मन – एक संग्रहालय

भले बुरे ते घडून गेले, विसरुनी जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर………

सर्व ब्रह्मवत्सांना संगमयुगावर मिळालेला हा नवीन जन्म, ह्या जन्मामध्ये चांगले-वाईट जे काही आपण आपल्या मनाच्या तिजोरीत बंद करून ठेवले आहे त्याला ईश्वर चरणी स्वाहा करण्याची ही उत्तम वेळ आहे. ह्या चंचल मनामध्ये जे काही साठवून ठेवले आहे, तो पर्यंत त्या सर्व गोष्टी, प्रसंग आपण Delete  (काढून टाकत) करत नाहीत तो पर्यंत शिवबाबाकडून जे रोज मुरलीद्वारे नवीन, निराळे ज्ञान मिळत आहे त्याचा संग्रह होऊ शकत नाही.

एखाद्या वस्तुसंग्रहालयामध्ये  कितीतरी वर्षांपूर्वीच्या वस्तू विशेष जमा केल्या जातात.  त्यांना बघण्यासाठी मनुष्य खास त्याठिकाणी भेट देतात.  आपल्या ह्या जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगातून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनामध्ये लाभ होऊ शकतो.  पौराणिक काळातील अनेकानेक राजे जे शूरवीर होऊन गेले, त्यांच्या छोट्या-छोट्या वस्तू जसे चमचे, सूरी, बटण….      ह्यांना सुद्धा सांभाळून ठेवले जाते.  शिवबाबा तर आपल्याला त्याच्याही आधीचा काळ स्मृतीत आणण्यासाठी रोज मुरली मध्ये सत्ययुगी दुनियेचे वर्णन करत असतात.  आपण त्या प्रसंगांना आठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या सुखाचा अनुभव करण्याचा ध्यास घेतला तर नक्कीच आपले वर्तमान जीवन सुद्धा सुखी समाधानी बनू शकेल.

मनोवैज्ञानिकाच्या दृष्टीने आपल्या मनामध्ये दिवसभरात ३०,००० किंवा त्याहून ही अधिक विचार येतात.  थोडं थांबून  जर त्याचे अवलोकन केले की माझे हे मन नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये busy (व्यस्त) आहे तर आढळून येईल की निरर्थक, नकारात्मक, प्रश्नार्थक विचारांच्या गोंधळामध्ये ते फसले आहे.  कोणत्या मार्गाने जावे, काय करावे ह्यांची गुंतागुंत दिसून येते.  मनाची ही ओढाताण, अस्वस्थता जर थांबवायची असेल तर मनाला सदविचारांनी भरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायला हवा.  जसे एखाद्या फुलदाणीसाठी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी, सुगंधी फुलांची निवड केली जाते तसेच आपण ह्या मनामध्ये सुद्धा सुखद, सुंदर, समाधानी विचारांची निवड केली तर मन अतिशय शक्तिशाली झाल्याचे आपल्यास जाणवेल.

विचारांची शुद्धता आणि स्पष्टता आपल्याला श्रेष्ठ बनवते.   ज्या महान विभूती आपल्या दृष्टीक्षेपात आहेत, त्याच्या विचारसरणीला न्याहाळले तर हे जाणवेल की, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी जे सिद्धांत किंवा नियम बनवले त्यांच्या आड भले कितीही परिस्थिती, आकर्षण, दुःख आली तरी मनाचा संयम, विवेकशक्तीचा वापर पदोपदी केला गेला.  सुखाचा स्वाद घेतला तसेच दुःखाचे सहर्ष स्वागत ही  केले.  मन आणि बुद्धीचा अप्रतिम ताळमेळ असल्यामुळे त्यांनी जीवनाच्या रणभूमीवर विजय प्राप्त केला.

आपल्याकडे शरीराच्या प्रकृतीचे ज्ञान आहे तसेच मनाची अवस्था समजण्याची गरज आहे.  जसे आपण कोणता पदार्थ खाल्ल्याने स्वास्थ बिघडते हे ध्यानी ठेवतो तसेच कोणत्या विचारांनी माझे मन दुःखी होते ह्याचे ही ज्ञान हवे. ज्यांच्याकडे ही समज आहे ते नेहमीच सतर्क राहून आपला आनंद किंवा ख़ुशी जोपासण्याचे अनेकानेक उपाय योजत राहतात. सकारात्मक विचार आपल्या कमजोर मनासाठी एक टॉनिकचे काम करते.  स्वमानाचा नियमित अभ्यास मनाला लवचिक बनवण्यास मदत करतो.

मनाची सुंदरता जीवनाला सुंदर आणि सुखी बनवते. तसेच मनाची कटुता संबंधांमध्ये आणि व्यवहारामध्ये सुद्धा कटुता आणते.  आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मनाच्या गाभाऱ्यात जाऊन थोडा वेळ निवांत बसायला हवे.  त्या गाभाऱ्यात ईश्वराची प्रतिमा न्याहाळत, त्याच्याशी सुमधुर संवाद साधण्याची सवय स्वतःला लावली तर मनाचे संतुलन कायम राहू शकते. ईश्वराचे सान्निध्य ज्या आत्म्यांना लाभले आहे त्यांच्या भाग्याचे वर्णन ते काय करावे ?  उच्चकोटीचे ईश्वरीय ज्ञान आपल्याला लाभले आहे.  ते सदैव सोबत ठेवून प्रसंगानुरूप त्याचा वापर जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपले भविष्य उज्ज्वल होईल.

You may also like