ध्यान – एक औषधोपचार

जीवन – एक संग्राम, जीवन  म्हणजे क्रिकेट मॅच, जीवन म्हणजे समस्या ……  जीवनाबद्दल अनेकांनी आपली मते दर्शवली आहेत.  ज्या दृष्टिकोनाने आपण बघतो तसा अनुभव होतो.  पण मनुष्य जीवन खूप सुंदर आहे.  जगण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा एखाद्या परिस्थितीला सामोरे जातो.  फक्त सुख मिळत राहिले तर कदाचित सुखाची किंमत आपल्याला समजणार नाही म्हणून जीवनामध्ये थोड्या समस्या ह्या हव्याच.   परिस्थिती मध्ये आपली शक्ती, ईश्वरावरचा विश्वास, समज ह्या सर्व गोष्टींची परीक्षा होते.  एखादी परिस्थिती आली की आपण व्यक्ती कडे धाव घेतो पण जेव्हा त्या व्यक्ती कडे त्या परिस्थितीचे समाधान मिळत नाही तेव्हा प्रत्येक जण ईश्वराकडे बोट दाखवतो.  त्यावेळी फक्त त्याच्याकडून अपेक्षा केली जाते की आता मात्र तूच ह्या संकटातून सोडव.  पण एक बाब आपण नक्कीच समजावी की ईश्वरच प्रत्येक संकटातून तारणारा आहे. मग ती समस्या कोणती ही असो. 

    एखादा भयानक आजार जरी झाला तरी त्यावर मात करण्याची ताकद ईश्वराच्या आठवणींमध्ये आहे.  ह्याची कित्येक उदाहरणे आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतात.  योगानंदाच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रसंगाचे वर्णन आहे.  ज्यामध्ये ईश्वरीय शक्तींवर विश्वास ठेवल्याने सुद्धा शरीराचे आजार दूर झाल्याचे दिसून येते.  असेच एक उदाहरण मी नॉर्मन व्हिन्सेंट पॉल ह्यांच्या ‘ The power of positive thinking’  ह्या पुस्तकात वाचले होते.  एका व्यक्तीला काही वर्षांपासून जबड्याच्या हाडाचा आजार होता.  डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हा आजार बरे होणे अशक्य होते.  जेव्हा त्या व्यक्तीला कळले की हा आजार असाध्य आहे तेव्हा मात्र त्याने जीवावर उदार होऊन मदतीसाठी धडपड ही केली परंतु सारे प्रयत्न असफल ठरले.  ते नियमित पणे चर्चला जायचे परंतु धार्मिक वृत्तीचे नव्हते. एकदा अंथरुणात पडले असतानाच त्यांनी पत्नीला सांगितले की मला बायबल वाचायची इच्छा झाली आहे.  मला बायबल आणून दे.  ते आपला अनुभव सांगतात की जसजसे त्यांनी  वाचायला सुरुवात केली तसतसे आश्वासन मिळू लागले, आराम वाटू लागला आणि आजाराने जे तन आणि मन त्रासले होते, त्याचे प्रमाण ही कमी होऊ लागले.  आजार बरा होऊ शकत नाही त्याची जी निराशा होती ती सुद्धा कमी होऊ लागली.  खात्री होऊ लागली की स्वास्थ्यामध्ये काही बदल होऊ लागला आहे.   

एके दिवशी बायबल वाचत असताना त्यांच्या अंतःकरणातून एक उबदार अशी आनंदाची उर्मी उसळली.  ती केवळ अवर्णनीय होती.  त्या क्षणापासून त्यांच्यात अधिक वेगाने सुधारणा होऊ लागली. ज्या डॉक्टरांनी निदान केले होते सर्वप्रथम त्यांच्याकडे पुन्हा तपासणी केली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला पण त्यानंतर ही आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो, कदाचित तात्पुरती विश्रांती घेतली असेल असे ही सांगितले.  पण त्यांना पूर्ण खात्री होती की ह्या आजाराने मला कायमचा निरोप दिला आहे.  त्या उद्योगपतीने जेव्हा आपला अनुभव सांगितला तेव्हा चौदा वर्षांचा काळ लोटला होता.  

तात्पर्य हे कि ईश्वर स्मृती मध्ये मग्न होणे ज्याला आपण ध्यान किंवा ‘मेडिटेशन’ म्हणतो, ह्या ध्यानमग्न होण्यामध्ये आत्म्याला अपार शक्ती मिळते.  जी असंभव वाटणारी कार्ये आहेत ती संभव होण्याची शाश्वती वाढू लागते.  मेडिटेशन आणि मेडिकेशन ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे.  औषधोपचार केल्यावर शरीरावर किंवा शरीरामध्ये झालेले घाव भरू शकतात पण मेडिटेशनने आत्म्यावर, मनावर लागलेले घाव ही बरे करण्याची शक्ती आहे.  जितके आजाराप्रति नकारात्मक भावना वाढू लागते, तितकेच रोगाचे प्रमाण वाढू लागते.  पण प्रभुप्रीती मध्ये मग्न झालेले मन सशक्त होऊन त्या रोगावर मात करू लागते.  विचारांची उब शरीराला बरे करण्यास मदत करते. म्हणूनच समस्येचे रूप किंवा कारण काही ही असो रोज ध्यान करण्याची आपल्या सर्वांनाच गरज आहे.  व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा जेव्हा सर्व आधार निर्बल ठरतात तेव्हा प्रत्येक जण त्या ईश्वराकडेच बोट दाखवतो.  मग रोजच्या दैनंदिन कार्यामध्ये त्याला सोबत का ठेवत नाही ? 

ध्यान ज्याला ‘योग’ असे ही म्हटले जाते.  योग्य म्हणजेच जोडणे (connection).  मनाची तर ईश्वराबरोबर जोडली तर त्याच्या शक्तींचा स्पर्श मन-बुद्धीला होतो, त्यामुळे परिस्थितीमध्ये अचूक निर्णय घेण्याची क्षमता ही वाढते.   ‘योग’ ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे ‘संवाद’ (communication).  ईश्वराशी ध्यान करताना मनाची अवस्था स्पष्टरित्या त्याच्यासमोर मांडणे, हे रोज केल्याने एक जवळीक ईश्वराबरोबर साधू शकतो.  ईश्वराशी संबंध जितका अतूट होईल तितकेच परिस्थितीमध्ये त्याच्या मदतीचा हात ही आपल्याला अनुभवायला मिळेल. 

ध्यान ही मनाची स्वच्छ व निर्मळ अवस्था आहे.  सर्व काही विसरून ईशप्रीतीमध्ये डुबलेले मन असंख्य कमजोर विचारांपासून, तणाव, दुःखासारख्या रोगात भावनांपासून मुक्त होते.  प्रेमळ, सुंदर विचारांमध्ये काय शक्ती आहे याचे अप्रतिम अनुभवांची जाण  आपणास होऊ शकेल.  नक्कीच ह्याचा प्रयोग करून पहा. अविस्मरणीय प्रसंग आपल्या जीवनात घडू लागतील.    

You may also like

21 Comments