिनियर्स       असायचे.  एकदा जहाज अचानक बंद पडले.  जहाजावर असलेल्या अनेक इंजिनियर्सनी प्रयत्न केला पण जहाज काही केल्या चालूच होईना. व्यापारी अस्वस्थ झाला. काय करावे काही समजेना. त्या जहाजावर एक वृद्ध इंजिनियर होता.  व्यापाऱ्याला त्याची आठवण आली.   त्याने त्यास विनवणी केली.  तो वृद्ध इंजिनियर काय अडथळा आहे हे बघू लागला.  काही तास तो त्या इंजिनला वेगवेगळ्या तऱ्हेने बघत राहिला.  सगळे त्याला निरखून पाहत होते.  व्यापारी सुद्धा मनातल्या मनात विचार करत होता की हा फक्त बघणार आहे की काही करणार ही आहे?  थोड्या वेळाने तो आपल्या पिशवीतून एक होताडा काढतो आणि इंजिनच्या एका छोटाश्या स्क्रूवर जोरात मारतो आणि खरंच इंजिन काम करू लागते.  सगळे खूप खुश होतात.  काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याकडे तो वृद्ध इंजिनियर १०,००० रु. चे बिल पाठवतो.  ते बिल बघून व्यापाऱ्याला आश्चर्य वाटते आणि राग ही येतो.  तो त्याला विचारतो की ह्या बिलाची रक्कम इतकी कशी ते स्पष्ट करा.  उत्तर मिळते की २ रुपये हातोडी मारण्याचे आणि ९९९८ रुपये कुठे हातोडी मारायची हे समजण्याचे.  तात्पर्य असे कि आज आपण सुद्धा जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड देत आहोत पण नक्की कुठे उपाय करायची आवश्यकता आहे हे समजत नाही.  स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून बाह्य उपाय म्हणजे व्यायाम, आहार, झोप… ह्यासाठी परिश्रम करत आहोत पण ‘मन स्वस्थ तर तन स्वस्थ’ हा formula लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मन स्वस्थ ठेवण्यासाठी रोज ध्यान करण्याची सवय लावावी.   जेणेकरून आपल्या आंतरिक शक्तिंचा विकास करू शकतो.  कोणत्या ही परिस्थिती मध्ये अचूक निर्णय घेऊ शकतो.  ज्यामुळे आपला वेळ, क्षमता…  ह्यांची बचत ही होऊ शकते. 

 

‘गीता’ हे योग शास्त्र मानले जाते. ज्या मध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग…  ह्यांचे वर्णन आहे.   राजयोग हा सर्व योगांचा राजा मानला जातो.  हा योग जर आपण शिकलो तर मनाला कसे प्रशिक्षित करावे ह्याची कला आपल्यामध्ये येईल. ‘ मन जीते जगतजीत ’ म्हंटले जाते.  मनाचा ताबा सुटला तर आपले अमूल्य जीवन विस्कळित होते पण तेच जर आपल्या ऑर्डरप्रमाणे चालवण्याची शक्ती आपल्यात आली तर जीवन श्रेष्ठ बनू शकेल. 

आजच्या ह्या आंतरराष्ट्रिय योग दिवशी आपण शारिरीक स्वास्थाबरोबर मानसिक स्वास्थ निरोगी बनवण्यासाठी संकल्प करू या कि ‘ भले जीवनात किती ही उतार-चढाव आले तरी ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खुश, आनंदी राहून पुढे चालत राहू.’ 

‘ जीवन गाणे गातच राहावे ,   झाले गेले विसरून जावे ,   पुढे-पुढे चालावे ’  

You may also like

21 Comments

  1. whoah this blog is fantastic i love reading your posts. Keep up the great work! You know, many people are searching around for this information, you could help them greatly.