विचारांचा उपवास

मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आधुनिक युगामध्ये प्रगती करणारा मानव अनेकानेक सुख-सुविधांनी स्वतः ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण स्वतः ला सर्वोपरी भरपूर होण्याची इच्छा बाळगतो, ह्या इच्छांचा कुठे ही अंत नाही.  एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म गेले. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या अशी इच्छा असते. ईश्वराने त्या  पूर्ण कराव्या ह्या अट्टाहासापोटी आपण उपवास करत राहतो .  कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार तर कधी आणि  काही ———-  खरंच असे उपवास करून आपल्या ह्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का ?

 

उपवास म्हणजे काय ? तो कोणत्या प्रकारचा असावा हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी परंपरागत चालत आल्या या त्याचा आपण अंगीकार केला . आज ही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्य पदार्थ तसेच पेय ह्यांचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशीन आहे त्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. जसं पिठाच्या गिरणीला सुद्धा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवले जाते त्याचप्रमाणे आपल्या पोटाला सुद्धा एक दिवस विश्रांती मिळावी ह्या हेतूने उपवास केला जायचा जेणे करून ह्या शरीररूपी मशीनचं ऑइलिंग (oiling) आणि क्लीनिंग (clining) होऊ शकेल.

 

मनोविज्ञानामध्ये सांगितले जाते की जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले तर ती गोष्ट वृद्धीस पावते. ज्याला आपण संकल्पशक्ति असे सुद्धा म्हणू शकतो.  आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली तर हे प्रकर्षाने जाणून येते की हे मन काही क्षणासाठी सुद्धा स्थिर राहत नाही. मनाच्या एकाग्रतेची कमी असल्याचे दिसून येते.  मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात. पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर तसेच जीवनावर ही होतो. जर स्वतः ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

 

प्रत्येक समस्येचे, दुःखाचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. जसे एखादा आजार ठीक करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा आपण वापर करतो पण आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी कडू औषधे तसेच रोजच्या रोज काही नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे दुःखांना, समस्यांना नष्ट करण्यासाठी आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करण्यासाठी विचारांना सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक राहणे हे खूप मोठे आव्हान (challenge) असू शकेल. पण दिवसभरामध्ये फक्त एक तास आपण नियमितपणे मनाला सकारात्मक विचारांनी भरण्याचा प्रयत्न अवश्य करावा. हा तासाभराचा अभ्यास ही मनाला सुखद तसेच शक्तिशाली बनवण्यास मदत करू शकतो.

 

शरीर कार्यरत ठेवण्यासाठी जसं अन्न ग्रहणाच्या दिवसातल्या तीन ते चार वेळा आपण निश्चित करतो. ह्या अन्न पदार्थाद्वारे शरीराला आवश्यक अशी सर्व जीवनसत्वे मिळावी ह्यावर विशेष लक्ष्य दिले जाते. त्याचप्रमाणे मनाला आवश्यक असणारे पवित्र, शक्तिशाली तसेच सुविचारांची सुद्धा वेळ निश्चित करावी जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी.

 

आपल्या विचारांचा शरीरावर खूप मोठा प्रभाव पडतो हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच मनाची तार ईश्वराशी जोडून विचारांची शुद्धी सतत करत राहणे हे आवश्यक आहे. भक्तिमार्गामध्ये उपवास तोच करू शकतो ज्याची ईश्वरावर श्रद्धा तसेच विश्वास आहे. विचारांचा उपवास म्हणजे प्रत्येक विचार स्व-स्मृतीत तसेच ईश्वरस्मृतीमध्ये राहून करणे. थोडक्यात म्हणजे विचारांद्वारे ईश्वराबरोबर केलेला वास म्हणजेच विचारांचा उपवास.

 

जीवनरुपी गाडीचे विचार हे चालक आहेत. ज्या दिशेने हे विचार जातील त्या अनुसार आपले जीवन बनेल. ह्या वस्तुस्थितीला समजणे महत्वपूर्ण आहे. आज आपल्या जीवनामध्ये अपयश, दुःख, निराशा, समस्या असतील तर त्याचे कारण आपले विचारच आहेत. म्हणून प्रत्येक विचारांवर नजर ठेवली तर नक्कीच आपणास सर्व प्राप्ती होऊ लागतील. म्हणूनच म्हटले आहे – ‘ विचार हेच जीवन आहे ’. सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार करणे होय .

 

ओम शान्ति

Continue Reading

खरा दिपोत्सव

लहान असताना सर्वात आवडता सण कोणता ? असे कोणी विचारले की लगेच उत्तर द्यायचो ‘ दिवाळी ’. सर्वात मोठी सुट्टी या सणानिमित्त मिळायची. वेगवेगळे खाद्यपदार्थ, फटाके, नवीन कपडे …….  किती मजा. पण नेहमी हा प्रश्न मनामध्ये यायचा कि फक्त याच सणा आधी घरामध्ये इतकी साफ-सफाई का ? घरातल्या कानाकोपऱ्यातून सफाई , कपाटाचा प्रत्येक खण , घरातले एक-एक भांड ………  साफ केली जायची. पण आज ह्या सर्वांचा अर्थ समजला आहे.

भारत एक सांस्कृति प्रधान देश आहे, जिथे सण-उत्सव साजरे केले जातात.आपल्या केले वेगवान जीवनामध्ये, रोजच्या ताण-ताणावा पासून थोडेसे अलिज होऊन, सर्वांबरोबर आनंद साजरा करावा पण त्याचबरोबर प्रत्येक सणांबरोबर काही पुराणिक कथा जोडल्या जातात त्यांच्या पाठीमागे काही अर्थ आहे

 

दिवाळी हा सण ५ उत्सवांचे स्नेह सम्मेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळी, नवीन वर्ष, भाऊबीज हे पाच उत्सव विभिन्न सांस्कृतिक विचारधारांना घेऊन साजरे केले जातात. जर हा सण आध्यात्मिक  रहस्यांना समजून साजरा केला तर जीवनामध्ये एक वेगळे परिवर्तन आणू शकतो.

 

धनत्रयोदशी :

धनत्रयोदशी अर्थात लक्ष्मी पूजन. वैदिक ऋषिंनी लक्ष्मीला संबोधित करताना श्रीसूक्त गायले आहे. ‘ ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नी धीमहि ,

तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.

याचा अर्थ असा आहे कि महालक्ष्मी जी विष्णुपत्नी आहे, जिचे ध्यान केल्याने माझ्या मन, बुद्धी ला प्रेरणा मिळू दे.

 

लक्ष्मी जी धनाची देवी मानली जाते पण इथे लक्ष्मीचा उपयोग करणारी माणसाची मनोवृत्ती शुद्ध असली तरच त्याचा सदउपयोग होऊ शकतो. विकृत मार्गावर वापरली जाणारी लक्ष्मी अलक्ष्मी मानली जाते. स्वार्थाच्या मार्गावर वापरली तर त्याला वित्त म्हटले जाते. परार्थासाठी वापरली जाणारी लक्ष्मी धनलक्ष्मी समजली जाते आणि प्रभूकार्यासाठी वापरली जाणारी लक्ष्मी महालक्ष्मी समजली जाते. महालक्ष्मी नेहमी हत्तीवर बसून येते असे सांगितले जाते. हत्ती हे उदारतेचे प्रतिक आहे. सांस्कृतिक कार्यामध्ये, प्रभुकार्यामध्ये उदारतेने लक्ष्मीचा वापर केला तर पिढयानपिढया लक्ष्मी त्यांच्याकडे वास करते अशी मान्यता आहे.

 

ईश्वरीय ज्ञानाअनुसार ज्ञानधन आपल्या सर्वांकडे आहे. knowledge is source of income म्हटले जाते. स्थूल आणि सूक्ष्म धन जर आपण ईश्वरीय कार्यामध्ये लावले, त्याचा सदुपयोग केला तर नक्कीच २१ जन्माचे, २१ पीढीचे सुख आपल्याला मिळू शकते. संगमयुगामध्ये  जे काही आपल्याकडे आहे त्याला परमार्थासाठी लावल्याने आपले भविष्य उज्ज्वल होऊ शकते.

 

नरक चतुर्दशी :-

ह्या दिवशी महाकाली ची पूजा केली जाते. परपीडा मध्ये लावलेली शक्ती अशक्ति आहे. स्वार्थासाठी उपयोग केला तर ती शक्ती, रक्षणार्थ लावली तर काली आणि प्रभुकार्यार्थ लावली तर ती महाकाली. तसेच स्वार्थासाठी शक्तींचा उपयोग करणारा दुर्योधन, दुसऱ्यांच्या चरणापाशी शक्ती ठेवणारा कर्ण आणि प्रभुकार्यासाठी शक्तिंचे हवन करणारा अर्जुन – महाभारतामध्ये अश्या तीन पात्रांचा उल्लेख केला जातो.

 

नरक चतुर्दशी ला काल – चतुर्दशी म्हणून ही ओळखले जाते.   प्रागज्योतिषपूर चा राजा नरकासुर आपल्या शक्तिंचा उपयोग दुसऱ्यांना कष्ट देण्यासाठी करायचा. कामवासनेने भरलेला नरकासुर ज्याने १६००० कन्यांना बंदी केले होते. अमावास्येच्या रात्री त्याचा नाश झाला. त्याच्या अत्याचारातून मुक्त झालेल्या लोकांनी दिवे लावून, नवीन कपडे घालून उत्सव साजरा केला, आनंद व्यक्त केला.

 

कलियुगाच्या ह्या अंतामध्ये मनुष्य विकारांनी आणि वासनांनी भरलेला आहे. जो पर्यंत शिवपरमात्म्याद्वारे स्वतः ची ओळख मिळत नाही तो पर्यंत अज्ञानाचा अंधःकार दूर होणार कसा ?

जीवनात खऱ्या सुख-शान्ति चा मार्ग जेव्हा मिळतो ज्ञानाचा प्रकाश जेव्हा मिळतो तेव्हा आपण आपल्यातल्याच असुराला नष्ट करू शकतो. ह्या असुरी वृत्तींचा नाश करणे म्हणजेच खरी नरक चतुर्दशी साजरी करणे होय. ह्या दिवशी विशेष चिरोटे नावाचे फूळ पायाखाली ठेवून फोडले जाते, उटणे लावून अभ्यंग स्नान केले जाते अर्थातच अवगुणांना समूळ नष्ट करून सद्गुणांनी स्वत:ला सुगंधित करण्याचा हा दिवस.

 

दिवाळी :

ह्या दिवशी व्यापारी आपला जुना हिशोब संपवून नवीन हिशोब सुरु करतात. हिशोबाच्या वहीची पूजा केली जाते. आपण ही गत वर्षांमध्ये केलेल्या चुका, राग-द्वेष, ईर्षा-मत्सर  ………  ह्यांना नष्ट करून प्रेम, सदभावनेने ………  नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी स्वतः ला प्रेरित करावे. ह्या दिवशी खास अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घातले जातात. फराळ खाल्ला जातो.

 

 

 

नवीन वर्ष :

नवीन वर्ष ज्याला बलिप्रतिपदा म्हटले जाते. राजा बलि ज्याचा पराभव श्रीकृष्णाने वामन अवतार घेऊन केला. राजा बलि ज्याच्यामध्ये लोभ आणि मोह हा विकार दाखवला जातो. परंतु त्याच बरोबर तो दानवीर सुद्धा दाखवला आहे. कनक आणि कांता ह्यांना बघण्याचा पवित्र दृष्टिकोन सर्वांना दिला. कनक अर्थात लक्ष्मी आणि कांता अर्थात स्त्री जाती. दोन दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

 

भाऊबीज :-

ह्या नंतर भाऊबीज साजरी केली जाते. अर्थात स्त्री-पुरुष ह्यांचे पवित्र नाते, पवित्र दृष्टी रहावी. परमात्म ज्ञान आपल्याला आत्मिक दृष्टी देते. प्रत्येक आत्म्याशी आपला संबंध भाऊ-भाऊ चा आहे. जेव्हा ही दृष्टी कायम होते. तेव्हाच खरी दिपावली आपण साजरी करतो . ह्या  दृष्टीनेच आत्म्याची ज्योती जगते.

 

दिवाळी म्हणजे दिपोत्सव आत्मा ज्योती जागृत करण्याचा हा सण. ज्ञानाचे घृत जेव्हा ह्या दिपकामध्ये पडेल तेव्हाच आत्मज्योति प्रज्ज्वलित होऊ शकते. आत्मज्योति जागृत झाली तर जीवनातील अज्ञानाचा अंधःकार दूर होईल. धनत्रयोदशी धनाचा सद् उपयोग करण्याची प्रेरणा देते. नरक चतुर्दशी  आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता……. ज्यांनी आपले जीवन नर्क बनले आहे अश्या आसुरी वृत्तींना नष्ट करण्याची प्रेरणा देते. दिवाळीच्या दिवशी तमसो मा ज्योतिर्गमय !’ हा मंत्र लक्षात ठेऊन जीवनाचा मार्ग ज्ञानाच्या आधारावर प्रकाशित करण्याची प्रेरणा देते. जीवनाची वही नव्याने बनवून जमा-खर्च ह्याचे ज्ञान समजून प्रभुकार्यामध्ये आपल्या शक्तिंचा वापर करून फक्त जमा करण्याचा ध्यास ठेवण्याची प्रेरणा देते. नवीन वर्ष जुने वैर-विरोध संपवून प्रत्येकासाठी शुभचिंतन, शुभ संकल्प करण्याचा दिवस. भाऊबीज अर्थात प्रत्येक स्त्रीला बघण्याची पवित्र दृष्टी देणारा दिवस. असा वेगवेगळ्या विशेषतांनी भरलेले हे ५ उत्सव जर आपण सद्ज्ञानाने आपल्या जीवनात आणले तर आपले जीवन सुख-समृद्धीने नेहमीच प्रकाशित राहील.

चला तर, आज पासून ज्ञानाचा दिपक आपल्या मनामध्ये लावून सर्वांचे जीवन उज्ज्वल करू या. एका दिपकाने अनेकांच्या जीवनातला अंधःकार समाप्त करू या, हाच खरा दिपोत्सव.

 

Continue Reading

सेल्फी

आजचे युग ‘मोबाईल युग आहे. बाल-वृद्ध, गरीब-साहूकार सर्वजण ह्या मोबाईलच्या आकर्षणामध्ये फसले आहेत. रामायणामध्ये जसे सीतेला सोनेरी हरण मोहीत करून गेले तसेच आज सगळ्यावर ह्या मोबाईलची जादू झाली आहे. काही वर्षांपूर्वी एखादा व्यक्ती एकटाच बोलताना दिसला की लोक त्याला वेडा म्हणायची पण आज ९०% लोक  ह्या मोबाईल मुळे वेडी झालेली दिसून येतात.

आजचा विद्यार्थी वर्ग तर ह्या मोबाईलचा शिकार झाला आहे. एक वेळ अशी होती की मुल-मुली कॉलेज मध्ये गेले की ‘त्यांना पंख फुटले, आता त्यांना सांभाळायची गरज आहे’ असं पालकांना वाटायचे परंतु वर्तमान परिस्थिती अशी आहे की जन्माला मुल आल्यापासून पालकच त्या लहान मुलांना अन्न भरवताना मोबाईलवर cartoon दाखवतात, मोबाईलवर hallo बोलायला शिकवतात. बोलताही येत नसल तरी मोबाईलच्या कितीतरी गोष्टी त्या चिमुरड्याना ही कळतात. काय ह्या मोबाईलची जादू म्हणायची?

Face is the index of mind म्हटले जाते. मनाची अवस्था चेहऱ्याच्या हावभावांनी समजू शकतो. परंतु आजचा मानव दुहेरी भूमिका करण्यात पटाईत झाला आहे. कधी-कधी तर आपले विचार आणि वाणी ह्यामध्ये कुठे ताळमेळ ही नसतो. मनामध्ये नकारात्मक , ईर्षा, घृणा ……. ची भावना ठेवून ही सुंदर हास्य चेहऱ्यावर आणू शकतो. फक्त बाह्यरूप सुंदर-मोहक असणे महत्त्वाचे की गुणांनी सुंदर असणे आवश्यक?

