महाशिवरात्रि

भारत हा एक धार्मिक देश मानला जातो.  इथे अनेक देवी-देवतांच्या प्रतिमांची पूजा-अर्चना केली जाते.  त्या मुर्तींवर जीवापाड प्रेम केले जाते.  असाच एक दिवस ‘महाशिवरात्रि’ चा आहे. शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहून, व्रत-उपवास करून मनोकामना पूर्ण व्हावी, ह्यासाठी आराधना केली जाते. ह्या दिवसाचे नक्की काय महत्व आहे तसेच लिंग रूपामध्ये ‘ शिव ’ ह्याची का पूजा केली जाते ?  अशा अनेक गोष्टींवर आपण प्रकाश टाकू या.

‘ सत्यम,शिवम, सुंदरम ’ असे वर्णन ज्याचे होते,  ज्याचे दर्शन करण्यासाठी गाभाऱ्यामध्ये किंवा उंच पर्वतावर जावे लागते.  असे हे ईश्वराचे लिंग रूप भारतामध्ये अनेकानेक नावाने प्रसिद्ध आहे.  ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ’ म्हणून प्रकाश स्वरूपात असलेल्या ईश्वराला ज्ञानाचा प्रकाश देऊन मार्ग दाखव अशी प्रेमळ विनवणी केली जाते.  हे ज्योती स्वरूप लिंग रूपामध्ये पूजले आहे.  ईश्वर हा देह आणि देहाच्या पदार्थापासून अलिप्त आहे.  जन्म-मृत्यू, सुख-दुःख ……  ह्या चक्रामध्ये न फसणारा ईश्वर, सर्व मनुष्य मात्रला सर्व बंधनातून मुक्त करण्याची शक्ती बाळगतो. अश्या ईश्वराच्या अवतरणाचा हा दिवस म्हणजे ‘ महाशिवरात्रि ’

ही रात्र म्हणजे फक्त एका रात्रीची गोष्ट नाही परंतु वर्तमानात जी वेळ चालू आहे, ज्याला कलियुग म्हटले जाते.  ह्या कलयुगीं रात्रीचे हे प्रतीक आहे.  ह्या कलियुगामध्ये दिवसाढवळ्या ही वाईट कृत्ये केली जात आहेत.  ह्या वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी शिव परमात्म्याचे अवतरण होते.  ह्या आगमनालाच ‘ महाशिवरात्रि ’ म्हणून संबोधले आहे.  मनुष्यानुरूप जन्म न घेता त्यांचा परकाया प्रवेश होतो म्हणून मंदिरामध्ये शिवलिंगाचा प्रवेश मंदिराच्या दरवाजातून न होता वरच्या भागातून (गुंबज) मधून केला जातो.  संपूर्ण मंदिर  बांधून फक्त कळसाचा भाग रिकामा ठेवून तिथून त्यांचा मंदिरामध्ये प्रवेश होतो.  जसे रस्त्यावर उभे राहून आपण कोणत्या ही देवी-देवतांचे दर्शन करू शकतो.  पण शिव मंदिरामध्ये गाभाऱ्याजवळ उभे राहून त्यांचे दर्शन होते.  अर्थात मनाच्या खोल गाभाऱ्यात, विचारांची एकाग्रता जेव्हा होईल तेव्हाच ईश्वराचे दर्शन आपण करू शकतो.

मंदिरामध्ये काही प्रतीकात्मक रूप आपण बघतो जसे नंदी, साप , कासव, त्रिपुंड, कलश …… ह्यांचे अर्थ समजून घेतले तर नक्कीच खरे शिवदर्शन आपण करू शकू.

नंदी:- शिवलिंगाचे दर्शन करण्याआधी नंदीला प्रणाम केला जातो व त्यांच्याद्वारे शिवाचे दर्शन करण्याची प्रथा आहे.  नंदी अर्थात प्रत्येक गोष्टीला हामी भरणारा.  नंदीच्या कानामध्ये काही सांगितले तर ते शिव परमात्म्यापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे.  शिव निराकार ज्योती स्वरूप आहे.  ह्या धरावर  येऊन कार्य करण्यासाठी त्यांना सुद्धा मनुष्य तनाचा  आधार घ्यावा लागतो.  त्या तनाद्वारे ते आपले कार्य करून घेतात म्हणून नंदीचा प्रथम मान आहे.

साप  :-  शिवलिंगाभोवती सापाचा विळखा दाखवला जातो.  साप विषारी प्राणी आहे.  अर्थातच विषय-विकार रुपी सापावर पूर्णपणे अधिपत्य ह्या शिव परमात्म्याचे आहे.  म्हणूनच ह्या विकारांचा त्यांच्यावर काही ही परिणाम होऊ शकत नाही.  हे त्यांच्याद्वारे दाखवले जाते.

त्रिपुंड :-  शिवलिंगावर त्रिपुंड तसेच नेत्र ही दाखवले जाते.  ईश्वर सृष्टीच्या आदि-मध्य-अंत चा ज्ञाता आहे. त्याचबरोबर दिव्यदृष्टिदाता आहे.  आज आपल्याला एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान नसेल तर आपण म्हणतो कि ‘ ईश्वर जाणतो, तो सर्वांना बघतो आहे.’  जे आपण ह्या स्थूल नेत्रांनी बघू शकत नाहीत, ते तो दिव्य नेत्रांनी बघतो.  हा त्याचा भावार्थ आहे.

कासव :-  ईश्वराचे दर्शन मन-बुद्धीच्या एकाग्रतेनेच होऊ शकते.  म्हणूनच गाभाऱ्यामध्ये कासवाला ठेवले जाते.  आपण जाणतो की कासवाला जेव्हा कार्य करायचे असेल, तर तो आपल्या कर्मेंद्रियांना बाहेर काढतो.  कार्य झाले की गपचूप बसून राहतो.  आपल्याला सुद्धा कर्मांचा विस्तार आणि सार ह्यांची समज ठेवायला हवी.  कारण आपण परिस्थितींचा विस्तार सहज करू शकतो पण त्याचे सार समजून, मनाला त्यामध्ये न अडकवता पुढे जाण्याची कला येत नाही.  वारंवार मनामध्ये प्रश्नचिन्हे उभी राहतात.  प्रश्नाच्या जाळ्यामध्ये न अडकता जीवनामध्ये पुढे जायला शिकायचे आहे.  त्यासाठी मनाची एकाग्रता असणे तसेच ईश्वर स्मृतीचा आनंद घेणे हे गरजेचे आहे.

बेलपत्र :-  तीन पानांचे बेलपत्र ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ह्यांचा रचनाकार शिव निराकार आहे, हे त्याचे प्रतीक आहे.  सृष्टीची स्थापना, विनाश आणि पालना करण्याचे कर्तव्य ह्या तीन देवतांद्वारे शिव परमात्मा करतात.

धोतऱ्याचे फुल, तगर  :-  देवी-देवतांच्या मंदिरामध्ये रंगबिरंगी सुवासित फुले आपण बघतो पण शिव  मंदिरामध्ये धोत्रा,तगर ….. ज्यांना रंग आणि गंध ही नाही अशी फुले बघतो.  अर्थातच परमात्मा सर्व आत्मांचा पिता आहे.  वडिलांना आपली मुलं कशी ही असली तरी प्रिय असतात.  तसेच शिव हे आपले पिता आहेत, त्यांना ही आत्म्यामध्ये किती ही विकार, अवगुण असले तरी सर्व प्रिय आहेत ते त्याचे प्रतीक आहे.

कलश :- शिवलिंगावर सतत जल पडत रहावे म्हणून कलश ठेवला जातो.  आपले मन एक कलश प्रमाणे आहे.  विचारांचा एक-एक थेंब हा ईशप्रीतिने भरलेला असावा.  त्याचा स्मृतीचे जल सतत पडत रहावे.  ज्याने आपले जीवन सुख-शांतिने भरपूर व्हावे.  अशी सुंदर संकल्पना ह्या पाठीमागे केली आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष जागरण आणि उपवास केले जातात.  ह्या कलीयुगामध्ये पापाचार, दुराचार, अत्याचार …. वाढत आहे.  अशा वेळी ह्या वाईट वृत्ती आपल्यामध्ये वाढू नयेत म्हणून जागृत राहण्याची गरज आहे.  त्याच बरोबर उपवास अर्थात ह्या दिवशी खास वेळ काढून ईशस्मृतीने मनाचा कलह, क्लेश दूर व्हावा ह्यासाठी थोडे ध्यान करणे.  शरीराचा उपवास तर करतोच पण वाईट विचारांना आज तिलांजली देण्याचा हा दिवस आहे.

चला तर, ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरामध्ये असलेल्या अनेक प्रतिमांचा अर्थ समजून त्यांचे ध्यान करू या.  मनाच्या गाभाऱ्यात जाऊन एकाग्रतेने त्यांचे दर्शन करू या.

You may also like

19 Comments