सद्गुरू

         आयुष्यामध्ये एक गुरु तर करायलाच हवा अशी समज आहे. आज आपण बघतो ही की जगामध्ये कितीतरी गुरु आहेत. परंतु परमात्मा आपल्या सर्वांचा परम सद्गुरू आहे. त्याची तुलना कोणाबरोबर करू शकत नाही. जेव्हा शिष्य आपल्या गुरूसमोर जातो किंवा सेवा करतो तेव्हा मनामध्ये एक भावना नक्कीच असते की मी गुरूच्या आशीर्वादाचा पात्र बनू. पण हे सर्व त्या ईश्वरेने निर्माण केलेली माध्यम आहेत. परमात्मा परम सद्गुरु आहे. त्याची कृपा वा आशीर्वाद हवा असेल तर त्यासाठी आपल्याला पात्र बनावे लागेल. त्या परम सद्गुरू ला नक्की आपल्या कडून काय हव ते समजून घेऊ या.

एकदा एक महात्मा एका राज्यसीमेच्या बाहेर आपल्या छोटाश्या झोपडीमध्ये राहून तपस्या करायचे.  त्या राज्यामध्ये ज्यांचे येणे-जाणे व्हायचे ते त्या महात्म्याला नम्र प्रणाम करायचे. महात्मा त्यांच्यावर दृष्टी टाकायचे आणि आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवायचे. त्यांच्या आशीर्वादाने लोकांचे कष्ट दूर व्हायचे.  राज्यामध्ये ही बातमी पसरते की राज्याच्या सीमेवर एक महात्मा आहेत ते सिद्ध पुरुष आहेत.  त्यांच्या आशीर्वादाने सर्व कष्ट दूर होतात.  ही गोष्ट राजा पर्यंत ही पोहोचते.  राजा खूप लालची असतो.  तो विचार करतो की हे महात्मा तर आपल्या राज्यामध्ये हवेत. त्यांच्या कृपेने राज्यातील लोकांचे भले होईल आणि राज्य ही धनधान्याने संपन्न होईल.  राजा आपल्या मनातील गोष्ट मंत्र्याला सांगतो.  मंत्र्याला ही ते पटते.  मग राजा मंत्र्याला सांगतो की महात्माकडे जाऊन हा प्रस्ताव ठेवा व त्यांना हवी तितकी जागा राज्यामध्ये प्राप्त होईल, पण राज्यामध्ये राहण्याची विनंती करा.  मंत्री राजाचा प्रस्ताव घेऊन महात्माकडे जातो.  राजाची विनवणी त्यांच्यासमोर ठेवतो.  आश्रमासाठी हव्या तितक्या सोन्याच्या मोहरा उपलब्ध करून दिल्या जातील असे ही सांगतो.  महात्मा कुटियामध्ये जाऊन लगेच आपले कमंडलू घेऊन बाहेर येतात व मंत्र्याला सांगतात की चला, मी राजाकडे येतो.  मंत्र्याला आश्चर्य वाटते की महात्मा इतक्या लवकर तयार कसे झाले ?  मंत्री ताबडतोब राजाला संदेश पाठवतो की महात्माजी महालामध्ये तुम्हाला भेटायला येत आहेत.  राजा त्यांचा खूप आदर-सत्कार करतो.  राजा परत सर्व बाब महात्म्यासमोर ठेवतो.  महात्माजी आपले कमंडलू पुढे करतात व सांगतात की ह्या कमंडलूमध्ये जितक्या सोन्याच्या मोहरा येतील तितक्या भराव्या.  राजा कमंडलू उचलतो तर त्याला त्याच्यातून खूप दुर्गंध येतो.  तो सेवकांना सांगून पहिले त्या  कमंडलूला स्वच्छ करायला सांगतो.  सेवक खूप चांगले साफ करून कमंडलू चमकवून आणतात.  राजा त्याला सोन्याच्या मोहरांनी भरून महात्माजींच्या समोर ठेवतो.  विनवणी करतो.  महात्माजी काही ही न बोलता मौन धारण करतात.  राजा पुन्हा विनंती करतो पण तरी ही महात्माजी मौन अवस्थेमध्येच राहतात.  राजा पुन्हा त्यांना आशीर्वाद देण्यास सांगतो.  तेव्हा मात्र महात्माजी उत्तर देतात की ‘ पात्र साफ करावे.’  राजाला त्याचे बोलणे कळत नाही.  राजा महात्माजींना अर्थ विचारतात.  तेव्हा महात्माजी सांगतात की राजन, जसे तुला तुझ्या किमती सोन्याच्या मोहरा अस्वच्छ कमंडलू मध्ये टाकायच्या होत्या तर पहिले ह्या कमंडलूला साफ करून घेतले तसेच माझा आशीर्वाद ही अमूल्य आहे.  त्यासाठी मनरूपी पात्र साफ करण्याची गरज आहे.’ तात्पर्य असे की आज मनुष्य देवळा मध्ये तेव्हा जातो जेव्हा त्याला काही हवे असते. काही कांमनापूर्ती साठीच उपवास, व्रत करतो. दान करतो. काही साध्य झाले की विसरून ही जातो. पण ईश्वरा बरोबर प्रेमाच नात जोडण्याची आवश्यकता आहे. त्याला आपल्या कडचे धन नको आहे. आपले मन जर साफ असेल, भावना शुद्ध असतील तर काही न मागता सुद्धा खूप काही प्राप्त होईल. म्हणून मनुष्याला काही आमिष देऊन खुश करतो तसे ईश्वराला खुश करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अशिक्षित पणा आहे, ही चूक कधीही करू नये. भावनेने वाहिलेले बेलपत्र ही तो प्रेमाने स्वीकार करतो. ईश्वराला प्रेमाची भाषा समजते. आपण निस्वार्थ प्रेम केले आणि जर त्याचा आशीर्वाद लाभला तर आपल्या जीवनात सुखांची जणू वर्षाच होईल.

You may also like