सेल्फी अर्थात स्वतःचा फोटो. तसेच सेल्फ अर्थात मी आणि i.e. अर्थात म्हणजे .selfie अर्थात मी म्हणजे. खरचं स्वतःला विचारुन पहा, मी म्हणजे कोण?मी म्हणजे एखादी व्यक्ती, पद, लिंग, जाती….? हे तर समयानुसार बदलत राहते. लहान मुल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्याकडे न नाव, जाती, पद, धन …… काही पण तर नसत. मग मी म्हणजे? शरीर तर नश्वर आहे. एक वस्त्र आहे, साधन आहे पण त्याला चालवणारी मी एक उर्जा आहे. ज्यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटले आहे. ही चेतना जो पर्यंत शरीरात आहे तो पर्यंत जीवन आहे.चेतना निघून गेली तर त्याला अर्थी म्हटले जाते. अर्थात ज्या शरीराला आता काही अर्थ नाही (deadbody). किती ही सुंदर शरीर असले तरीही आपण त्याला काही तासांसाठी सुद्धा ठेवत नाही. शारिरीक सुंदरता ही अल्पकालिन आहे. म्हणून म्हटले जाते रूपवान पेक्षा गुणवान असणे गरजेचे आहे. मनुष्याची value त्याच्या मधल्या values (गुणांनी) नी होते.

रूपवान बनण्यासाठी कितीतरी beauty parlor आहेत. पण गुणवान बनण्यासाठी काही आहे? आज लहान मुलांना ही beauty parlor किंवा saloon मध्ये घेऊन जातो पण त्याचबरोबर गुणवान बनवण्यासाठी कोणते प्रशिक्षण दिले जाते? हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘आप कितना जीये उसका महत्व नही परंतु आप कैसा जीये उसका महत्व है’

जीवनाच्या अल्बम मध्ये आपण स्वतःच्या कर्मांचे pose बघावे. व्यक्ति परत्वे बदलणाऱ्या आपल्या भावना आणि चेहऱ्यावर आलेले हावभाव ह्यांना न्याहाळावे. काही जण दिवसातून कित्येक वेळा वेगवेगळ्या angle ने फोटो काढतात आणि ते फोटो facebook,WhatsAppवर टाकताना जेणेकरून सर्व परिचित लोकांनी मला बघावे. आपण दिलेली pose किती दिवस त्यांच्या मानस पटलावर राहिल?परंतु मी केलेले कर्म परिचित तसेच अपरिचित लोकांसाठी ही एक संस्मरण बनेल.

आपण सुंदर विचारांनी स्वतःला तसेच आपल्या जीवनाला सुंदर बनवावे. व्यक्तीची ओळख त्याच्या व्यवहाराने, कर्मांनी होते म्हणून महान कार्य करणाऱ्यांना महात्मा म्हटले जाते. आणि जे महान कार्य करतात त्यांना स्वतःची ओळख द्यावी लागत नाही पण लोकच त्यांच्या कार्यांनी त्यांना ओळखतात. अशा व्यक्तींना सेल्फी काढायची गरज लागत नाही पण लोकच त्यांचा फोटो काढतात. स्वतःला त्यांच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करतात अशा महान विभूतींना आपल्या जीवनाचा आदर्श बनवतात.

विचारांना सुंदर बनविण्यासाठी रोज सकाळी स्वतःला फक्त एक सुविचार पक्का करावा. दिवसाची सुरुवात जर सुविचारांनी झाली तर मनाची अवस्था चांगली ठेवण्यास मदत मिळते. आपले बदलणारे mood, आपल्या चेहऱ्याची दशा ही बदलत राहतात म्हणून रोज एखादा सुंदर विचार दिवसभर ‘मंत्र’ पाठ करण्यासारखा रटत रहावा ज्याने त्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होत राहील. उदा. मी खूप सुखी आहे किंवा मी खूप भाग्यवान आहे, मी खूप शांत आहे……… . छोटे-छोटे अभ्यास सतत स्वतःला देत राहिले तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम कालांतराने आपल्याला दिसून येईल.

जसे फोटो काढताना खास आपण smile देतो जेणेकरून मी खुश आहे हे सगळ्यांना कळावे. जर चेहऱ्यावर हसू नसेल तर खास हसण्याचा प्रयत्न करतो पण सुंदर विचार, चांगला mood असेल तर कृत्रिम हास्य आणावे लागत नाही पण तो फोटो natural सुंदर वाटतो. अश्या चेहऱ्याला कोणत्या ही angle ने बघितले तरी तो सुंदरच वाटतो. म्हणून आपण बाह्य गोष्टींवर मेहनत करण्याऐवजी आंतरिक अवस्थेवर मेहनत करावी जेणेकरून कधी स्वतःच्या जीवनाला न्याहाळताना संतुष्टतेचा अनुभव होईल.

