ब्लेम गेम

ब्लेम गेम
कधी निवांत बसले असताना लहानपणीचे दिवस आठवतात. चालायला शिकत असताना आपण कितीदा तरी पडतो, काही लागतं, खुपतं, रडतो तेव्हा लगेच आपल्याला गप्प करण्यासाठी आई-आजी बाजूला असलेल्या व्यक्ति किंवा वस्तुला थाप मारायची. हे सांगितल जायचं की तुझा दोष नाही त्या टेबलचा किंवा व्यक्तिचा दोष आहे. आपल्याला ही त्यावेळी मजा यायची की त्या व्यक्ति, वस्तूला मार मिळाला. खूप खुश व्हायचो. लहानपणापासून दिलेली ही समज आजही आपण घेऊन चालत आहोत. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले की म्हणायचो पेपर खूप कठीण होता, शिक्षकांनी उत्तर पत्रिका नीट तपासली नाही.. .. पण कधी हे सांगितलं नाही की माझा अभ्यास कमी पडला, थोडा आणखी अभ्यास करायला हवा होता. पुढे आयुष्या मध्ये आणखी काही नुकसान झाले तर कोणी व्यक्ति, परिस्थिती, शासन, बॉस, .. .. ह्या सर्वांना आपण दोष देत राहतो. काय करणार तो बोललाच तसा म्हणून राग आला, उशीर झाला म्हणून तिकीट न काढताच प्रवास केला, पैसे नाहीत म्हणून चोरी करावी लागली.. .. आपल्या जीवनातल्या समस्या दुसऱ्यांमुळे आहेत अशी मनाची समज करून बसतो. काही घडले तर त्याचे कारण काय हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषा कडे जातो. जर त्यांनी सांगितले की ग्रहदोष, वास्तुदोष, पित्रदोष, सर्पदोष.. आहे तर त्याला ठीक करण्यासाठी वेगवेगळ्या विधी करतो. तेव्हा ही मनात हेच असते की ह्यांच्या मूळे माझ्या आयुष्यात समस्या आहेत. सर्वांमधला दोष दिसत राहतो पण स्वतः मधला दोष बघायचे विसरून जातो. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही गोष्टींची जवाबदारी दुसऱ्यावर टाकून आपण स्वतःला वेगळं करतो. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये स्वतःला बदलण्या ऐवजी दुसऱ्याला परिवर्तन करण्यामागे आपला कल जास्त असतो.
आयुष्यामध्ये अनेक उतार-चढाव आपण बघितले आणि पुढे ही बघणार आहोत. पण ह्या सर्वातून जाताना दुसऱ्यांना दोषच देत राहणे म्हणजे स्वतःची काहीच चूक नाही पण बाकी सर्व चुकीचे ही मानसिकता घेऊन चालणे. दुसऱ्याला दोष देऊन आपण सहज मोकळे होतो. ऐकणाऱ्याची ही तशीच मानसिकता बनवण्याचा आपला प्रयत्न असतो की चूक माझी नाही पण समोरच्याची आहे. आपण स्वतःची सुटका करून घेण्याची ही युक्ति वापरतो. पण ही सुटका नाही पण आपली चूक लपवण्याची सवय स्वतःला लावून घेतो. त्यामुळे नुकसान दुसऱ्या कोणाचे नाही पण स्वतःचेच करून घेतो. कारण आपण स्वतःला बदलण्याची मेहनत करण्यास कधीच तयार होत नाहीत त्यामुळे वारंवार आपल्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. परिस्थिती तीच असते पण व्यक्ति आणि स्थान फक्त बदललेले असते.
कर्मांचे नियम हे अदृश्य रित्या कार्य करत असतात. प्रत्येक घटना आपल्याला काही शिकवण्यासाठी आलेली असते. जो पर्यन्त आपण शिकत नाहीत तो पर्यन्त आपल्याला तीच परीक्षा द्यावी लागते. जसे एखाद्या इयत्तेत पास होत नाहीत तोपर्यन्त दुसऱ्या इयत्तेत जाता येत नाही तसेच जीवनाच्या शाळेतही हा नियम लागू होतो. आपण अनुभवलं असेल ही की नोकरी, व्यक्ति, स्थान बदलले तरी प्रॉब्लेम मात्र तोच कारण प्रत्येक वेळी तेच उत्तर दिले तर मार्क्स शून्य. जो पर्यन्त आपण प्रतिउत्तर बदलत नाहीत तोपर्यन्त समस्येचे रूप ही बदलत नाही. म्हणून आपल्याला स्वतःला बदलण्याची आवश्यकता आहे. ब्लेम गेम कितीही खेळले तरी हार मात्र आपलीच होते. म्हणून प्रत्येक परिस्थिती, व्यक्ति.. .. सर्वांकडून शिकून पुढच्या वर्गात जाण्याचा प्रयत्न करावा.
‘Life is a Game’ ह्या खेळामध्ये जिंकायच असेल तर दत्तात्रय ह्यांच्या सारखे बनावे लागेल. प्रत्येका कडून शिकण्याचा ध्यास हवा. जे चांगले आहे ते आत्मसात करत प्रगती पथावर अग्रेसर व्हायला हवे. त्याच्यातच खरी मजा आहे. ब्लेम करून आयुष्याच्या खेळामध्ये आपण यश नाही पण अपयशाचे अधिकारी बनतो. म्हणून असे ब्लेम गेम खेळण्यामध्ये आपला वेळ, शक्ति ह्यांना खर्च न करता नवीन काही शिकण्याचा प्रयत्न सतत करत राहावे. कारण नविनता मनाला ताजेतवाने करते. जीवनाला त्यामुळे वेगळे वळण ही मिळते.

You may also like

43 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *