हा खेळ सावल्यांचा

‘ रात्रीस खेळ चाले, ह्या गूढ चांदण्यांचा,संपेल ना कधी ही, हा खेळ सावल्यांचा ’

    मनुष्याबरोबर सतत राहणारी त्याची सावली.  ही सावली प्रत्येकाची आपली आपली.  कधी पुढे तर कधी पाठी.  पण नेहमीच साथ देणारी.  सूर्याशी जसा आपला संबंध त्या अनुसार लहान-मोठी होणारी ही सावली.  शाळेत असताना भूगोल शास्त्रामध्ये शिकवले जायचे की सूर्याच्या समोर उभे राहिले की आपली सावली आपल्या पाठीमागे असते पण ते जर सूर्याशी पाठ करून उभे राहिले तर सावली आपल्या पुढे-पुढे चालते.  पण ह्या शास्त्राच्या नियमामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत.  

आपले कर्म सावली सारखे आपल्याबरोबर चालतात.  सावलीला किती ही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ही ती वेगळी होऊ शकत नाही.  तसेच आपल्याच कर्मांपासून किती ही लांब पाळण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याच वेगाने आपल्याबरोबर धावत राहतात.  हे कर्म फक्त एका जन्मापर्यंत पाठलाग करतात असे नाही पण जन्मोजन्मी आपल्याबरोबर चालतात.  म्हणूनच आपल्या समोर अचानक एखादी घटना आली की आपण बोलतो माहित नाही हे कोणत्या कर्माचे फळ आहे.  मग ती घटना सुखाची असो वा दुःखाची. 

आपण हे ही अनुभवले असेल की एखाद्या व्यक्ती, वस्तूच्या पाठी जितके आपण धावतो तितकेच ते दूर जातात.  पण त्याच्याकडे पाठ केली की ते आपल्या पाठी-पाठी येतात.  आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आपण अनुभवले असतीलच.  काही गोष्टींमध्ये नशिबाचा भाग ही असतो.  प्रयत्नशील राहण्याची मात्र गरज आहे.  आपल्या जीवनामध्ये सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो.  ज्यावेळी आपण त्याच्या साधनेमध्ये मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते.   पण जेव्हा ईश्वराशी पाठ करून वैभव, व्यक्ती, वस्तू….. ह्यांना साध्य करण्यासाठी धावतो तेव्हा त्या गोष्टी आपल्यापासून दूर जाताना बघतो.   ईशभक्ती आपल्याला शक्ती, मदत तसेच अचूक कर्म करण्याचा रस्ता दाखवते. ईश्वराशी बुद्धीने जोडलेले असल्याने चांगले-वाईटची  समज मिळते.  म्हणूनच नेहमीच त्या सूर्याकडे आपली नजर असावी. 

भक्तीमध्ये सुर्योपासनेचे, सूर्य नमस्काराचे खूप महत्व आहे.  सूर्याला जल चढवणे, नमस्कार करणे, सूर्याची कोवळी किरणे मिळावी ह्यासाठी सकाळी व्यायाम करणे ह्या सर्व गोष्टी आपण करतच असू पण ज्ञानाचा, शक्तींचा स्रोत, ह्या प्रकृतीचा मालक ईश्वर आहे.  त्याच्या सानिध्यात सकाळी लवकर उठून नामस्मरण, त्याची आठवण करणे ह्या सर्व गोष्टी मनाला शक्तिशाली बनवतात.  मन-बुद्धी जर शक्तिशाली असेल तर दिवसभरामध्ये केलेले छोटे-मोठे कर्म श्रेष्ठ कर्म बनतात.  कर्म चांगले असतील तर स्वतःला समाधान ही मिळते.  मग कर्माची सावली छोटी असो वा मोठी त्याची भीती वाटणार नाही.  काहींना आपल्याच सावलीची भीती वाटते तसेच केलेल्या कर्माची जाण असल्याने आपणच चिंता, भय ह्यांनी ग्रस्त होतो.  म्हणून कर्माचे नियम, कर्मफळ ह्याबद्दल सतत जागृत राहण्याची आवश्यकता आहे. 

वास्तविक आपले जीवन कर्मांचा खेळ आहे.  कधी कोणत्या डावात आपली हार किंवा जय होईल हे आपल्यालाच माहित नाही.  कारण हा खेळ जन्मोजन्मीचा आहे.  जसं खेळामध्ये सतर्क राहावे लागते मग तो खेळ कोणता ही असो.  तसेच कर्मामध्ये सुद्धा नेहमी जागृत राहण्याची आवश्यकता आहे.  हा खेळ कधी ही न संपणारा आहे.  काही कर्मांपासून मुक्त व्हायचे असेल तर जितके दुःख दिले असेल तर तितकेच दुसऱ्यांना सुख देऊन तो हिशोब संपवायला हवा. किंवा साफ मनाने ईश्वरासमोर आपल्या चुका सांगून, माफी मागून त्यांना हलके करायला हवे किंवा इतके श्रेष्ठ कर्म करावे की पुण्याचे बळ आपल्यासाठी काम करत राहील व येणाऱ्या समस्यांना शक्तिशाली बनून पार करावे.  हा खेळ खूप रहस्यांनी भरलेला आहे.  त्याला समजण्यासाठी मनाला शांत ठेवावे. 

विचारांना शांत करण्यासाठीच ईश्वराला प्रेमाने आठवण करण्याची सवय लावावी.  मन प्रसन्न राहीले की किती ही वाईट परिस्थिती समोर उभी राहिली तरी ही त्याला सहज दूर करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते.  अज्ञानाच्या रात्रीला दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा.  हा प्रकाशच आपले मार्गदर्शन करत राहील. 

You may also like

23 Comments