१९१० मध्ये वैज्ञानिकांचा एक ग्रुप उत्तर ध्रुवावर ( north pole ) संशोधनासाठी गेला होता. जहाजामध्ये ३५-४० लोक होती. काही दिवसांचा प्रवास झाल्यानंतर आढळले की कडाक्याची थंडी असल्यामुळे सगळीकडे बर्फ जमा झाला आहे. त्यामध्ये हे जहाज अडकते. कॅप्टन सर्व परिस्थितीला बघून सर्वांना सूचना देतो की हे जहाज पुन्हा मार्गी लागायला ३ महिने लागतील. जहाजावर सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकेल की नाही हे सुद्धा बघितले गेले. सर्व सोयी त्या जहाजावर उपलब्ध होत्या. पण जी लोक जहाजामध्ये होती त्यांना सिगरेटचे व्यसन होते. काही दिवस तर ठीक गेले. जितका सिगरेटचा stock होता तो सुद्धा हळूहळू संपायला लागला. आता मात्र सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा राहिला की ही सिगरेट संपली तर मग आपले काय ? ३ महिने कसे काढायचे ? त्या लोकांनी जहाजावर असलेली वर्तमानपत्रे, कपडे जाळायला सुरुवात केली. त्या धुराने ते आपली सिगरेटची ईच्छा पुरी करू लागले. ही गोष्ट जेंव्हा कॅप्टनच्या कानावर पडते तेंव्हा सर्वांना असे करण्यास नकार देतो. पण ह्या लोकांना इतके व्यसन होते की ते म्हणाले ‘ आम्हाला खायला नाही मिळाले तरी चालेल पण आम्हाला सिगरेट हवीच.’ त्याशिवाय एक दिवस काढणे ही मुश्किल झाले आहे. कॅप्टन ही विचारात पडतो की असे केले तर आपण कसे परत पोहोचणार ? कारण जहाजावरचे दोरखंड सुद्धा जळायला लागले होते.
अश्या सर्व बिकट परिस्थितीतून कसे बाहेर पडले आणि आपल्या स्थानी पोहोचले याचा वृत्तांत त्या कॅप्टनने एका वर्तमानपत्रामध्ये लिहिला होता. ही बातमी अमेरिकेचा एक व्यक्ति स्टुवर्ड पॅरी वाचत होता तो स्वतः chain smoker होता. हा वृत्तांत वाचताना त्याच्या मनात आले की जर मी ह्या जहाजावर असता तर मी सुद्धा असेच केले असते का ? माझी सुद्धा अशीच अवस्था असती ? कारण त्याने कित्येक वेळा हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु यश मिळाले नव्हते. जेव्हा त्याने स्वतःला त्या ठिकाणी बघितले, विचार केला तेव्हा मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्याने ईश्वराला सांगितले की जर तू ह्या जगात आहेस आणि तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मी आज ह्या क्षणी ह्या सिगरेटला सोडतो. पण ज्या वेळी हा विश्वास संपेल तेव्हा हीच सिगरेट पुन्हा माझ्या हातात असेल.
स्टुवर्ड पॅरी हे सांगतात की ३० वर्षे झाली, आजही ती अर्धी सिगरेट त्या ash tray मध्ये आहे. ह्या वर्षांमध्ये कितीतरी प्रसंग आले पण मी त्या सिगरेटला हात लावला नाही. पण हे सर्व कसे घडले ?
मानवी मन अद्भुत शक्तींनी भरले आहे पण कदाचित आपण त्या शक्तींचा वापर करत नाही किंवा त्याचा वापर कसा करावा हे माहित नाही. विचार करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे पण त्या विचारांमध्ये शक्ती असणे महत्वाचे. कोणती ही गोष्ट आपल्यासाठी असंभव नाही. संकल्पामध्ये दृढता असेल, त्या संकल्पाला वास्तवात आणण्याची चिकाटी असेल तर सर्व काही साध्य आहे. एखादा व्यक्ती व्यसनाधीन होतो त्याचे कारण ही त्याचे कमजोर विचार आहेत. संकल्प शक्तिने मनुष्य सर्व काही करू शकतो.
एक शक्तिशाली विचार रोज सकाळी मनात आणा आणि त्या विचाराला दिवसातून अनेकदा आठवण्याचा प्रयत्न करा कारण संकल्प एक शक्ती, ऊर्जा आहे. हे संकल्प सकारात्मक किंवा श्रेष्ठ असतील तर त्याचे बळ मिळते व सर्व काही करण्याची क्षमता तन आणि मन दोघांमध्ये वाढते. पण हेच विचार जर नकारात्मक असतील तर तन-मन दोघांची शक्ती क्षीण होते. संकल्पांचे महत्व समजून त्याचा वापर करावा.
आपल्या संकल्पामध्ये नवजीवन देण्याची क्षमता आहे. जसे एका रोपट्याला काही दिवस पाणी दिले नाही तर ते मलूल होऊन जाते. पण जर पाणी मिळाले तर ते पुन्हा टवटवीत होते त्याचप्रमाणे व्यर्थ, अनावश्यक आणि नकारात्मक विचार आपल्या स्थितीला मलूल, उदास बनवतात. पण समर्थ विचारांनी मन भारून टाकले तर नवचेतना जीवनामध्ये जागृत होते. विचारांचे टॉनिक रोज स्वतःला द्या. शरीरावर जसे औषधोपचार केले जातात तेंव्हा आजारापासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे स्वतःला शक्तिशाली विचारांचे टॉनिक, इंजेक्शन दिल्याने मन सुद्धा रोगमुक्त होऊ शकेल. म्हणूनच चांगले विचार मनात घोळवत राहण्याची सवय लावावी. म्हणतात ना ‘ अच्छा सोचनेमें क्या जाता हैं ?’ खरंच, चांगले, श्रेष्ठ विचार करायला काय हरकत आहे ? ह्याच संकल्पांची शक्ती आपल्या जीवनात कशी जादू घडवून आणते, ते बघा.
विचार करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. पण त्या विचारांना अचूक दिशा द्या. मग भले जीवनामध्ये कितीही उतार-चढाव आले तरी त्या मार्गाने पुढे जाण्याचे बळ मिळेल. जे साध्य करण्याची स्वप्ने आपण रंगवली ते सर्व काही वास्तविक रूपात बदलताना दिसून येईल. असंभव असे काहीच नाही हे जाणवू लागेल.