सुप्रभात

             आकाशामध्ये पसरलेली सूर्याची लालिमा, हळूच डोकावणारा सूर्य, पक्षांची किलबिल, वातावरणामध्ये हवेचा मंद झोका, मंदिरामध्ये लावलेल्या भक्तिगीतांचा सुमधुर आवाज कानी पडत होता.  ‘ चला, सकाळ झाली, आता उठा, कामावर जायचे आहे ना ? ’ स्वतःशीच संवाद झाला. मोबाईलवर नजर पडली. सुप्रभात, Good morning चे message यायला सुरुवात झाली. कधी-कधी तर message वाचायला ही वेळ नसतो.  फक्त Gm टाइप करून पाठवले जाते. आज Good morning करायची तर फॅशनच झाली आहे. लहान असताना कित्येकदा कानावर शब्द पडायचे ‘ सकाळी-सकाळी कोणाचे तोंड बघितले कोणास ठाऊक ? ’ नुकसान झाल्यावर कोणाला प्रथम बघितले हा प्रश्न स्वतःलाच विचारला जायचा आणि आज सर्वप्रथम मोबाईलवर कित्येकांना एकाचवेळी बघतो. 

खरंच ह्या message ने आपली सुप्रभात होते ?  उठता क्षणी कामाचा रगाडा, मित्रमंडळी …. जर आठवत असतील तर एखाद्या message ने Bad morning सुद्धा होऊ शकते.  घरामधले वरिष्ठ आपल्याला शिकवायचे की डोळे उघडताच क्षणी मुखावर भगवंताचे नाव, सगळ्यांसाठी शुभभावना मनामध्ये असेल तर रोज आपली प्रभात सुरेख होऊ शकेल.  आपल्या मनामध्ये शक्तींचा भंडार आहे. फक्त स्मृतीचा switch चालू करण्याची गरज आहे. अनिष्ट गोष्टींचा प्रभाव मनावर खोलवर होतो पण असे कोणाचेच जीवन नाही की ज्यामध्ये काहीच चांगले झालेले नाही.  फक्त स्मृतिकोशामध्ये काय भरले आहे हे बघण्याची गरज आहे. 

दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांची धूळ घेऊन आपण काम करत असतो आणि त्याच मळलेल्या मनाला घेऊन झोपी जातो.  विज्ञान ही ह्या गोष्टीला मान्यता देते की ज्या विचारांनी आपण झोपी जातो त्याच विचारांनी आपली सुरुवात होते. शरीर उठण्याआधी मन उठते. ह्या गोष्टींचा अनुभव करून पहा. 

जसे सकाळी जर काही खावंसं वाटलं तर फळे, ड्रायफ्रूट किंवा पचायला हलके पदार्थ आपण खातो.  कोणी आपल्याला बटाटावडा, सामोसा दिला त्याचा स्वीकार करत नाही कारण आपल्याला माहित आहे की सकाळीच असे पदार्थ खाल्ले तर प्रकृती बिघडू शकते तसेच पहाटेच्या वेळी अंतर्मन जागृत असते अशा वेळी आपला पहिला संकल्प शक्तिशाली, श्रेष्ठ असेल तर तो वास्तवात सुद्धा येऊ शकतो.  म्हणून दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी, आनंदी विचारांनी करावी. पूर्ण दिवसाला चार भागांमध्ये वाटले जाते. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. ह्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सकाळ. ही सकाळ जर उत्साहाने, स्फुर्तीने झाली तर पूर्ण दिवसाची तन आणि मन दोघांची क्षमता रात्रीपर्यंत चालते.  जसे आपण घरातून बाहेर निघण्याआधी मोबाईलला full charge करतो कारण माहित आहे की पूर्ण दिवसामध्ये त्या मोबाईलद्वारे अनेक कामे करायची आहेत. तसेच ह्या मनाद्वारे मला दिवसभर काम करायचे आहे तर ह्याला ही full charge करायला हवे. जर मनाचे charging ठीक झाले नसेल तर दिवसभरात आलेल्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपण असमर्थ होऊ शकतो. म्हणून दिवसाची सुरुवात काळजीपूर्वक करावी. 

‘प्रथम तुला वंदितो कृपाळा …… ‘ उठता क्षणी मनःपूर्वक ईश्वराचे आभार मानावे की एक नवीन दिवस माझ्या जीवनामध्ये आणला. ह्या शरीराचे आभार मानावे, प्रत्येक अंगाने जी साथ दिली ज्यामुळे जीवनाचा आनंद लुटू शकतो, त्याबद्दल हजारो धन्यवाद द्यावे.  जे कुटुंबाचे सदस्य, तसेच आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्ती, त्यांच्याकडून मिळालेले प्रेम, अनुभव ह्या सर्वांसाठी त्यांचे ही आभार मानावे. निसर्गाचे सुद्धा खूप ऋण आपल्यावर आहेत त्यासाठी तिचे ही आभार …. असे धन्यवाद देऊन मनाला सुखद अनुभवाने भरून टाकावे.  त्याचबरोबर आजचा हा दिवस माझ्यासाठी सुखाची भेट घेऊन आला आहे. आज सर्व कार्यामध्ये मला यश लाभणार आहे. सर्व कामे सुरळीत पार पडणार आहेत अशी भावी सुंदर व श्रेष्ठ विचारांनी दिवसाची सुरुवात केली तर प्रत्येक क्षणी आनंदी, उत्साही आणि यशाने भरलेला अनुभवायला मिळेल. 

सुंदर व श्रेष्ठ विचारांनी आपली सकाळ चांगली बनवा व हे गूढ सर्वांना सांगा तरच आपण आपली या दुसऱ्याची morning good बनवू शकतो. 

You may also like

30 Comments