सवयींचे कैदी

भूतलावर असणाऱ्या प्रत्येक प्राण्याला स्वतंत्रता पसंद आहे. पिंजऱ्यामध्ये कैद असलेला कोणताही प्राणी आनंदी असू शकत नाही. भारताचा ही स्वतंत्रता दिवस आपण आज ही साजरा करतो कारण ह्या दिवशी भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. बाह्य जगामध्ये सर्वांनाच स्वतंत्र राहणे आवडते. विचारांची, वागण्याची, मते मांडण्याची आणि सर्वोपरी जगण्याची स्वतंत्रता सर्वाना हवी. आज ही स्वतंत्रता आपल्याकडे आहे. पण खरच आपण स्वतंत्र आहोत?
काही वर्षांपूर्वी मनुष्याला वेळेची, नात्यांची, समाजाची बंधने होती. पण आज ह्या सर्वांवर ही मात करून रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून मानव धनार्जन करीत आहे. ज्या व्यक्तींबरोबर सुख-दुःखामध्ये साथ देऊ अशी अग्निसाक्ष दिली त्यांना ही सोडण्याची स्वतंत्रता मिळाली आहे. पण अश्या स्वतंत्र मनुष्याला गुलाम बनवणाऱ्या त्याचाच सवयी आहेत. आज मानव स्वतःच्या सवयींचा कैदी झाला आहे. ही कैद दिसून येत नाही. पण मन-बुद्धीला डांबून ठेवणारी आहे. ह्या सवयी म्हणजेच मनुष्याचा दुसरा स्वभाव ज्याला second nature ही म्हटले जाते. कोणाला सिगरेट, दारू, विडी, तंबाखू ह्यांचे व्यसन लागते तर कोणाला चहा, चोकलेट, कुरकुरे, गोड पदार्थ खाण्याची ही सवय असते. ते खाल्याशिवाय त्यांना चुकचुकल्या सारखे वाटते. मग ते मिळवण्यासाठी एखादी चोरी किवा लपून चापून ही चुकीचे कार्य करावे लागते. अशा सवयींचे गुलाम आपण सर्वच आहोत.
आपण सवयीनुसार जगणारे प्राणी आहोत. सवय हे आपल्या अचेतन मनाचे कार्य आहे. पोहणे, सायकल चालवणे, नृत्य करणे या गोष्टी शिकत असताना त्याचा वारंवार सराव तोपर्यंत करतो जोपर्यंत त्या कार्याच्या सुस्पष्ट खुंना किवा त्याचे ठसे आपल्या अचेतन मनावर उमटत नाहीत. अचेतन मन त्या कृत्याचा सवयींच्या रुपात ताबा घेते. चांगल्या किवा वाईट सवयी निवडण्याची स्वतंत्रता सर्वांनाच आहे. जर आपण ठराविक काळ वाईट विचार केला वा वाईट कृती केली तर तसा विचार वा कृती करण्याची सवय आपल्याला जडते व त्या कृत्याची पुनरावृत्ति करण्यास आपण भाग पडतो.
व्यक्तीने कोणतीही सवय स्वतःला लावून घेतली तर ती सवय त्याचा पाठलाग करत राहते आणि हे फक्त ह्या जन्मी नाही परंतु दुसऱ्या जन्मी ही ती सवय आपले कार्य करते. नवभारत टाइम्स मध्ये ३० जून १९६८ ला पुनर्जन्मावर एक सत्य घटना प्रकाशित करण्यात आली होती. कृष्ण किशोर आणि कृष्ण कुमार दोन जुळी मुले जन्माला आली. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एकदा कृष्ण किशोरला आई विचारते की तू कृष्ण कुमारवर इतके प्रेम का करत ? तेव्हा तो उत्तर देतो की ‘ तो पूर्वजन्मामध्ये माझा रसोईया होता. आणि तो हे ही सांगतो की मला ह्या घरचे जेवण आवडत नाही कारण मी ज्या घरी राहायचो तिथे खूप स्वादिष्ट जेवण बनवले जायचे. छान-छान मिठाई बनवायचे. माझ्याकडे एक बंदूक, दोन कार आणि एक मोठे घर ही होते. त्या घरामध्ये माझी पाच मुले आणि पाच सुना ही राहायच्या. माझे नाव ‘ पुरुषोत्तम ’ होते. एकदा त्याने आपल्या आईकडे मिठाई मागितली तेव्हा त्याला साखर दिली गेली. साखर पाहून तो डिश फेकून देतो व जोरजोरात रडू लागतो व बोलू लागतो की ‘ मला जर माझ्या घरी घेऊन नाही गेले तर मी मरून जाईन.’ ह्यावर त्याची आई व काका शोध घेऊ लागतात की मुलगा जे बोलतोय ते खरंच आहे का ? ह्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केल्यावर मुलाच्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतात.
पूर्वजन्माची रसगुल्ला (मिठाई) खाण्याची सवय इतकी पक्की आहे की ह्या जन्मामध्ये हे मिळत नाही म्हणून कृष्णकिशोर दुःखी आहे. पूर्वजन्माची श्रीमंती आजच्या गरीब घरातील वस्तुस्थितीला स्वीकारू शकत नाही. एखादा खाण्यापिण्या चा संस्कार ही आत्म्याला दुसऱ्या जन्मामध्ये सतावू शकतो म्हणून आपल्याला जर अशा काही सवयी असतील तर जरूर सोडाव्या.
तात्पर्य असे की तो पदार्थ, वस्तू जर मिळाली नाही तर आपण कासावीस होतो, दुःखी कष्टी होतो. म्हणून अश्या सवयींच्या कैदेतून स्वतःला मुक्त करावे. आज सर्वत्र आपण बघतो की मद्यासक्तीने मनुष्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. कुटुंब, नोकरी, शरीर सर्वांनाच गमावून बसला आहे. मद्यासक्तीची सवय व्यक्तीला मरणाच्या घाटापर्यंत घेवून जाते. तिथुन परत येण्याची शक्ती सगळ्यांकडे नसते. सवयींचे गुलाम बनल्याने स्वतः दुःखी व कुटुंबीय ही दुःखी होतात. म्हणून अश्या सवयींच्या पाशातून मुक्त होण्याची तयारी करावी.
एखादी सवय जडली तर त्यातून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम मनाची प्रबळ इच्छा हवी. मनाला सकारात्मक सवय लावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची क्षमता वाढवावी. तेव्हाच आपण जुन्या सवयींना सोडण्यात यशस्वी होऊ. त्या पदार्थाची तलब जेव्ह्या मनाला कमजोर करू पाहिलं तेव्हा स्वतःशी शक्तिशाली संवाद करा, मनाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. मनाला एखाद्या चांगल्या कामामध्ये गुंतवण्याचा पर्यंत करा. असे रोज त्या चुकीच्या सवयींना postpone करत गेले तर नक्कीच आज नाही तर उद्या आपण सफल होऊ.

You may also like

51 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *