विचारांची किमया

आपले जीवन एक प्रयोगशाळा आहे. रोज नव नवीन अनुभव घेण्यासाठी विचारांची दिशा बदलून पहावी. कारण जसे विचार तसे जीवन हे समीकरण आहे. त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागेल तरच खरी मजा आहे. शालेय जीवनामध्ये एखादे कठिण समीकरण सोडवले की प्रचंड आनंद व्हायचा. जीवनाच ही तसेच आहे. एखाद्या किचकट परिस्थिती तून खूप कमी वेळात बाहेर पडले की हायसे वाटते. पण ही किमया काय आहे हे जाणून घेऊ या.

बाह्यजगामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूची निर्मिती पहिली अंतर्जगामध्ये होते अर्थातच विचारांमध्ये त्याची निर्मिती होते. वारंवार एकाच प्रकारचे संकल्प मनात चालत असतील तर ते वास्तवात यायला वेळ लागत नाही. मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. कधी-कधी आपण बोलून जातो की ‘ ज्या गोष्टीची मला भीती होती तेच घडलं.’ पण हे लक्षात असू द्या कोणती ही गोष्ट योगायोगाने वा अचानक होत नाही. आपल्या अंतर्मनामध्ये त्या घटनेचे निर्माण आपण कधीतरी केले होते, तेच वास्तवात आले आहे. म्हणून निरर्थक किंवा वाईट गोष्टींचे चित्र मनात रंगवू नये.  कारण आपल्या अंतर्मनाला ‘नाही’ ह्या शब्दाची भाषा समजत नाही. आपण ज्या गोष्टीवर जोर देतो ते वास्तवात येते.

आज आपण वर्तमानपत्राद्वारे, टेलिव्हिजनद्वारे किंवा सभोवताली अनेक घटना होताना ऐकतो, बघतो. दुसऱ्यावर ओढवलेला प्रसंग माझ्या जीवनात तर येणार नाही ना? याची भीती नेहमीच आपल्याला असते. अश्या प्रसंगाचे चिंतन आपण जर वारंवार करत असू तर ते प्रसंग आपल्या जीवनात ही घडू शकतात कारण विचारांच्या माध्यमाने आपण त्या व्यक्तींना, घटनांना आपल्या जीवनात निमंत्रण देत असतो. जसे आपल्या जिवलग मित्र-संबंधीला जर एखादा आजार झाला असेल व आपण मनामध्ये सतत विचार करत असू की हा आजार मला तर नाही ना होणार …… काही वर्षानंतर तो आजार आपल्याला जडलेला आपण अनुभवू शकतो.

समजा काही कारणास्तव आज ऑफीसला जायला उशीर झाला आहे, घरातून निघताना मनात विचार येत असतील की आज तर ट्रेन सुटणार,  ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होणार,  बॉसचा ओरडा खावा लागणार ……..  असे नकारात्मक विचार सतत येत असतील तर तेच साकार होताना आढळतील. कारण विचारांमार्फत आपण आपल्या भविष्यातील घटनांना आकर्षित करतो. हेच विचार सकारात्मकतेकडे वळवले तर त्या घटनांना सुद्धा आकर्षित करू शकतो.

आपल्या जीवनात मिळालेले संबंधी, शरीर, धन ह्या सर्वांना आपण विचाराद्वारे रूप देत असतो. अजाणतेपणाने केलेला व्यर्थ संकल्प ही साकार रूप धारण करू शकतो याची काळजी घ्यावी. ‘ का कोणास ठाऊक नेहमी माझ्याच बरोबर असे का होते,  मलाच अशी लोकं का भेटतात ……’ अशा विचारांना थोडा आळा घालून मनाला प्रशिक्षित करा. रोज सकारात्मक सूचना स्वतःला द्या की  ‘ आजचा दिवस माझा खूप उत्साहाने, सफलतेने भरलेला आहे. माझे प्रियजन मला भेटणार आहेत. माझे प्रत्येक कार्य कुशल आणि सफल होत आहे. जीवनाचे संपूर्ण सुख मला मिळत आहे. माझे शरीर, संबंध, योजना सर्व काही माझ्या इच्छेनुसार घडत आहेत. मी खूप सुखी, आनंदी आहे.’ अश्याप्रकाराचे विचार रोज सकाळी निर्माण केले तर त्याचा प्रभाव दिवसभरात आपण बघू शकतो.

आपले विचार आपल्या जीवनाचे चालक आहेत. ते ज्या दिशेने घेऊन जातील त्या अनुसार आपले जीवन घडत जाईल. ह्या संकल्पांच्या नियमांना ध्यानी ठेवूनच आपण त्याची रचना करावी. जसे भविष्याचे सुंदर स्वप्न मनामध्ये रंगवाल, रोज त्या स्वप्नांना साकार होताना अनुभव कराल तसंतसे ते वास्तविकतेमध्ये होताना जाणवेल. कधी-कधी मस्करीमध्ये पण आपण बोलून जायचे ‘ सोचने में क्या जाता है ?’  खरंच स्वतःबद्दल छान-छान विचार करायला काय जाते ? कल्पनाशक्ती प्रबळ बनवा.

जे आपल्या कल्पनेमध्ये उतरू शकत नाही ते वास्तविकतेमध्ये कसे होईल ? म्हणूनच असंभव कार्य संभव करण्यासाठी पहिले ते कल्पनेमध्ये अनेकदा होताना बघितले तर ते प्रत्यक्ष कसे व्हावे हा विचार आपल्याला करण्याची गरज नाही.  संकल्पांची शक्ती ते असंभव कार्य होण्यासाठी सर्व गोष्टींची सुरेल मांडणी करून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करील. फक्त आपण संकल्पांची पकड सोडता कामा नये.

आपले संकल्प आपल्या जीवनाचा सर्वात मोठा हिस्सा आहेत. अंतर्मनाने ज्या गोष्टींना सत्य समजले त्या गोष्टी आपल्या निकट भविष्यामध्ये साकार होतील. ह्या संकल्पाद्वारे आपले शरीर, संबंध, घटना ……. ह्या सर्वांचे रूप आपण बदलू शकतो. पण थोडेसे धैर्य ठेवावे. कारण संकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल.

Continue Reading

सद्गुरू

         आयुष्यामध्ये एक गुरु तर करायलाच हवा अशी समज आहे. आज आपण बघतो ही की जगामध्ये कितीतरी गुरु आहेत. परंतु परमात्मा आपल्या सर्वांचा परम सद्गुरू आहे. त्याची तुलना कोणाबरोबर करू शकत नाही. जेव्हा शिष्य आपल्या गुरूसमोर जातो किंवा सेवा करतो तेव्हा मनामध्ये एक भावना नक्कीच असते की मी गुरूच्या आशीर्वादाचा पात्र बनू. पण हे सर्व त्या ईश्वरेने निर्माण केलेली माध्यम आहेत. परमात्मा परम सद्गुरु आहे. त्याची कृपा वा आशीर्वाद हवा असेल तर त्यासाठी आपल्याला पात्र बनावे लागेल. त्या परम सद्गुरू ला नक्की आपल्या कडून काय हव ते समजून घेऊ या.

एकदा एक महात्मा एका राज्यसीमेच्या बाहेर आपल्या छोटाश्या झोपडीमध्ये राहून तपस्या करायचे.  त्या राज्यामध्ये ज्यांचे येणे-जाणे व्हायचे ते त्या महात्म्याला नम्र प्रणाम करायचे. महात्मा त्यांच्यावर दृष्टी टाकायचे आणि आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवायचे. त्यांच्या आशीर्वादाने लोकांचे कष्ट दूर व्हायचे.  राज्यामध्ये ही बातमी पसरते की राज्याच्या सीमेवर एक महात्मा आहेत ते सिद्ध पुरुष आहेत.  त्यांच्या आशीर्वादाने सर्व कष्ट दूर होतात.  ही गोष्ट राजा पर्यंत ही पोहोचते.  राजा खूप लालची असतो.  तो विचार करतो की हे महात्मा तर आपल्या राज्यामध्ये हवेत. त्यांच्या कृपेने राज्यातील लोकांचे भले होईल आणि राज्य ही धनधान्याने संपन्न होईल.  राजा आपल्या मनातील गोष्ट मंत्र्याला सांगतो.  मंत्र्याला ही ते पटते.  मग राजा मंत्र्याला सांगतो की महात्माकडे जाऊन हा प्रस्ताव ठेवा व त्यांना हवी तितकी जागा राज्यामध्ये प्राप्त होईल, पण राज्यामध्ये राहण्याची विनंती करा.  मंत्री राजाचा प्रस्ताव घेऊन महात्माकडे जातो.  राजाची विनवणी त्यांच्यासमोर ठेवतो.  आश्रमासाठी हव्या तितक्या सोन्याच्या मोहरा उपलब्ध करून दिल्या जातील असे ही सांगतो.  महात्मा कुटियामध्ये जाऊन लगेच आपले कमंडलू घेऊन बाहेर येतात व मंत्र्याला सांगतात की चला, मी राजाकडे येतो.  मंत्र्याला आश्चर्य वाटते की महात्मा इतक्या लवकर तयार कसे झाले ?  मंत्री ताबडतोब राजाला संदेश पाठवतो की महात्माजी महालामध्ये तुम्हाला भेटायला येत आहेत.  राजा त्यांचा खूप आदर-सत्कार करतो.  राजा परत सर्व बाब महात्म्यासमोर ठेवतो.  महात्माजी आपले कमंडलू पुढे करतात व सांगतात की ह्या कमंडलूमध्ये जितक्या सोन्याच्या मोहरा येतील तितक्या भराव्या.  राजा कमंडलू उचलतो तर त्याला त्याच्यातून खूप दुर्गंध येतो.  तो सेवकांना सांगून पहिले त्या  कमंडलूला स्वच्छ करायला सांगतो.  सेवक खूप चांगले साफ करून कमंडलू चमकवून आणतात.  राजा त्याला सोन्याच्या मोहरांनी भरून महात्माजींच्या समोर ठेवतो.  विनवणी करतो.  महात्माजी काही ही न बोलता मौन धारण करतात.  राजा पुन्हा विनंती करतो पण तरी ही महात्माजी मौन अवस्थेमध्येच राहतात.  राजा पुन्हा त्यांना आशीर्वाद देण्यास सांगतो.  तेव्हा मात्र महात्माजी उत्तर देतात की ‘ पात्र साफ करावे.’  राजाला त्याचे बोलणे कळत नाही.  राजा महात्माजींना अर्थ विचारतात.  तेव्हा महात्माजी सांगतात की राजन, जसे तुला तुझ्या किमती सोन्याच्या मोहरा अस्वच्छ कमंडलू मध्ये टाकायच्या होत्या तर पहिले ह्या कमंडलूला साफ करून घेतले तसेच माझा आशीर्वाद ही अमूल्य आहे.  त्यासाठी मनरूपी पात्र साफ करण्याची गरज आहे.’ तात्पर्य असे की आज मनुष्य देवळा मध्ये तेव्हा जातो जेव्हा त्याला काही हवे असते. काही कांमनापूर्ती साठीच उपवास, व्रत करतो. दान करतो. काही साध्य झाले की विसरून ही जातो. पण ईश्वरा बरोबर प्रेमाच नात जोडण्याची आवश्यकता आहे. त्याला आपल्या कडचे धन नको आहे. आपले मन जर साफ असेल, भावना शुद्ध असतील तर काही न मागता सुद्धा खूप काही प्राप्त होईल. म्हणून मनुष्याला काही आमिष देऊन खुश करतो तसे ईश्वराला खुश करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अशिक्षित पणा आहे, ही चूक कधीही करू नये. भावनेने वाहिलेले बेलपत्र ही तो प्रेमाने स्वीकार करतो. ईश्वराला प्रेमाची भाषा समजते. आपण निस्वार्थ प्रेम केले आणि जर त्याचा आशीर्वाद लाभला तर आपल्या जीवनात सुखांची जणू वर्षाच होईल.

Continue Reading

चला लाऊ या गुणांचा रंग  

       भारत हा एक महान देश मानला जातो जिथे सण, उत्सवा द्वारे मनुष्यामध्ये श्रेष्ठ संस्कारांची निर्मिती केली जाते. एकत्र येणे, मिळून-मिसळून राहणे, माफ करणे …. अश्या सर्व गोष्टींची शिकवण सणांच्या माध्यमाने दिली जाते. अनेक सणांपैकी एक सण आहे ‘होळी’. होळी ह्या सणामागे भक्त प्रल्हाद ची सुंदर कथा आहे. ईश्वरावर अतूट विश्वास असेल तर तो सर्व परिस्थितीतून तारतो ही वास्तविकता त्यांच्या जीवना द्वारे आपण समजतो. ईश्वरीय शक्ति आणि आसुरी शक्तीच्या युद्धा मध्ये ईश्वरीय शक्तींचा विजय होतो ही समज ही मिळते. व्यावहारिक जीवनात खूपदा आपण चुकीची मान्यता ठेऊन चुकीची दिशा निवडतो. कारण चुकीच्या मार्गानी गेलेल्या व्यक्तींना सहज प्राप्ती होताना दिसते. पण ही प्राप्ती क्षणभंगुर असल्याचे ही बघतो. आज instant चा जमाना आहे. चांगल्या मार्गाने केलेला प्रयत्न कष्ट दायक असला तरी त्याचा परिणाम सुखदायी असतो हे मात्र निश्चित.

       होळीचा सण आपण दो दिवस साजरा करतो. होळी अर्थात जाळणे व त्यानंतर रंगपंचमी अर्थात रंगांची उधळण. जाळल्याशिवाय रंग उधळू शकत नाही. होळीच्या दिवशी झाड, सुकलेली लाकड, नारळ, कोकी .. असे अनेक पदार्थ, वस्तूंचा वापर केला जातो. त्याचबरोबर होळीची पूजा प्रेमभावनेने केली जाते. ह्या दिवशी जसे स्थूल वस्तूंना जाळण्याची प्रथा आहे तसेच सूक्ष्म गोष्टींना सुद्धा समाप्त करण्याची गरज आहे. मनुष्य कर्मकांड तर करतो. त्यामुळे आपल्या जीवनात सुख-शांती येईल अशी समज असते पण आपल्या दुःखाचे कारण कोणी दुसरे नाही पण आपलेच विचार आहेत हे लक्षात ठेवावे. जसे ह्या होळीमध्ये जुन्या वस्तु जाळल्या जातात तसेच मनात जुन्या प्रसंगाचा जो साठा केला आहे त्याला जाळण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जोपर्यंत त्या जुनाट गोष्टीना मनातून पूर्णपणे काढून टाकत नाहीत तो पर्यंत आपण शांत होऊ शकत नाहीत. होळी हा सण सर्व जुन्या गोष्टीना विसरून सर्वाना माफ करायची शिकवण देतो.

       कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीसाठी मनात गाठ बाधून ठेवतो की मी ह्या व्यक्तीला कधीच क्षमा करणार नाही. पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे काही नुकसान नाही. त्यांचा त्रास स्वतःलाच होत राहतो. हे समजण्याची गरज आहे. म्हणून ह्या होळीच्या अग्नि मध्ये अश्या बांधलेल्या गाठीना स्वाहा करू या. कारण अग्नि हे परिवर्तन व पवित्रतेचे प्रतीक आहे. अग्नि मध्ये कोणतीही वस्तु टाकली तर त्याचे परिवर्तन होते. आपण ही ह्या अग्निमध्ये सर्व स्वाहा करून आपल्या भावनांना बदलू या. स्वतःला ही कटू भावनांतून मुक्त करू या.  भावनिक रित्या मुक्त झाले तरच सर्वांचा मनस्वी स्वीकार करू शकतो. होळी चा हिन्दी अर्थ घेतला तर हो+ली अर्थात जे झाले ते झाले, आता त्या सर्वांना पूर्णविराम देऊन नवीन सुरुवात करू या. जर ‘होली’ चा इंग्लीश अर्थ घेतला तर ‘पवित्र’. मन पवित्र तेव्हा होऊ शकते जेव्हा मनातील अनेक अशुद्ध भावनांना ह्या अग्निमध्ये दग्ध करू. अर्थातच होळी म्हणजे मनाला पवित्र करण्याचा सण.

मन शुद्ध झाले की सर्व जणू आपलेच आहेत ही भावना जागृत होते. सर्व जे व जसे आहेत त्यांना सामावून घेण्याची शक्ति आपल्यामध्ये येते म्हणून दुसऱ्या दिवशी सर्वाना रंग लावले जातात. हे रंग लावताना देहाचे भान पूर्णपणे विसरून जातो. छोटे-मोठे, जाती-धर्म, लिंग, आपले-परके सर्व काही विसरून एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. कोणी अनोळखी व्यक्तीने रंग लावला किंवा फुगा मारला तरी त्या दिवशी आपण समजून घेतो, रागवत नाहीत. म्हणजेच आपण समजूतदार पणे वागतो. पण हे रोज करण्याची आवश्यकता आहे. कारण रोज आपण छोट्या छोट्या गोष्टींचा त्रागा करतो. एकमेकांना समजून घेण्याची शक्तिच नसते म्हणून आज संबंध दुरावले आहेत. हा दुरावा कमी करण्यासाठी क्षमा करून सर्वांचा स्वीकार करा.

      होळी म्हणजे पुरणाची पोळी. होळीच्या दिवशी खास पुरणपोळी चा बेत असतो. ही पोळी बनवायला थोडी मेहनत लागते पण खाल्यावर मन तृप्त होऊन जाते. संबंधामध्ये गोडवा असेल तर जीवन सुखद वाटते. ह्या संबंधा ना जपण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. थोडासा समजूतदारपणा असेल तर ते आयुष्यभर टिकतात ही. म्हणून थोडंसं नमत घेण्याची सवय लावावी. हे जीवन किती दिवसांचे? ‘दोन घडीचा डाव’ त्यातही असे रूसवे-फुगवे, राग-द्वेष असेल तर जगण्याचे सुख किती मिळेल. म्हणून ह्या सणाच्या निमित्ताने ज्यांचाशी काही कारणास्तव बोलणे बंद केले असेल तर आज सर्व विसरून एक जवळीक निर्माण करू या. आपल्याकडून कोणी दुखावले गेले असेल तर माफी मागू या. आज पासून सर्वांना सुख मिळेल असे काहीतरी करून बघू या. स्थूल रंग लावण्याबरोबर गुणांचा रंग सर्वांना लावण्याचा प्रयत्न करू या. सुख, प्रेम, शांती, आनंद.. .. ह्या गुणांची उधळण करू या. नक्कीच ह्या रंगांनी आपले जीवन ही रंगून जाईल. हे रंग अविनाशी आहेत. ह्या रंगांची उधळण मनाला सुखद अनुभव देऊन जाईल.

Continue Reading

चला करूया एक नवी सुरुवात

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. २०२० बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. ह्या कोरोंना ने आपल्याला खूप काही शिकवले. ‘वेळ पडली तर मनुष्य सर्व काही शिकतो’ ह्याचे प्रत्यक्ष रूप बघायला मिळाले. जी कामे कधीही केली नव्हती ती सर्व ह्या लॉक डाउन मध्ये करायला लागली. काहीनी त्याचा आनंद घेतला, तर काहींनी ‘मजबूरी का नाम जिंदगी’ म्हणत परिस्थिती ला स्वीकार केले. पण वेळेने ते करायला शिकवले. अश्या कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या.

       मनुष्याचे जीवन म्हणजे तडजोड ही आलीच. पण तडजोड नसून तोड-जोड वाले जीवन आहे. समस्या, संबंध, शरीर.. हयामुळे मनाने कितीही तुटले तरी पुन्हा उभे राहणे म्हणजे खरे जीवन. शून्यातून सुरुवात करावी लागली तरी नव्या आशेने, उत्साहाने करणारा मनुष्यच आयुष्याच्या खेळा मध्ये विजयी होतो. खूप काही गमावून ही सर्व काही मिळवण्याची जिद्द ज्याच्या मध्ये आहे तोच यशस्वी होऊ शकतो. म्हणून ह्या नव्या वर्षाची सुरुवात आपण नव्या संकल्पानी करूया.

