प्रथम तुला वंदितो…

      ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा …..’ भारताची महान संस्कृती आपल्याला पहिले वंदन गणरायाला करायला शिकवते. सर्व कार्ये निर्विघ्न पार पाडावी म्हणून प्रथम पूजन श्री गजाननाचे करतो. वर्तमानामध्ये सर्वांसमोर अनेक विघ्ने आहेत. कोरोनामुळे बाल-वृद्ध सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. पण परिवर्तन जीवनाचा नियम आहे. जे काल होते ते आज नाही आणि जे आज आहे ते उद्या नसेलही. म्हणून प्रत्येक क्षणाचा स्वीकार करू या.

        गेल्या वर्षी वाजत-गाजत गणरायाचे आगमन झाले होते. आज social distancing तसेच अन्य बाबींमुळे ह्या उत्सवाचे ते रूप नसले तरी मनामध्ये तोच उत्साह आहे. नव्या उम्मीदेने हा सण साजरा होत आहे. मनामध्ये एक आशेचा दीपक जरूर प्रज्वलित झाला आहे की गजाननाच्या येण्याने आमची सर्व दुःखे दूर होतील व पूर्वीपेक्षा ही चांगले परिवर्तन जीवनामध्ये होईल.

        गणपती आपल्या सर्वांचे लाडके दैवत तसेच पौराणिक कथांमध्ये विघ्नाना दूर करणारी देवता म्हणून ही प्रसिद्ध आहे. लहान असताना सांगितले जायचे की मनापासून ह्याची आराधना केली तर सर्व सुखे दारी येतील. आजही सर्वांना दिलासा मिळत आहे की आता सर्व काही ठीक होईल, जीवनाची गाडी पुन्हा नव्या जोमाने धाऊ लागेल. जिथे कोरोनामुळे भयभीत झाले होतो, मन चिंतेने, समस्येने, निराशेने भरून गेले होते तिथे आज मनाला सुखाचा, नव्या आशेचा स्पर्श होत आहे. आपण फक्त त्यांचे दर्शन न करता, त्यांच्या ह्या आगळ्या-वेगळया रुपामध्ये जे गूढ दडले आहे त्याला समजून त्या सर्व गुणांना जीवनामध्ये उतरवण्याचा ही प्रयत्न करू या.

        गणेशाला गुणपती, गणनायक, विघ्नहर्ता, सुखकर्ता….. अनेक नावानी संबोधले जाते.ही सर्व नावे गुणवाचक आहेत. त्यांचे छोटे डोळे, मोठे पोट, सुपा एवढे कान, वक्रतुंड ……. सर्व अंग आपल्याला समस्येपासून दूर राहायला व समस्यांना दूर करण्याची युक्ती शिकवतात

१)डोळे :–

डोळे दूरदृष्टीचे प्रतिक आहेत. दूरची वस्तू बघण्यासाठी  जसे डोळे छोटे करतो तसेच आयुष्यामध्ये प्रत्येक कर्म दूरदृष्टी ने करावे कारण फक्त आजचा विचार करून एखादे पूल उचलले तर कदाचित भविष्यामध्ये खूप मोठे नुकसान होऊ शकते म्हणून पुढचा विचार करून निर्णय घेण्याची समज ह्या नेत्राद्वारे आपल्याला मिळते.

२)कान :—

सुपासारखे कान हे व्यर्थ, नकारात्मक गोष्टीपासून दूर राहायची प्रेरणा देतात. आज आपला खुपसा वेळ              वायफळ गप्पागोष्टी मध्ये वाया जातोय. जे आवश्यक, सकारात्मक आहे ते एकवे, आत्मसात करावे. बाकी सर्व कचरा समजून सोडून द्यावे. ह्या धारणेला जीवनात जरी आणले तरी आपला वेळ, संकल्प, शक्ती ह्यांचा व्यय थांबू शकतो.

३)सोंड:—

गणरायाची सोंड हीच तर त्यांची ओळख आहे. अर्थात कोणतेही मोठे कार्य सहज पार पाडण्याची शक्ती आहेच पण त्याच बरोबर तेवढीच विनम्रता ही आहे. सोंडेने मोठे वृक्ष मुळापासून उपटण्याचे सामर्थ्य आहे तसेच जे काही ह्या सोंडेमध्ये कोणी देतो ते मालकाला पोचवण्याची विनम्रता ही त्यांमध्ये दिसून येते.आज आपल्यासमोर कोणती समस्या आली तर त्याने न भीता, आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे त्याचा उपयोग करून त्याला नष्ट करावे. ईश्वराचे बळ माझ्यासोबत आहे, त्याची साथ प्रत्येक क्षणाला मला मिळत आहे हा संकल्प ही आपल्याला शक्तिशाली बनवेल व डोंगरेएवढी परिस्थिती राई बनेल. पण कार्यामध्ये यश मिळाले किवा परिस्थितींना पार केल्यावर त्या ईश्वराचे आभार मानायला विसरू नका. कारण जे तो करू शकतो ते आपण करू शकत नाही. त्याचे बळ, त्याची योजना आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणून रोज विनम्रतेने मिळालेल्या यशाचे श्रेय त्याला जरूर दया. ही सुंदर शिकवण ह्या सोंडे द्वारे आपल्याला मिळते.

४)उदर (पोट):—

आज आपल्या जीवनातल्या समस्येचे एक कारण आहे ते म्हणजे सहनशक्तीची कमी. ही शक्ती असेल तर अर्ध्या अधिक समस्या दूर होऊ शकतात. सहन करून सामावून घेण्याची शिकवण ह्या उदाराद्वारे मिळते. एखादी गोष्ट घडली तर त्याची चर्चा दहा लोकांबरोबर करतो. असे केल्याने कित्येकांचे मन दुषित करण्यासाठी निमित्त बनतो. पण त्या गोष्टीला सामावून घेतले तर नक्कीच आपले संबंध चांगले राहू शकतात. आपल्या वाचेवर अंकुश ठेवण्याची समज ह्या लंबोदरा द्वारे मिळते.

५)एकदंत:—

एकदंत हे एकावर प्रचंड श्रद्धा व विश्वास ठेवायला शिकवते. आज जेव्हा आपण समस्यांच्या जाळ्यामध्ये फसतो तेव्हा अनेक देवतांना आठवण करतो. इतकेच नाही पण कोणीही जो सल्ला देईल ते सर्व करायला तयार होतो. पण असे न करता एकावर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण ईश्वर एकच आहे.आपण जिथे श्रद्धा ठेवली आहे तिथून मदत, शक्ती, मार्ग सापडतो पण त्या सर्वोच्च शक्तीवरचा विश्वास तुटू नये याचे भान नक्कीच असावे. ते श्रद्धेचे बळ आपल्याला सर्व विघ्नांमधून सुरक्षित बाहेर काढेल.

        ह्या शिकवणीना जर आपण आपल्या जीवनात,व्यवहारात आणले तर सर्व विघ्नांचे समाधान मिळेल.समस्या दूर होतील. चला ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण काही परिवर्तनाचा शुभ संकल्प घेऊ या. थोड्या वेळासाठी आपल्या जीवान यात्रेला बघू या. ज्या समस्या, दुःख माझ्या वाट्याला आले त्यात माझी काय चूक होती व त्यामध्ये कोणते परिवर्तन करायला हवे ह्याचे अवलोकन करू या. मनापासून झालेल्या चुकांना स्वीकार करून पुढे त्या न व्हाव्या ह्यासाठी स्वतःला प्रतिज्ञा बद्ध करू या. सर्व विघ्नांचा नायनाट होऊन जीवनाचा मार्ग सरळ होत आहे असा श्रेष्ठ संकल्प करू या.

You may also like