चला तर मग आजपासून प्रत्येक क्षणाचा आनंद सुखद विचारांनी घेऊन नैसर्गिक हास्य चेहऱ्यावर आणू या, सत्कर्मांची pose नेहमीच देऊन स्वतःचे selfie काढू या. कधी-कधी रिकाम्या वेळी ह्या selfies ना बघून मनाला सुखद आठवणींनी भरुन टाकू या.

 

Continue Reading

अन्तर्नाद

शहरी रस्त्यांवर वेगाने धावणाऱ्या गाड्या …..सतत वाजणारे त्यांचे भोंगे ……..फेरीवाल्यांचे आवाज ……. आणि स्वतःच्या कानामध्ये वाजणारे pop music …. आवाजाच्या या जगात मनाला शांत करणारी ……. ती शान्ति कुठे मिळणार ? आजच्या या स्पर्धेच्या युगात मनुष्याचे जीवन तणाव, दु:ख, अशान्तिने भरलेले आहे. बाह्यजगात तर आवाज आहेच परंतु आपल्या अंतर्जगाची दशा काही वेगळी नाही. मनुष्य सतत काहीतरी विचार करत असतो पण त्या विचारांची quality कशी आहे ?

परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आजचा मानव स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे पण मार्ग सापडत नाही. वाढती महागाई, बेरोजगारी, प्रत्येक स्तरावर स्पर्धा, आधुनिक साधनांचे आकर्षण ……. ह्यांचे जाळे पसरले आहे. त्याचबरोबर समस्यांचा होणारा नकारात्मक प्रहार मनाला छिन्नविछिन्न करत आहे.

आज आपण स्वतःचाच आवाज ऐकू शकत नाही. ‘मोबाईल’ हे एक असे खेळणे सर्वांना मिळाले आहे की ज्यांना आपण ओळखत ही नाही, सम्पर्क ही नाही अशा व्यक्तींशी बोलण्यामध्ये आपण आपला वेळ, शक्ती खर्च करत आहोत पण तेच स्वतःशी सवांद करण्याची सवय जर जोपासली तर जीवनामध्ये खूप प्रगती आपण करू शकतो.

भारत ही भूमि तपस्वी भूमि मानली जाते. जिथे अनेक ऋषीमुनिंनी तपस्येचा बळावर जीवनाची सत्ये उलगडली तसेच वैद्यानिकांनी एकान्तांचा अनुभव करून अनेक शोध लावले. आयुष्यामध्ये ध्येय गाठायचे असेल किंवा प्रगतीपथावर अग्रेसर व्हायचे असेल तर एकान्त, मौन व स्वसंवाद ह्या तिघांची ही नितांत गरज आहे.

एकान्त :-

मनुष्यांची गर्दी, कामाचा ताण ह्या सर्वांमधून थोडासा वेळ काढून आपण विचारांना शांत करावे. आपले मन समुद्राच्या लाटांसमान आहे. जसे सागर कधी ही शांत नसतो. थोड्या-थोड्या लाटा येतच राहतात त्याप्रमाणे आपल्या विचारांच्या गतीला थोडेसे शिथील करून चांगल्या विचारांनी  मन भरुन टाकावे. विचार हे मनाचे भोजन आहे. जितके सात्विक, शुद्ध विचार आपण निर्माण करू, मन शक्तिशाली बनत जाईल. पण ह्या सर्वांकरिता सर्वांपासून स्वतःला अलिप्त करण्याची सवय लावावी.

पुरातन काळामध्ये तपस्वी ध्यान साधना करण्यासाठी गुफांमध्ये, जंगलामध्ये जाऊन तो एकान्त मिळवायचे पण आज ह्या सर्व गोष्टींची उणीव आजच्या शहरी माणसाला होत आहे. कधी-कधी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्या निरव शांतीचा लाभ घ्यावा.

निसर्गाची विशालता भव्यता पाहून ही जीवनातील काही घटनांकडे उदार होऊन बघण्याची शक्ति मिळते. माफ करण्याची किंवा माफी मागण्याची ही क्षमता त्या एकान्तामध्ये आपल्यामध्ये येते. जीवनाची उजळणी करण्यासाठी तसेच चुकलेले गणित पुन्हा ठीक करण्याची उर्जा आपणास एकान्तामध्ये लाभते.

मौन :-

मौन हा शब्द कधी-कधी आपण न बोलणे असा घेतो परंतु मुखाद्वारे चकार शब्द न काढता ही मन सतत बोलत राहते. एखाद्या व्यक्तींची न आवडणारी गोष्ट पाहून किंवा काही कारणास्तव झालेला वाद ह्यांची नाराजगी व्यक्त करण्याचे साधन म्हणून ही आपण मौन धारण करतो परंतु ज्या व्यक्तीशी बोलचाल बंद करतो त्याच्या बरोबरच मन दिवसभर बोलत राहते. परिणामी मन दुर्बल होते. पण खऱ्या अर्थाने मौन हे मनाला शक्तिशाली करणारे प्रभावी शस्त्र आहे. Thomas kalail म्हणतात, “मौन हा असा घटक आहे की ज्या दरम्यान महान गोष्टी आपोआप आकार धारण करतात.” मुख आणि मन यांना शांत केल्याने आपण अनेक गोष्टींसाठी जागृत होतो. मनावर झालेले आघात, इजा यांच्यावरती मलम लावण्याचे काम मौन करते. काही दिवसांचे मौन जीवनाची अनेकानेक रहस्य उलगडण्यास आपल्याला मदत करते. जसे सागराच्या तळाशी गेल्यावर पाणी शांत व स्वच्छ असते ज्यामुळे प्रत्येक वस्तू स्पष्ट दिसू लागतात, त्याचप्रमाणे एकान्तामध्ये जाऊन मौनचा अभ्यास केल्याने आपण आपले अतित व भविष्य ही स्पष्ट रित्या बघू शकतो.येणाऱ्या परिस्थितीची चाहुल ही आपल्याला मिळू शकते. मौन हे मनासाठी प्रभावशाली औषध आहे.ज्या मध्ये आपण स्वतःचा आवाज स्पष्ट रित्या ऐकू शकतो.

स्वसंवाद :-

जसे कधी-कधी आपण काही गोष्टींचा अनुमान लावत राहतो व जीवनाचा सरळमार्ग ही कठीण करून बसतो. परिस्थितींच्या घेरावात सापडलेला मनुष्य मार्ग शोधण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. एखाद्या समस्येचे समाधान दहा लोकांना विचारून गोंधळून जातो. आज समाजामध्ये प्रत्येक गोष्टींसाठी counsellor आहेत. Health counsellor, educational counsellor ……..पण जो पर्यंत आपण स्वतःशी सवांद साधत नाहीत तो पर्यंत कोणत्याही गोष्टींचे समाधान होऊ शकत नाही. ‘स्व-परिवर्तनाने विश्व परिवर्तन करू शकतो असे म्हटले जाते. चला, विश्वपरिवर्तनाबद्दल विचार न करता फक्त स्वतःच्या जीवनाच्या परिवर्तनासाठी का होईना आपल्याला स्वतःशी सवांद साधून स्वतःला ओळखण्याची, स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. Self-counselling केल्याने आपण आपल्यामध्येच खूप मोठे परिवर्तन आणू शकतो. सर्व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य करू शकतो. एखादा संयमी शिक्षक आपल्या शिष्यांना चांगले जीवन जगण्यासाठी समर्थ बनवतो त्याचप्रमाणे जर आपण स्वतःचेच शिक्षक बनून वेळोवेळी स्वतःला चांगले-वाईटची समज वारंवार देत राहिले तर आपले जीवन प्रेरणादायी बनू शकेल.

जीवनाचे संगीत सूरेल बनवायचे असेल तर एकान्त प्रिय होऊन, मौनाच्या गाभाऱ्यात जाऊन विचारांची तार छेडा, बघा तर मग मनाचे सुमधुर साज तुमच्या कानी पडू लागतील आणि तुमचे अंर्तविश्व आनंदानी बेधुंद होऊन जाईल.

ब्रह्माकुमारीज

www.brahmakumaris.com

 

Continue Reading