      तुम्हाला माहीत असेल गरुडाचे आयुष्य ७० ते ७२ वर्षाचे असते. या कालावधीत वयाच्या चाळीशी नंतर त्याची चोच दुबली होते. नख बोथट होतात, पंखावरची पिसे झडू लागतात. त्यामुळे गरुडाला वेगाने उडता येत नाही, भक्ष्य ही पकडता येत नाही. अश्या वेळी निरोगी जीवन जगण्यासाठी गरुडाला कठोर परिश्रम करावे लागतात. पाच महिन्याच्या अज्ञातवासात, निर्जन कडेकपाऱ्यात जाऊन राहावे लागते. ह्या दिवसांमध्ये तो आपली चोच कपारीवर आपटून त्रास सहन करतो. कालांतराने जुनी, दुबळी चोच गळून एक नवीन तीक्ष्ण, दणकट चोच फुटते. नव्या चोचीने बोथट झालेली नखं उपटून काढतो. या वेळीही त्याला असह्य वेदना होतात पण त्याही सहन करून काही दिवसातच टोकदार नखं उगवतात. या नखांचा उपयोग तो त्याच्या शरीरावरील जड पिसे उपटण्यासाठी करतो. आणि १५० दिवसांच्या खडतर कालावधी मध्ये असंख्य पीडा सहन करून गरुडाचा नवा जन्म होतो. नव्या दमाने, जोमाने, उत्साहाने तो पुढील आयुष्य जगतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुद्धा असा कालावधी आला असेल पण जून सर्व विसरून पुन्हा नव्या उम्मीदेने निरोगी, आशावादी, सकारात्मक दृष्टिकोणाने नव्या वर्षाचे स्वागत करूया.

               ‘जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरूनी जावे,

                पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे

जे झाले त्याची खंत करत न बसता, जे शिल्लक राहिले त्याची वाह वाह करत भूतकाळाचा निरोप घेऊया. आज जे आहे त्यात समाधानी राहून प्रत्येक क्षण जीवंत पणे जगू या. जीवंत पणे म्हणण्या पाठी मागे हा उद्देश आहे की प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ या. वर्तमान श्रेष्ठ असेल तर भविष्य नक्कीच चांगले होईल. म्हणून ज्या चुका अजाणते पणी आपल्याकडून झाल्या त्याची पुनरावृती न व्हावी ह्याची काळजी जर घेतली तर नक्कीच मन सदैव आनंदी राहू शकेल. मनाची ओढाताण कमी होईल व भविष्याची सुंदर स्वप्ने साकारायला शक्ति ही मिळत राहील. फक्त वर्तमानात जगण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. त्यासाठी रोज मनाला  सकारात्मक विचारांची ऊब द्यावी. श्रेष्ठ विचारांनी स्वतःला भरपूर करावे. जसे घराबाहेर पडताना आपण आपले पाकीट बरोबर आहे की नाही, त्यात पुरेसे पैसे आहेत की नाही ह्याची तपासणी करतो तसेच रोज आपले मन श्रेष्ठ विचारांच्या पुंजी नी भरलेले आहे की नाही ते ही चेक करावे. शक्तिशाली विचारांचे धन जर बरोबर असेल तर कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करू शकतो. मनाला काही नियमांचे बांध घालून चांगले प्रशिक्षित केले तर आयुष्यातले सर्व उतार- चढाव सुखरूप पार पाडू शकतो.

       चला तर, नवीन वर्षाच्या ह्या प्रथम दिवशी स्वतःशीच प्रतिज्ञाबंध होऊ या. १)कोणतेही दृश्य सामोरी आले तरी न डगमगता खंबीर होऊन प्रत्येक परिस्थितीला मी पार करेन.

२)प्रत्येक वेळी सकारात्मक राहून आयुष्याचा एक एक क्षण अविस्मरणीय बनावा असे मी स्वतःला बनवेन.

३)माझी आणि माझ्या कुटुंबाची जवाबदारी नीट पार पाडेन आणि त्यासाठी स्वतःला निमित्त समजून निश्चिंत होऊन पूर्ण करेन.

४) ईश्वराने जे काही दिले त्याचे मनापासून आभार व्यक्त करून, जे आहे त्याला बेस्ट बनवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन.

अश्या प्रकारे आयुष्याची नवीन सुरुवात करूया. नव्या संकल्पनेने नवे विश्व निर्माण करू या. ब्रहमाकुमारी संस्थे तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

Continue Reading
1 2 3 6