कमलपुष्प सम जीवन

     ‘ अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर  आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ’

    अन्न, वस्त्र, निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा, आज त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कष्ट सोसत आहे.  सांसारिक जीवनामध्ये इतके व्यस्त झाले आहोत की स्वतः साठी वेळ काढणे सुद्धा मुश्किल. पण जो खटाटोप केला जात आहे, खरंच त्याने आपले जीवन समाधानी आहे ?  लहानपणी खेचाखेचीचा खेळ खेळायचो. एका व्यक्तीला दोन्ही बाजूंनी खेचले जायचे. पण आज फक्त दोन बाजू नाही पण चार ही दिशेने खेचले जात आहोत. ह्यामध्ये तन आणि मन दोघांची ही झीज होत राहते.  जीवनाचा आनंद घेणे तर दूरच पण आज हे ओझं बनले आहे. 

जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कमळासारखे राहायला शिकायला हवे.  कमळाचे फूल पाण्यावर एकटे दिसत असले तरी त्याचा भला मोठा संसार पाण्याखाली असतो.  ह्या संसारामध्ये खूप गुंतागुंत असली तरी ही आपले सौंदर्य जपणारे हे कमळ फूल. आयुष्यामध्ये अनेकानेक व्यक्ती, प्रसंग, साधने …….  येऊन गेली. त्यांच्याबरोबर राहताना, साधनांचा वापर करताना त्याच्यापासून अलिप्त राहण्याची कला ज्याने आत्मसात केली, तोच खरा गुणवान. म्हणूनच देवी-देवतांच्या प्रत्येक अंगाचे पूजन केले जाते.  तसेच त्यांच्या पवित्र अंगांना कमळपुष्प समान मानले जाते. जसे हस्तकमळ, नाभीकमळ, मुखकमळ, पद्मकमळ…….. पण आज ह्या देवतांच्या प्रतिमा फक्त दर्शनासाठीच राहिल्या आहेत. त्यांच्या रुपाद्वारे जे गुण आत्मसात करायला हवेत त्याकडे मात्र आपले लक्ष्य नाही. 

आज मनुष्य जे काही करतो त्याचे फळ प्राप्त करण्याची वृत्ती सुद्धा बाळगतो.  पण ‘ नेकी कर दर्या में डाल ’ फळाची अपेक्षा ही न ठेवता कर्म करण्याची प्रेरणा ‘ गीता ’ शास्त्रामध्ये वर्णली आहे.  सर्व काही करून अनासक्त वृत्ती ठेवावी. ह्याचेच प्रतीक कमळ हे आहे. मनुष्याच्या सर्व दुःखाचे कारण फक्त दोन शब्द आहेत.  ‘ मी आणि माझं ’ ह्या मध्ये अडकलेला मनुष्य तन, मन धन आणि जन ह्या चार ही गोष्टींनी दुःखी आहे. जे आपल्याला मिळाले किंवा कष्ट करून प्राप्त ही केले तरी कालांतराने त्यांचा नाश होणारच आहे.  किंवा आपल्याला ती वस्तू, व्यक्ती सोडावी लागेल, हा प्रकृतीचा नियम आपण समजून घेतला तर अनासक्त राहू शकतो. हीच अनासक्त वृत्ती आपल्याला परिस्थितींच्या प्रभावापासून मुक्त ठेवते. 

दलदलमध्ये राहून ही त्याच्या प्रभावापासून मुक्त तसेच सूर्याची उपासना करणारे हे फूल आपल्याला कोणत्याही वातावरणामध्ये राहून ही उंच ध्येय साध्य  करण्यास सांगत आहेत. परिस्थिती, व्यक्ती, वातावरण ह्यांना दोष न देता, जीवनाला उन्नत करण्याकडे लक्ष्य ठेवावे. आपल्या प्रगतीचा मार्ग आपणच काढू शकतो.  ध्येयाकडे दृष्टी ठेवून सतत कार्य करत राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये नेहमीच शुभ प्रसंग येत राहतात. ह्याची प्रचिती तर आपणा सर्वांना आहेच. म्हणूनच आपण आपले जीवन कमळपुष्पासारखे जगावे.   

Continue Reading

महाशिवरात्रि

भारत हा एक धार्मिक देश मानला जातो.  इथे अनेक देवी-देवतांच्या प्रतिमांची पूजा-अर्चना केली जाते.  त्या मुर्तींवर जीवापाड प्रेम केले जाते.  असाच एक दिवस ‘महाशिवरात्रि’ चा आहे. शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहून, व्रत-उपवास करून मनोकामना पूर्ण व्हावी, ह्यासाठी आराधना केली जाते. ह्या दिवसाचे नक्की काय महत्व आहे तसेच लिंग रूपामध्ये ‘ शिव ’ ह्याची का पूजा केली जाते ?  अशा अनेक गोष्टींवर आपण प्रकाश टाकू या.

‘ सत्यम,शिवम, सुंदरम ’ असे वर्णन ज्याचे होते,  ज्याचे दर्शन करण्यासाठी गाभाऱ्यामध्ये किंवा उंच पर्वतावर जावे लागते.  असे हे ईश्वराचे लिंग रूप भारतामध्ये अनेकानेक नावाने प्रसिद्ध आहे.  ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ’ म्हणून प्रकाश स्वरूपात असलेल्या ईश्वराला ज्ञानाचा प्रकाश देऊन मार्ग दाखव अशी प्रेमळ विनवणी केली जाते.  हे ज्योती स्वरूप लिंग रूपामध्ये पूजले आहे.  ईश्वर हा देह आणि देहाच्या पदार्थापासून अलिप्त आहे.  जन्म-मृत्यू, सुख-दुःख ……  ह्या चक्रामध्ये न फसणारा ईश्वर, सर्व मनुष्य मात्रला सर्व बंधनातून मुक्त करण्याची शक्ती बाळगतो. अश्या ईश्वराच्या अवतरणाचा हा दिवस म्हणजे ‘ महाशिवरात्रि ’

ही रात्र म्हणजे फक्त एका रात्रीची गोष्ट नाही परंतु वर्तमानात जी वेळ चालू आहे, ज्याला कलियुग म्हटले जाते.  ह्या कलयुगीं रात्रीचे हे प्रतीक आहे.  ह्या कलियुगामध्ये दिवसाढवळ्या ही वाईट कृत्ये केली जात आहेत.  ह्या वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी शिव परमात्म्याचे अवतरण होते.  ह्या आगमनालाच ‘ महाशिवरात्रि ’ म्हणून संबोधले आहे.  मनुष्यानुरूप जन्म न घेता त्यांचा परकाया प्रवेश होतो म्हणून मंदिरामध्ये शिवलिंगाचा प्रवेश मंदिराच्या दरवाजातून न होता वरच्या भागातून (गुंबज) मधून केला जातो.  संपूर्ण मंदिर  बांधून फक्त कळसाचा भाग रिकामा ठेवून तिथून त्यांचा मंदिरामध्ये प्रवेश होतो.  जसे रस्त्यावर उभे राहून आपण कोणत्या ही देवी-देवतांचे दर्शन करू शकतो.  पण शिव मंदिरामध्ये गाभाऱ्याजवळ उभे राहून त्यांचे दर्शन होते.  अर्थात मनाच्या खोल गाभाऱ्यात, विचारांची एकाग्रता जेव्हा होईल तेव्हाच ईश्वराचे दर्शन आपण करू शकतो.

मंदिरामध्ये काही प्रतीकात्मक रूप आपण बघतो जसे नंदी, साप , कासव, त्रिपुंड, कलश …… ह्यांचे अर्थ समजून घेतले तर नक्कीच खरे शिवदर्शन आपण करू शकू.

नंदी:- शिवलिंगाचे दर्शन करण्याआधी नंदीला प्रणाम केला जातो व त्यांच्याद्वारे शिवाचे दर्शन करण्याची प्रथा आहे.  नंदी अर्थात प्रत्येक गोष्टीला हामी भरणारा.  नंदीच्या कानामध्ये काही सांगितले तर ते शिव परमात्म्यापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे.  शिव निराकार ज्योती स्वरूप आहे.  ह्या धरावर  येऊन कार्य करण्यासाठी त्यांना सुद्धा मनुष्य तनाचा  आधार घ्यावा लागतो.  त्या तनाद्वारे ते आपले कार्य करून घेतात म्हणून नंदीचा प्रथम मान आहे.

साप  :-  शिवलिंगाभोवती सापाचा विळखा दाखवला जातो.  साप विषारी प्राणी आहे.  अर्थातच विषय-विकार रुपी सापावर पूर्णपणे अधिपत्य ह्या शिव परमात्म्याचे आहे.  म्हणूनच ह्या विकारांचा त्यांच्यावर काही ही परिणाम होऊ शकत नाही.  हे त्यांच्याद्वारे दाखवले जाते.

त्रिपुंड :-  शिवलिंगावर त्रिपुंड तसेच नेत्र ही दाखवले जाते.  ईश्वर सृष्टीच्या आदि-मध्य-अंत चा ज्ञाता आहे. त्याचबरोबर दिव्यदृष्टिदाता आहे.  आज आपल्याला एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान नसेल तर आपण म्हणतो कि ‘ ईश्वर जाणतो, तो सर्वांना बघतो आहे.’  जे आपण ह्या स्थूल नेत्रांनी बघू शकत नाहीत, ते तो दिव्य नेत्रांनी बघतो.  हा त्याचा भावार्थ आहे.

कासव :-  ईश्वराचे दर्शन मन-बुद्धीच्या एकाग्रतेनेच होऊ शकते.  म्हणूनच गाभाऱ्यामध्ये कासवाला ठेवले जाते.  आपण जाणतो की कासवाला जेव्हा कार्य करायचे असेल, तर तो आपल्या कर्मेंद्रियांना बाहेर काढतो.  कार्य झाले की गपचूप बसून राहतो.  आपल्याला सुद्धा कर्मांचा विस्तार आणि सार ह्यांची समज ठेवायला हवी.  कारण आपण परिस्थितींचा विस्तार सहज करू शकतो पण त्याचे सार समजून, मनाला त्यामध्ये न अडकवता पुढे जाण्याची कला येत नाही.  वारंवार मनामध्ये प्रश्नचिन्हे उभी राहतात.  प्रश्नाच्या जाळ्यामध्ये न अडकता जीवनामध्ये पुढे जायला शिकायचे आहे.  त्यासाठी मनाची एकाग्रता असणे तसेच ईश्वर स्मृतीचा आनंद घेणे हे गरजेचे आहे.

बेलपत्र :-  तीन पानांचे बेलपत्र ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ह्यांचा रचनाकार शिव निराकार आहे, हे त्याचे प्रतीक आहे.  सृष्टीची स्थापना, विनाश आणि पालना करण्याचे कर्तव्य ह्या तीन देवतांद्वारे शिव परमात्मा करतात.

धोतऱ्याचे फुल, तगर  :-  देवी-देवतांच्या मंदिरामध्ये रंगबिरंगी सुवासित फुले आपण बघतो पण शिव  मंदिरामध्ये धोत्रा,तगर ….. ज्यांना रंग आणि गंध ही नाही अशी फुले बघतो.  अर्थातच परमात्मा सर्व आत्मांचा पिता आहे.  वडिलांना आपली मुलं कशी ही असली तरी प्रिय असतात.  तसेच शिव हे आपले पिता आहेत, त्यांना ही आत्म्यामध्ये किती ही विकार, अवगुण असले तरी सर्व प्रिय आहेत ते त्याचे प्रतीक आहे.

कलश :- शिवलिंगावर सतत जल पडत रहावे म्हणून कलश ठेवला जातो.  आपले मन एक कलश प्रमाणे आहे.  विचारांचा एक-एक थेंब हा ईशप्रीतिने भरलेला असावा.  त्याचा स्मृतीचे जल सतत पडत रहावे.  ज्याने आपले जीवन सुख-शांतिने भरपूर व्हावे.  अशी सुंदर संकल्पना ह्या पाठीमागे केली आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष जागरण आणि उपवास केले जातात.  ह्या कलीयुगामध्ये पापाचार, दुराचार, अत्याचार …. वाढत आहे.  अशा वेळी ह्या वाईट वृत्ती आपल्यामध्ये वाढू नयेत म्हणून जागृत राहण्याची गरज आहे.  त्याच बरोबर उपवास अर्थात ह्या दिवशी खास वेळ काढून ईशस्मृतीने मनाचा कलह, क्लेश दूर व्हावा ह्यासाठी थोडे ध्यान करणे.  शरीराचा उपवास तर करतोच पण वाईट विचारांना आज तिलांजली देण्याचा हा दिवस आहे.

चला तर, ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरामध्ये असलेल्या अनेक प्रतिमांचा अर्थ समजून त्यांचे ध्यान करू या.  मनाच्या गाभाऱ्यात जाऊन एकाग्रतेने त्यांचे दर्शन करू या.

Continue Reading

पंचामृत

हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो.  खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात.  त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते.  ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य.  ईश्वराला खूष करण्याची ही  एक सुंदर पद्धती भक्तिमध्ये दिसून येते.  ह्या ईशप्रीती सोबत जर आपण पाच गुण जीवनात आणले तर ईश्वराचे प्रेम आपल्याला जास्त मिळू शकेल.

दूध :- प्रत्येक पूजेमध्ये दुधाचा वाटा जास्त दिसतो.  दूध हे पवित्रतेचे आणि संपन्नतेचे प्रतिक आहे.  गृहप्रवेश करतो तेव्हा सुद्धा दुधाला उकळवून ते सांडू दिले जाते.  म्हणजेच हे घर नेहमी संपन्न आणि भरपूर रहावे ही त्या पाठीमागची शुभभावना.  दूध शरीरासाठी सुद्धा चांगले मानले जाते.  दुधासारखी शुभ्रता आपल्या चरित्रात तसेच, त्याचे पावित्र्य आपल्या विचारात आणले तर ईशकृपा नक्कीच आपल्यावर होईल.

दही :- दह्यामध्ये परिवर्तन शक्ति आहे. एक मण दुधामध्ये एक चमचा दही टाकले तर त्याचे रूपांतर दह्यामध्ये होते.  दह्यामध्ये दुसऱ्यांना स्वतःसारखे बनवण्याची शक्ति आहे.  आज मनुष्य दुसऱ्यांना लवकर कॉपी करतो.  रस्त्यामध्ये कोणी ओळखीचे भेटले, हाय-हॅलो केले तर आपण ही करतो.  जर त्यांनी नाही केले तर आपण ही करत नाही.  एखाद्याने रागाने काही बोलले तर त्याचे उत्तर आपण ही रागावून देतो.  जसे समोरचा वागतो तसेच आपण वागतो.  पण कोणी कसे ही  वागले तरी मला कसे वागायचे आहे याची समज नक्कीच ठेवावी.  वाईटाचा मार्ग न निवडता समोरच्याला आपल्या सारखे बनवण्याची कला आपण आपल्यामध्ये आणावी.  दह्यासारखे स्वतःला बनवावे.

तूप :- तुपामध्ये स्निग्धता आहे.  त्याचबरोबर त्याला पौष्टिक ही  मानले जाते.  तूप बनवण्यासाठी दुधाचे दही,  दह्याचे ताक, ताकाचे लोणी मग लोण्याचे तूप बनवले जाते.  पूजेमध्ये तुपाचा दिवा लावला जातो.  तूप जळून  ज्योतीचा प्रकाश सर्वांना मिळत राहतो.  व्यावहारिक जीवनात ही संबंधांना टिकवण्यासाठी तुपासारखे बनावे लागते.  स्नेहाची स्निग्धता प्रत्येकाला द्यावी लागते.  आज प्रत्येक जण प्रेमाचा भुका आहे. स्नेहाची छाया जिथे मिळते तिथे सर्वांना विसावा मिळतो.  आपला स्वभाव ही  स्नेहमय बनवावा जिथे सर्वांना सहानुभूती, शक्ति मिळत राहावी.

मध :- मध हे शक्तिवर्धक मानले जाते.  मधाची प्राप्ती सहज होत नाही म्हणून ते महाग मिळते.  ते कधी खराब ही  होत नाही.  आपण स्वतःला ज्ञानाच्या, अनुभवाच्या आधारावर मजबूत, शक्तिशाली बनवावे.  ज्ञानाला प्रकाश ही  म्हटले जाते.  कोणते ही ज्ञान आत्मसात केले तर ते कधीच संपत नाही.   जीवनामध्ये जे पण चांगले-वाईट अनुभव आपण घेतले त्यातून काहीतरी आपल्याला शिकवण मिळाली.  ती शिकवण घेऊन पुढे चालत राहणे हा जिवनाचा नियम आहे.  तो आनंदाने स्वीकारावा तर आपण जीवनामध्ये मधासारखे मधुर आणि शक्तिशाली राहू शकतो.

साखर :-  तोंड गोड  करण्यासाठी एक चमचा साखर ही खूप होते.  घरात काही गोड पदार्थ नसेल तर आपण साखर खाऊन ही  तृप्त होतो.  तसेच संबंधांमध्ये गोडवा हा हवाच.  एखाद्या संबंधांमध्ये जिव्हाळा, प्रेम, सदभावना असेल तर ते संबंध गोड वाटतात.  नाहीतर तेच संबंध दुःख देणारे अनुभव होतात.  म्हणून प्रत्येक संबंधांमध्ये हा गोडवा आपण जरूर आणावा.  जे कोणी आपल्या सम्पर्कामध्ये येतात त्यांना शब्दांचा गोडवा जरी दिला तरी ते तृप्त होऊ शकतात.

ह्या पंच अमृतांचा वापर आपण मन, वचन, कर्म, संबंध आणि संपर्कामध्ये सुद्धा करावा.  पंचामृताचे हे पाच गुण आपण आपल्यात आणले तर नक्कीच प्रभुप्रिय आपण बनू शकतो.

मन हे विचारांना निर्माण करते.  हे विचार  दुधासारखे पवित्र ठेवण्याची आवश्यकता आहे. जसे दुधामध्ये लिंबूचा एक थेंब पडला तर ते नासते तसेच विचारांमध्ये एखादा नकारात्मक संकल्प आला तर सगळेच विचार नकारात्मक बनतात.  जसे दुधाचा सांभाळ करतात तसेच आपण आपल्या विचारांची पवित्रता ही सांभाळायला हवी.

बोल हे व्यक्तीची ओळख करून देतात म्हणून ते नेहमीच साखरेसारखे गोड, मधुर असावेत.  कर्म हे मधासारखे शक्तिशाली असावेत कारण कर्माचे फळ मिळते.  चांगले किंवा वाईट जे कर्म आपण करतो.  त्याचाच परिणाम जीवनामध्ये सुख किंवा दुःख मिळते.  संबंध हे तुपासारखे असावेत.  शरीराने दूर गेले तरी मनाने नेहमी जवळ राहणारे.  संबंधामध्ये प्रेम असणे गरजेचे आहे आणि संपर्क दह्यासारखे असावेत.  आज विदेशामध्ये जाणारा युवक आपली संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृतीला अवलंबित आहे.  परंतु दह्यासारखे असावे.  आपल्या संस्कृतीचा, गुणांचा, संस्कारांचा प्रभाव दुसऱ्यावर पाडावा.  परिवर्तन करण्याची शक्ति आपल्यामध्ये असावी.

अशाप्रकारे ह्या गुणांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला तर नक्कीच आपले जीवन श्रेष्ठ व सुंदर बनू शकेल.

Continue Reading

संस्कार आणि संस्कृति

भारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो.  भारताची प्राचीन संस्कृति ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ’ ह्या मार्गाने पुढे चालणारी, अंधःकारातुन प्रकाशाकडे नेणारी मानली जाते.  म्हणून प्रत्येक सणामध्ये, प्रसंगामध्ये दीप प्रज्वलन, दिवा लावणे ….  ह्या प्रथा दिसून येतात.  पण आज हीच संस्कृती अंधःकाराकडे जात आहे.  वाढदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून, तिलक लावून शुभकामना देण्याची पध्दत आज मेणबत्ती विझवून Happy Birthday बोलणारी झाली आहे.

भारताची प्राचीन संस्कृती विसरुन पाश्चात्य देशाची भोग-विलासी संस्कृतीला आपण हात मिळवत आहोत.  ‘ भूक लागल्यावर खाणे ही आहे प्रकृती, भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती, पण खात असताना कोणी आले तर त्याला हि खावयास देणे ही आहे संस्कृती.’  ही संस्कृती भारतामध्ये ‘ अतिथी देवो भव ’ म्हणून सांभाळताना दिसते.  घरी आलेला पाहुणा देवाचेच एक रूप समजून त्याचा पाहुणचार प्रेमाने केला जातो.  अनेक पध्दती आणि अनेक उत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन करवतात.  प्रत्येक उत्सव आणि प्रथा ह्या पाठीमागे अनेक रहस्य लपली आहेत पण त्या रहस्यांना कधी जाणून घेतले नाही म्हणून आज तसे आपल्यामध्ये संस्कार ही दिसून येत नाहीत.

संस्कार आणि संस्कृती ह्यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे.  संस्कार अर्थात दैनंदिन जीवनामध्ये नियमितता आणणे, व्यवहारामध्ये सद्गुणांचा समावेश करणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्यता आणून धर्मयुक्त कार्य करणे हे संस्कारित असण्याची निशाणी आहे.  अश्या संस्कारी मनुष्यानी अनेकांना जीवन जगण्याची कला शिकवली त्या कलेला संस्कृति म्हटले जाते.

वर्तमान परिस्थिति मात्र वेगळी दिसून येते.  विज्ञानाने मनुष्याला अनेक साधन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु त्याच बरोबर आपली मानसिकता ही दिवसेंदिवस बदलत गेली. अनेक चुकीच्या समजुती समाजामध्ये पसरत गेल्या आणि हीच सुंदर संस्कृती आज लोप होताना दिसत आहे. शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विदेशात गेलेला भारतीय युवावर्ग तिथली स्वच्छंद जीवन पध्दतीच्या आहारी जात आहे.  पैशाच्या मोबदल्यात भारतीय संस्कृतीला पणाला लावत आहे.  स्वतःचे संस्कारी जीवन सुद्धा गहाण ठेवत आहे.  एके काळची म्हण होती कि ‘ धन गेले तर काही गेले नाही, तन गेले तर थोडे काही गेले, पण चरित्र गेले तर सर्व काही गेले.’  आज हीच म्हण उलटी झाली आहे. ‘चरित्र गेले तर काही हरकत नाही, तन गेले तर थोडेसे नुकसान झाले, पण धन गेले तर सर्वस्व गेले.’

आज कोणी कितीही धनाढ्य असला तरी त्यांच्याकड़े गुणांची, चांगल्या संस्कारांची गरिबी दिसून येते.  भारत संतांची, महात्म्यांची अनेक योगींची जन्म-भूमी आहे.  त्यांच्या पवित्र जीवनाचा सन्मान करून आपण ह्या प्राचीन संस्कृतीला जपण्याचा पूर्ण प्रयत्न करूया.  ह्यासाठी आपण स्वतः सुसंस्कारी बनण्यासाठी प्रयत्नशील राहू या कारण आज प्रत्येक मनुष्यामध्ये कोणत्या न कोणत्या वाईट सवयी आहेत.  कदाचित ह्याच सवयी ज्यांना संस्कार म्हंटले जाते, ह्यामुळेच आपण दुःखी आहोत.  सूक्ष्म आणि स्थूल सवयींना बदलण्यासाठी प्रत्येक कर्मांवर लक्ष्य ठेवायला हवे.  कारण ह्या कर्मांची शृंखला संस्कारांना जन्म देते आणि हेच शक्तिशाली संस्कार आपल्याकडून वारंवार तेच कर्म करून घेतात.  संस्कारांच्या आहारी जाऊन पुन्हा-पुन्हा त्याच कर्मांची पुनरावृत्ती होते.  कर्म आणि संस्कार ह्या मध्ये एक सूक्ष्म धागा आहे जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल.

‘ आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.  पण मनुष्य जीवन त्याच्या कुटुंबाला, समाजाला तसेच देशाला घडवते.  आपले सुसंस्कारी जीवन नवीन संस्कृतीला जन्म देऊ शकेल.  देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे.  चला तर मग आपल्या श्रेष्ठ कर्मांचे बीजारोपण करून सुंदर संस्कारांनी नवीन संस्कृतीची बाग फुलवू या.  ह्या बागेमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुणांचा सुवास, उत्साहाचा झोपाळा, प्रेमाची सावली लाभेल जेणेकरून त्याचे जीवन ही सुगंधी बनेल.

Continue Reading

विघ्न – विनाशक गणराया

महाराष्ट्राचे सर्वात लाडके दैवत म्हणजे गणपति.  गणपतीचे  हे आगळे-वेगळे रूप मनाला आकर्षित करणारे आहे.  दरवर्षी सर्वांना ह्या उत्सवाची उत्सुकता असते.  मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो की घरी येणारा हा गणराया असो.  ‘ गणपति बाप्पा मोरया ’  चा नाद गल्लोगल्ली कानावर पडू लागतो.  सर्वांच्या मनामध्ये एक भावना जरूर असते कि गणरायाच्या आगमनाने आमच्या जीवनातले सर्व विघ्न आता दूर होणार.  ह्याचा वरद हस्त आमच्यावर राहील्याने आमचे जीवन सुरळीत होणार.

कोणी दीड दिवसाचा गणपती तर कोणी पाच किंवा सात दिवसाचा तर कोणी अकरा दिवसांचा गणपति घरी बसवतात.  प्रेम-भावनेने त्याची आराधना करतात.  मोदकाचा खास नैवेद्य दाखवतात.  हे सर्व कार्य मनोभावे केले जाते.  ज्या भावनेने पूजा अर्चा केली जाते त्या अनुसार मनोकामना ही पूर्ण होण्याचा अनुभव आपल्या सर्वांकडे असेलच.  असे ह्या देवता मध्ये काय आहे ?  ज्या मुळे आपल्या जीवनातील विघ्न दूर होतात ?  प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात गणपति वंदनेने केली जाते कारण गणरायाचे रूप जर व्यवस्थित न्याहाळले तर प्रत्येक अंग गुणांनी भरलेले आहे.  म्हणूनच गणपति म्हणजे गुण-पति असे ही म्हटले जाते.

जीवनामध्ये जेव्हा विघ्न येतात तेव्हा मनुष्याचा कल पूजा-अर्चा, उपवास, नवस …..  ह्या सर्व गोष्टीकडे जातो पण आपल्या जीवनातले विघ्न दूर करण्यासाठी आपल्यालाच अचूक पाऊल उचलावे लागते.  विघ्न विनाशक  बनण्यासाठी गणराया सारखे बनावे लागेल.  आपल्या सर्वाना गणेशाची जन्म कथा माहितच असेल.  पार्वतीच्या मळाने एका पुत्राचा जन्म होतो.  शंकर आपली तपस्या पूर्ण करून जेव्हा परत येतात तेव्हा पार्वती स्नान करायला गेली.  अश्या वेळी ह्या पार्वती नंदनाला बाहेर बसवून तसेच ताकीद देऊन गेली होती कि कोणी ही आले तरी त्यांना आत पाठवायचे नाही.  जेव्हा शंकर आत जाऊ लागले तर ह्या पुत्राने त्यांना अडवले.  शंकर ह्यांना प्रश्न उठला कि हा कोण जो मला अडवतोय ? रागात येऊन ते ह्या पुत्राचे शिश धडापासून वेगळे करतात.  पार्वती अंघोळ करून बाहेर येते तेव्हा झालेला प्रकार बघून त्यांना सांगते कि मीच त्याला सांगून गेले होते.  हा आपलाच पुत्र आहे.  काही ही करा पण ह्याला कोणाचे ही तोंड लावून जीवंत करा.  तेव्हा शंकरजी हत्तीचे तोंड ह्या मुलाला लावतात आणि ह्याच शिवपुत्राचे नाव ‘ गणपति ’ असे ठेवले जाते.

हत्तीचेच तोंड का ?  हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला असेल.  हत्तीला बुद्धीवान, बलवान, आज्ञाधारक ….. मानले जाते.  हत्तीच्या प्रत्येक अंगामध्ये रहस्य आहे.  सुपासारखे कान हे चांगले आणि वाईट ह्यांचा भेद करून चांगले आपल्या जवळ ठेवण्याची कला शिकवणारे आहे.  वाईट ऐकण्याची सवय ही आपल्या जीवनाला चुकीच्या मार्गावर घेऊन घेऊन जाऊ शकते.  म्हणून Hear no evil  ही गाठ आपण बांधावी.  शरीर इतके मोठे मात्र डोळे किती छोटे. दूरची वस्तू बघण्यासाठी आपल्याला डोळे छोटे करावे लागतात.  हे डोळे दूरदृष्टीचे प्रतिक आहे.  कोणते ही कार्य करण्यासाठी त्याचे होणारे परिणाम पहिले लक्षात घ्यावे.  कारण आजचा मनुष्य पहिले करतो आणि मग त्यावर विचार करत राहतो परंतु पहिले विचार करावा व मग कार्याला लागावे ही सवय आपण स्वतःला लावावी.  हत्तीचे सोंड ही बलशाली असण्याचे प्रतिक आहे.  ह्या सोंडेने भले मोठी झाडे मुळासकट उपटून काढली जातात.  ह्याच सोंडेने देवाला हार ही अर्पण केला जातो.  ह्या सोंडेमध्ये कोणी ही काहीही दिले तर ते मालकापर्यंत पोहोचवण्याची इमानदारी ही दिसून येते.  अशक्य कार्य शक्य करण्याची शक्ति हत्तीमध्ये दिसून येते.  मानवी मनामध्ये सुद्धा अद्भुत शक्ति आहे ज्या द्वारे असम्भव कार्य सम्भव होऊन जातात.  तसेच नम्रता आणि इमानदार राहिल्याने जीवनातल्या समस्या कमी होतात.

ह्या गुणांचा वापर दैनंदिन कार्यामध्ये आपण केला जसे दूरदृष्टी ठेवून जे आवश्यक आहे तितके ऐकणे, बोलणे ….. ह्यावर अटेन्शन ठेवले तर वेळेचा सदुपयोग तर होईलच पण व्यर्थ गोष्टींपासून मुक्त ही होऊ.   आपल्यामध्ये जे गुण आणि शक्ती आहेत त्यांचा व्यर्थ व्यय न करता खऱ्या मार्गाने वापर केला तर विघ्न कमी येतील आणि जर परिस्थिती आलीच तर त्याचा सामना पण करू शकतो.

ह्या गणेशोत्सवानिमित्त आपण आज संकल्प घेऊ या कि रोज ह्या गणरायाचे दर्शन करून त्यांचे सर्व गुण आणि शक्ति मला माझ्यामध्ये आणायचे आहेत.  मी स्वतःला इतके शक्तिशाली बनवेन की किती ही विघ्न आली तरी ती ह्या शक्तिंनी समाप्त होतील.  मी सुद्धा गणपति सारखे गुणांनी स्वतःला भरपूर करीन.

Continue Reading

रक्षाबंधन

भारत एक असा देश आहे की ज्यामध्ये अनेक सण, उत्सव, जयंती ….  साजरे केले जातात.  प्रत्येक सणापाठीमागे काही पौराणिक कथा आणि त्यांचे आध्यात्मिक रहस्य ही आहेत.  जन्माष्टमी, रामनवमी, दसरा, बुद्ध जयंती, महावीर जयंती, दीपावली ….  प्रत्येक सण हा महान आत्म्यांच्या कर्तृत्वाचे तसेच विजयाचे प्रतीक आहे.  परंतु रक्षाबंधन हा एक असा सण आहे की ज्याचा कोणता इतिहास नाही.  तरी सुद्धा वर्षोनवर्ष हा सण साजरा केला जातो.  ह्या सणामध्ये कोणता ही आवाज नाही, धूम-धडाका नाही.  किती शांतीने परंतु उमंग-उत्साहाने हा सण साजरा केला जातो.

खरंतर हा सण पवित्र सण आहे ज्यामध्ये धर्माचे, नात्याचे कोणते ही बंधन नाही.  रजपूत घराण्याची राणी कर्णावती हिने मुगल सम्राट हुमाँयू याला राखी पाठवली आणि त्याने आपले सर्वस्व पणाला लावून तिची रक्षा केली.  इंद्रायणीने इंद्रला, हे रक्षासूत्र बांधले, त्यामुळे त्याची रक्षा झाली.  ह्यांचा संबंध पती-पत्नीचा होता.  तसेच अभिमन्यू जेव्हा युद्धाच्या मैदानावर जात होता तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली.  जेव्हा हे रक्षा सूत्र तुटले तेव्हा त्याचा वध झाला.  अश्या अनेक कथा सांगितल्या जातात.  आज बहीण भावाला राखी बांधून आठवण देते की तुला माझी रक्षा करायची आहे.  पण खरंच रक्षाची  आवश्यकता फक्त बहिणींनाच आहे का ?  आणि फक्त भाऊच रक्षा करू शकतो कोणी दुसरा का नाही ?  कंस आणि देवकी ह्यांचा संबंध भाऊ-बहिणीचा असून ही रक्षकाच्या ऐवजी भक्षकचे रूप आपण बघतो.

कोणत्या ही नात्यामध्ये व्यक्तीला बंधन आवडत नाही.  पण रक्षाबंधनाची राखी बांधायला मात्र सगळे प्रेमाने तयार होतात.  हिंदू धर्मामध्ये घरी ब्राह्मण येऊन यजमानांना राखी बांधून जायचे.  ही राखी पवित्रतेचे प्रतीक मानले जाते.  ‘ रक्षाबंधन ’ ला विषतोडक पर्व किंवा पुण्यप्रदायक पर्व असे ही म्हटले जाते.  ह्याचा अर्थ असा की ह्या सणाचा संबंध पुण्यात्मा बनण्याशी आहे.  राखी ही फक्त नायलॉन किंवा रेशमी धाग्यांची नाही परंतु पवित्र संबंधांच्या धाग्यामध्ये एक-दुसऱ्याला बांधणारी आहे.

ह्या दिवशी तिलक लावणे, आरती ओवाळणे आणि तोंड गोड करणे …..  अश्या काही गोष्टी केल्या जातात.  तिलक हा आत्मस्मृतीचे प्रतीक आहे.  शरीरामध्ये सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे आपले ललाट.  दोन भुवयांच्या मध्ये हा टिका लावला जातो.  शरीराला चालवणारी चेतना ही हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लॅन्ड ह्यांच्या मध्यभागी राहते.  त्यामुळे इथे तिलक लावण्याची प्रथा आहे.  आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे.  तसेच सर्वांना समभाव आणि सन्मानाच्या दृष्टीने बघितले तर आपापसात प्रेम आणि जिव्हाळा नेहमी राहील ह्याची जाणीव करून देणारा हा तिलक.  आरती ओवाळणे हे विजयाचे प्रतीक आहे तर तोंड गोड करणे हे मधुरतेचे प्रतीक आहे.  फक्त गोड खाणे महत्वाचे नाही परंतु मुखाद्वारे गोड शब्दांचा वापर करणे जरूरीचे आहे.  ज्याने आपले संबंध नेहमीच सुमधुर राहावे हा त्यापाठीमागचा उद्देश्य आहे.  ह्या गोड संबंधांना आपण वाईट वृत्तींवर  विजय मिळवू शकतो.

 

परंतु ह्या कलयुगी दूषित वातावरणामध्ये मनोविकारांवर विजय मिळविणे थोडे कठीणचं नाही का ?  आज संबंध कोणता ही असो परंतु सगळ्यांची दैहिक दृष्टी वाढत चालली आहे.  ह्या दृष्टीला पवित्र बनवणारा हा दिवस.  समाजामध्ये नारीचे स्थान सन्माननीय आणि श्रेष्ठ दृष्टिकोन जर वाढत गेला तर नक्कीच स्वर्ग इथे बसू शकेल. ‘यत्र नार्यस्त्र पूजन्तो  तत्र रमन्त देवता ’ हे वचन सत्य होऊ शकतील.

दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आज कोणी मनुष्य कोणाची रक्षा करू शकत नाही.  आपली रक्षा आपले कर्म आणि ईश्वर हेच करू शकतात.  पुण्य कर्मांची पुंजी जितकी आपल्याकडे जमा असेल तितके परिस्थितींना सामोरी जाण्यासाठी मदत मिळते.  त्याच बरोबर प्रभुस्मृतींनी पदोपदी आपली रक्षा होते.  ईश्वराला प्रेमाने, श्रद्धाभावनेने आठवण केले तर तो रक्षा करण्यासाठी धावत येतो अशी फक्त मान्यताच नाही परंतु आपण अनुभव ही केले असतील.  राखीच्या धाग्यांना जसे बांधले जाते तसेच आपण ह्या  राखीबरोबर आपल्या मन-बुद्धीच्या धाग्यांना ईश्वराबरोबर घट्ट बांधू या.  विषय-विकारांना भस्म करून मनाला पवित्र करू या कारण आपल्या दुःखाचे कारण फक्त आपली दूषित विचारधारा आहे.  म्हणूनच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पवित्र विचारांचा प्रवाह सदैव ह्या मनामध्ये वाहू दे, निर्मल मनाने सर्व संबंध, कार्य ……. श्रेष्ठ बनवण्याचा शुभ संकल्प आपण करू या.

Continue Reading

मन – एक संग्रहालय

भले बुरे ते घडून गेले, विसरुनी जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर………

सर्व ब्रह्मवत्सांना संगमयुगावर मिळालेला हा नवीन जन्म, ह्या जन्मामध्ये चांगले-वाईट जे काही आपण आपल्या मनाच्या तिजोरीत बंद करून ठेवले आहे त्याला ईश्वर चरणी स्वाहा करण्याची ही उत्तम वेळ आहे. ह्या चंचल मनामध्ये जे काही साठवून ठेवले आहे, तो पर्यंत त्या सर्व गोष्टी, प्रसंग आपण Delete  (काढून टाकत) करत नाहीत तो पर्यंत शिवबाबाकडून जे रोज मुरलीद्वारे नवीन, निराळे ज्ञान मिळत आहे त्याचा संग्रह होऊ शकत नाही.

एखाद्या वस्तुसंग्रहालयामध्ये  कितीतरी वर्षांपूर्वीच्या वस्तू विशेष जमा केल्या जातात.  त्यांना बघण्यासाठी मनुष्य खास त्याठिकाणी भेट देतात.  आपल्या ह्या जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगातून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनामध्ये लाभ होऊ शकतो.  पौराणिक काळातील अनेकानेक राजे जे शूरवीर होऊन गेले, त्यांच्या छोट्या-छोट्या वस्तू जसे चमचे, सूरी, बटण….      ह्यांना सुद्धा सांभाळून ठेवले जाते.  शिवबाबा तर आपल्याला त्याच्याही आधीचा काळ स्मृतीत आणण्यासाठी रोज मुरली मध्ये सत्ययुगी दुनियेचे वर्णन करत असतात.  आपण त्या प्रसंगांना आठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या सुखाचा अनुभव करण्याचा ध्यास घेतला तर नक्कीच आपले वर्तमान जीवन सुद्धा सुखी समाधानी बनू शकेल.

मनोवैज्ञानिकाच्या दृष्टीने आपल्या मनामध्ये दिवसभरात ३०,००० किंवा त्याहून ही अधिक विचार येतात.  थोडं थांबून  जर त्याचे अवलोकन केले की माझे हे मन नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये busy (व्यस्त) आहे तर आढळून येईल की निरर्थक, नकारात्मक, प्रश्नार्थक विचारांच्या गोंधळामध्ये ते फसले आहे.  कोणत्या मार्गाने जावे, काय करावे ह्यांची गुंतागुंत दिसून येते.  मनाची ही ओढाताण, अस्वस्थता जर थांबवायची असेल तर मनाला सदविचारांनी भरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायला हवा.  जसे एखाद्या फुलदाणीसाठी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी, सुगंधी फुलांची निवड केली जाते तसेच आपण ह्या मनामध्ये सुद्धा सुखद, सुंदर, समाधानी विचारांची निवड केली तर मन अतिशय शक्तिशाली झाल्याचे आपल्यास जाणवेल.

विचारांची शुद्धता आणि स्पष्टता आपल्याला श्रेष्ठ बनवते.   ज्या महान विभूती आपल्या दृष्टीक्षेपात आहेत, त्याच्या विचारसरणीला न्याहाळले तर हे जाणवेल की, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी जे सिद्धांत किंवा नियम बनवले त्यांच्या आड भले कितीही परिस्थिती, आकर्षण, दुःख आली तरी मनाचा संयम, विवेकशक्तीचा वापर पदोपदी केला गेला.  सुखाचा स्वाद घेतला तसेच दुःखाचे सहर्ष स्वागत ही  केले.  मन आणि बुद्धीचा अप्रतिम ताळमेळ असल्यामुळे त्यांनी जीवनाच्या रणभूमीवर विजय प्राप्त केला.

आपल्याकडे शरीराच्या प्रकृतीचे ज्ञान आहे तसेच मनाची अवस्था समजण्याची गरज आहे.  जसे आपण कोणता पदार्थ खाल्ल्याने स्वास्थ बिघडते हे ध्यानी ठेवतो तसेच कोणत्या विचारांनी माझे मन दुःखी होते ह्याचे ही ज्ञान हवे. ज्यांच्याकडे ही समज आहे ते नेहमीच सतर्क राहून आपला आनंद किंवा ख़ुशी जोपासण्याचे अनेकानेक उपाय योजत राहतात. सकारात्मक विचार आपल्या कमजोर मनासाठी एक टॉनिकचे काम करते.  स्वमानाचा नियमित अभ्यास मनाला लवचिक बनवण्यास मदत करतो.

मनाची सुंदरता जीवनाला सुंदर आणि सुखी बनवते. तसेच मनाची कटुता संबंधांमध्ये आणि व्यवहारामध्ये सुद्धा कटुता आणते.  आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मनाच्या गाभाऱ्यात जाऊन थोडा वेळ निवांत बसायला हवे.  त्या गाभाऱ्यात ईश्वराची प्रतिमा न्याहाळत, त्याच्याशी सुमधुर संवाद साधण्याची सवय स्वतःला लावली तर मनाचे संतुलन कायम राहू शकते. ईश्वराचे सान्निध्य ज्या आत्म्यांना लाभले आहे त्यांच्या भाग्याचे वर्णन ते काय करावे ?  उच्चकोटीचे ईश्वरीय ज्ञान आपल्याला लाभले आहे.  ते सदैव सोबत ठेवून प्रसंगानुरूप त्याचा वापर जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपले भविष्य उज्ज्वल होईल.

Continue Reading

ऋणानुबंध

मनुष्य जीवन अति दुर्लभ समजले जाते परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्मांचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो. माणसाला सामाजिक प्राणी मानले जाते.  समाज, कुटुंब, प्रकृती…. अनेकांबरोबर ऋणानुबंध आहेत.  संपूर्ण जीवनच त्या अनुषंगाने चालत आहे. एखादे मूल जन्माला आले कि हळूहळू त्याच्यावर मातृऋण, पितृऋण… चालू होतात. हे ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात.  कारण हे बांध आपल्याला जीवनाच्या प्रवाहामध्ये कुठे न कुठे थांबवतात.  जो पर्यंत त्याची भरपाई होत नाही तो पर्यंत सुटका नाही.

आपण सर्वच अनुभव करतो की कोणते ही बंधन आपल्याला आवडत नाही परंतु ही बंधने मनाला, तनाला तसेच आपल्या पूर्ण जीवनाला प्रभावीत करतात.  सगळ्यांनाच आपल्या मनासारखा जीवनसाथी, नोकरी, कुटुंब मिळत नाही.  काही ठिकाणी तडजोड करून ही जीवन व्यतीत करावे लागते म्हणजेच हे बंध आहेत ज्यांनी आपले जीवन बांधुन ठेवले आहे. पण सत्य हे आहे कि हे बांध कदाचित आपणच घातले आहेत.  कळत नकळत केलेला विचार, बोल, कृती…  ह्याचाच तो परिणाम आहे.

आजच्या युगात ही ‘ Give and Take ’ ह्या नियमावर लोक चालत आहेत.  कदाचित आपण त्याला आज business  (व्यवसाय) म्हणतो.  प्रत्येक संबंधामध्ये मग ते पती-पत्नी, भावंडं, मित्र-मैत्रिणी, वडील-मुलगा, चालक-मालक … असो सगळीकडे मी किती केलं आणि त्या return मध्ये समोरच्या व्यक्तिने किती केलं ह्याचा हिशोब लावला जातो.  कधी-कधी आपण बोलून दाखवत नाहीत पण मनातल्या मनात तो हिशोब चालूच राहतो.  काही वेळा तर आपण स्वतःचीच समजुत घालतो की जाऊ दे कदाचित हे पूर्वजन्माचे देणं असेल जे आज आपण फेडत आहोत.  कळत-नकळत कर्मांचे गूढ लक्षात येते.

ह्या कलियुगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार…  ह्या सर्व गोष्टी सर्रास चालतात.  अनेकानेक बातम्या कानावर पडतात तेंव्हा मनात विचार येतो कि माणसं अशी का वागतात ?  एखाद्यावर खूप प्रेम करतात आणि दुसऱ्यांना जख्मा देतात हा विरोधाभास एकाच व्यक्तीच्या कर्मांमध्ये का दिसून येतो ?  पण ह्याचे कारण ही हेच आहे कि प्रत्येक व्यक्तीबरोबरचा व्यवहार, संबंध एकाच प्रकारचा कसा असू शकतो ?  नाती वेगळी, सगळ्याबरोबरचा अनुभव वेगळा, ऋणानुबंध ही वेगळेच.

कधी-कधी एकटे बसल्यावर हा विचार येतो की एका जन्मामध्ये लहानपणापासून मरेपर्यंत आपण कमीत कमी शंभर लोकांना भेटलो असू.  काही बरोबर थोडा वेळ तर काही बरोबर पूर्ण आयुष्य घालवले असेल.  त्या जन्माचे देणे बाकी राहिले तर दुसऱ्या जन्मामध्ये तीच व्यक्ती दुसऱ्या रूपात आपल्याला भेटतेच, असे करता करता किती जणांबरोबर हे बंधन बांधले आहे. आज आपण mobile वापरतो. facebook किंवा अन्य apps द्वारे आपण अनोळखी व्यक्तींबरोबर ही संबंध जोडत आहोत.  ह्या अनोळखी व्यक्ती जाणता-अजाणता आपल्याला सुख-दुःख देऊन जातात हे पण तर पूर्वजन्माचे फळ आहे.

ऋण अर्थात केलेले उपकार, मदत ज्यांची परतफेड करावी लागते.  हे  ऋणानुबंध कधी-कधी आपल्या कडून जबरदस्तीने का होईना फेडावे लागतात. म्हणून प्रत्येक घटनेपाठी जे कर्मांचे कायदे लागू होत आहेत त्याला समजून प्रेमाने त्या परिस्थितीला हाताळण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यावी.

प्रसिद्ध लेखक एडगर केसी ह्यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की १८ व्या शतकामध्ये एका व्यक्तीच्या पाठीवर व्रण होते, खूप नानाविध उपाय केले गेले परंतु ते व्रण काही गेले नाहीत आणि भयंकर त्रास ही त्यामुळे सहन करावा लागायचा.  एक दिवशी ती व्यक्ती एडगर केसी कडे गेली.  ज्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की ते समोरच्या व्यक्तीच्या पूर्वजन्मांना बघू शकायचे.  जेव्हा एडगर केसी सुप्तावस्थेमध्ये जाऊन त्याच्या पूर्वजन्मांना बघतात तेंव्हा त्यांना दिसून येते की ही व्यक्ती तीन जन्मापूर्वी एका राजाकडे काम करीत असे. राजा खुप निर्दयी होता.  त्याचा नियम होता, त्याला कोणाला ही काही संदेश पाठवायचा असेल तर तो राज्यातल्या एका व्यक्तीला पकडून त्याच्या पाठीवर गरम लोखंडाच्या सळीने तो संदेश लिहायचा आणि पाठवायचा.  ही व्यक्ती त्या जन्मामध्ये त्याला काहीच झाले नाही पण तीन जन्मानंतर त्याच्या स्वत:च्या पाठीवर असे व्रण आले की त्याला उठता, बसता, झोपताना ही त्याचा अतिशय त्रास व्हायचा. सारांश हा कि कळत-नकळत आपणच आपल्यासाठी असे बांध घातले आहेत.  ज्यामुळे जीवनाचा खरा आनंद, सुख आपणास मिळत नाही.

वर्तमानामध्ये  प्रत्येक कर्मावर आपण लक्ष ठेवले, सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर पूर्वजन्माची सारी देणी फेडून जीवनाचा प्रवाह सरळ आणि सुखद करू शकतो.

Continue Reading

पारसस्पर्श

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक आश्रम होते. जिथे गुरुंबरोबर काही शिष्य राहायचे. एकेदिवशी गुरूंनी आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी शिष्याला एक साधारणसा दगड दाखवला व विचारले की ‘ ह्या दगडाची किंमत काय असेल ? ’  शिष्य आश्चर्याने त्या दगडाकडे पाहत राहिला . चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते कि ह्या दगडाची अशी काय किंमत असेल ? बुचकळ्यात पडलेल्या शिष्याला बघून गुरु म्हणाले, ‘ जा,  जरा बाजारात  जाऊन ह्याची किंमत काय असावी ते विचारून ये ’. पण लक्षात ठेव की हा दगड कोणालाही विकायचा नाही.’

शिष्य बाजाराकडे निघतो. रस्त्यामध्ये  त्याला एक शेतकरी भेटतो. त्याला थांबवून तो विचारतो कि ‘आपण मला सांगू शकाल की ह्या दगडाची तुम्ही काय रक्कम देऊ इच्छिता ?’ शेतकरी त्या दगडाला हातामध्ये घेऊन सहजरीत्या म्हणतो कि ह्याची ती काय किंमत? एक रुपया ठीक आहे.’  शिष्य त्यांच्याकडे बघतो व मनातल्या मनात  विचार करतो की माहित नाही हा काय प्रकार आहे. पुढे जाऊन तो एका दुकानाजवळ थांबतो व दुकानदाराला विचारतो कि ह्या दगडाची काय किंमत असू शकेल? दुकानदार उत्तर देतो  ‘ १० रुपये’. शिष्य कुतूहलाने त्याच्याकडे बघत राहतो. त्याच्या मनामध्ये येते की आणि दोन-चार  व्यक्तींना विचारायला हवे. तो एका दागिन्यांच्या दुकानाकडे जाऊन सोनाराला विचारतो. सोनार सांगतो ‘मी ह्याचे हजार रुपये देऊ शकतो.’हे ऐकून शिष्य तोंडात बोट घालतो. आता मात्र त्याच्या मनातली उत्सुकता वाढते व तो त्या गावातल्या राजाकडे जातो व विचारतो ‘राजन, तुम्ही ह्या दगडाची काय किंमत आकाराल ?’ राजा त्या शिष्याकडे बघत म्हणतो ‘ ह्या दगडाच्या किंमतीमध्ये मी माझे पूर्ण राज्य द्यायला तयार होईन.’ शिष्य हे ऐकून पूर्णपणे गार होतो.  तो त्या दगडाला परत घेऊन धावत-धावत आश्रमात पोहचतो.गुरूंच्या समोर जाऊन प्रश्न करतो कि ‘गुरुदेव ,मला खर सांगा. हा दगड नक्की काय आहे? राजा तर दगडाच्या बदल्यात पूर्ण राज्य द्यायला तयार आहे. हा दगड……’ तेव्हा गुरु शांत मुद्रेने उत्तर देतात ‘ह्या दगडाला पारस म्हणतात. लोखंडाला जर ह्याचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते. समजले …… हा साधारण  दगड नाही.’

लोखंडाला पारस स्पर्श झाला की त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते अर्थातच मूल्यहीन वस्तू ही मूल्यवान होते. एखादे तान्हे बाळ ज्याला बोलता ही येत नाही त्याला सुद्धा स्पर्शाने आपल्या आईची ओळख होते. ढगांना थंड हवेचा स्पर्श झाला की पाऊस पडायला लागतो. एखादया  ओसाड जमिनीला पाऊसाच्या पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा चहूकडे हिरवे गालिचे पसरतात. प्राण्यांना सुद्धा स्पर्शाद्वारे त्यांच्यावर माया करणाऱ्यांची ओळख पटते. ह्या सर्व स्पर्शाना शब्दांची गरज नाही. पण ह्या स्पर्शामध्ये प्रेमाची स्पंदने भरलेली आहेत.

दैनंदिन जीवनामध्ये ही प्रत्येक गोष्टीचे  ज्ञान आवश्यक आहे.  ‘knowledge is source of income.’ म्हंटले जाते. धनवान बनण्यासाठी ज्ञानवान असणे जरुरी. पण आज फक्त स्थूल धन जगण्यासाठी आवश्यक आहे अस ही नाही. जीवनाची कितीतरी सत्ये परिस्थितीद्वारे आपल्यासमोर स्पष्ट होतात. परंतु त्या वेळी परिस्थिती आपला शिक्षक बनते. सत्याचा बोध होण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा स्पर्श आपल्या बुद्धीला होण्याची गरज आहे. ज्या द्वारे  समस्यांचे  समाधान सहजरीत्या आपण करू शकतो. योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपणास मिळते.

लहान असताना शिकवले जायचे की ‘ देवाला सांग, मला चांगली बुद्धी दे,’ पण  बुद्धी तर सर्वानाच प्राप्त आहे पण सत्यज्ञान, ईश्वराचे प्रेम ह्यांचा स्पर्श जेंव्हा बुद्धीला होतो  तेंव्हा जीवनामध्ये आश्चर्यजनक परिवर्तन घडून येतात. मग त्यासाठी कोणा व्यक्तीची, कायद्याची किंवा बंधनाची गरजच लागत नाही. ते परिवर्तन आपसूकच होऊन जाते. म्हणूनच ईश्वराला ‘पारसनाथ’ ही म्हटले जाते. ज्याच्या स्पर्शाने आपली बुद्धी सोन्यासारखी पवित्र बनते.

Continue Reading

चला, सागर सम बनू या  ……..

काही दिवसांपूर्वी मी ओडीसा येथील चिल्का लेक ला गेले होते. थोड्या अंतरावर संगमला ही गेले. जेव्हा तिथल्या बंगालच्या उपसागराला बघितले आणि मनात आले की खरंच मनुष्याला सागरासमान बनायला हवे. तिकडच्या एका मासेमाऱ्याने आम्हाला शिंपल्यातून तसेच समुद्रातील शेवाळ्याच्या काही तुकड्यातुन अनेक रत्न काढून दाखवले. मोती, पोवळे, निलम, पुष्कराज, पाचू …..…  ते काढून दाखवत असताना तो त्याचे महत्व ही सांगत होता. ज्योतिष शास्त्रामध्ये ह्या रत्नांचे खूप महत्व आहे. आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये ह्यांची अंगठी ही बघतो. मनुष्यांच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो. आश्चर्याचीच  गोष्ट. नाही का ?

पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आज अनेकानेक अडचणी, समस्या येतात. खरंतर बाहेरच्या परिस्थितीचे रूप जे पण आहे ते आपल्या आंतरिक अवस्थेचे प्रमाण आहे. ‘ अंतविश्वामध्ये जे चालले आहे तेच बाह्यविश्वात होत आहे. ’ जसे सागराचे बाह्यरूप बघितले तर तो कधीच शांत नसतो पण त्याच्या तळाशी असीम शांती असते. मनुष्याचे जीवन ही तसेच आहे. बाहेरचे रूप नेहमीच नवनवीन परिस्थितीच्या घेरात अडकलेले दिसते पण त्या सर्व समस्यांची उत्तरे आपल्या अंतर्विश्वामध्येच आहेत. समुद्राच्या तळाशी अनेकानेक अमूल्य रत्न मिळतात त्याच प्रमाणे मनाच्या तळाशी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास मिळत जातात. अनेक रहस्य उलगडली जातात.

बंगालच्या उपमहासागराचे विशाल रूप जेव्हा बघत होते तेव्हा त्याचे ते शुद्ध,स्वछ निळे पाणी दूरपर्यंत दिसत होते. परंतु जेव्हा ते पाणी उफाळून किनाऱ्याजवळ यायचे तेव्हा त्याचा रंग बदललेला असायचा. कधी-कधी आपले ही असेच होते. खूप वेळा आपण स्वतःला समजावतो आज राग करायचा नाही, आज कोणाला दुःख द्यायचे नाही पण अशी काही परिस्थिती आपल्या समोर येते कि आपण किती ही चांगले ठरवलेले असले तरी आपल्याकडून परत-परत त्याच-त्याच चुका होतात अर्थातच आपल्या शुद्ध भावना मनाच्या सागरात विरून जातात आणि अशुद्ध विचार उफाळून बाहेर पडतात. गुण अवगुणांमध्ये परिवर्तित होतात. पण लक्षात असू द्या किती ही लाटा आल्या, किनाऱ्याला वेगाने धडकल्या तरी त्याला परत त्या सागराकडे परतावेच लागते. मनुष्याच्या जीवनात ही तेच आहे आपण किती ही क्रोधीत झालो, आदळ – आपट केली ____ तरी शेवटी आपण प्रेमाचे, शांतीचे, आनंदाचे भुकेले आहोत. आपली धाव परत त्या सुखाच्या सागराकडे, प्रेमाच्या सागराकडेच असते.

सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो.

आपण पाहिले असेल जेव्हा आपण किनाऱ्यावर उभे राहतो तेव्हा अलगद आपले पाय त्या वाळूमध्ये रुतले जातात, खड्डा पडतो. काही वेळाने मात्र समुद्राच्या लाटा त्या जागेला भरून ही काढतात. पण त्याच जागेवर आपण उभे राहीलो तर आणखीन आतमध्ये जाताना दिसतो. जीवनामध्ये ही तसेच आहे  एखादी समस्या आली तर थोड्या वेळासाठी का होईना बुद्धीला त्या समस्येच्या घेऱ्यातून बाहेर काढून अन्य ठिकाणी लावले, विचारांच्या शुद्ध लाटा येऊ दिल्या तर परिस्थितीरूपी खड्डा अलगद भरून येतो पण त्याच परिस्थितीवर वारंवार विचार करत राहिलो तर, ती परिस्थिती आणि खोलवर आपल्याला नेते अशावेळी त्यातून बाहेर पडणे मुश्किल होते.

सागराच्या किनारी कोणी ही उभे राहिले तरी त्याला सागराची विशालता, हवेत थंडावा, शुद्धतेचे दर्शन होते. प्रत्येकाला सारखाच अनुभव होतो. समुद्र सगळ्यांसाठी एक सारखाच असतो. आपण ही सम्पर्कामध्ये येणाऱ्या सगळ्यांसाठी एकसमान रहावे.  मनामध्ये प्रत्येकाप्रति शुभभावना, कल्याणाची भावनाच ठेवावी. ही भावना सर्वांना आपलेसे करील.

विचाराच्या ह्या अथांग सागराला उधाण आले तरी ही त्याच्या तळाशी अनुभवांचे रत्न, ज्ञानाचे रत्न दडलेले आहेत. त्यांना स्वतःकडे साठवत राहा. मनुष्य जीवन खूप अमूल्य आहे. अनेक प्रसंगांनी भरलेले आहे. त्यातून जे योग्य आहे ते सामावून बाकी राहिलेले किनाऱ्यावर सोडून द्या.  सागरासारखे विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेले निरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे ह्या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास ह्या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.

Continue Reading