चला लाऊ या गुणांचा रंग  

       भारत हा एक महान देश मानला जातो जिथे सण, उत्सवा द्वारे मनुष्यामध्ये श्रेष्ठ संस्कारांची निर्मिती केली जाते. एकत्र येणे, मिळून-मिसळून राहणे, माफ करणे …. अश्या सर्व गोष्टींची शिकवण सणांच्या माध्यमाने दिली जाते. अनेक सणांपैकी एक सण आहे ‘होळी’. होळी ह्या सणामागे भक्त प्रल्हाद ची सुंदर कथा आहे. ईश्वरावर अतूट विश्वास असेल तर तो सर्व परिस्थितीतून तारतो ही वास्तविकता त्यांच्या जीवना द्वारे आपण समजतो. ईश्वरीय शक्ति आणि आसुरी शक्तीच्या युद्धा मध्ये ईश्वरीय शक्तींचा विजय होतो ही समज ही मिळते. व्यावहारिक जीवनात खूपदा आपण चुकीची मान्यता ठेऊन चुकीची दिशा निवडतो. कारण चुकीच्या मार्गानी गेलेल्या व्यक्तींना सहज प्राप्ती होताना दिसते. पण ही प्राप्ती क्षणभंगुर असल्याचे ही बघतो. आज instant चा जमाना आहे. चांगल्या मार्गाने केलेला प्रयत्न कष्ट दायक असला तरी त्याचा परिणाम सुखदायी असतो हे मात्र निश्चित.

       होळीचा सण आपण दो दिवस साजरा करतो. होळी अर्थात जाळणे व त्यानंतर रंगपंचमी अर्थात रंगांची उधळण. जाळल्याशिवाय रंग उधळू शकत नाही. होळीच्या दिवशी झाड, सुकलेली लाकड, नारळ, कोकी .. असे अनेक पदार्थ, वस्तूंचा वापर केला जातो. त्याचबरोबर होळीची पूजा प्रेमभावनेने केली जाते. ह्या दिवशी जसे स्थूल वस्तूंना जाळण्याची प्रथा आहे तसेच सूक्ष्म गोष्टींना सुद्धा समाप्त करण्याची गरज आहे. मनुष्य कर्मकांड तर करतो. त्यामुळे आपल्या जीवनात सुख-शांती येईल अशी समज असते पण आपल्या दुःखाचे कारण कोणी दुसरे नाही पण आपलेच विचार आहेत हे लक्षात ठेवावे. जसे ह्या होळीमध्ये जुन्या वस्तु जाळल्या जातात तसेच मनात जुन्या प्रसंगाचा जो साठा केला आहे त्याला जाळण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जोपर्यंत त्या जुनाट गोष्टीना मनातून पूर्णपणे काढून टाकत नाहीत तो पर्यंत आपण शांत होऊ शकत नाहीत. होळी हा सण सर्व जुन्या गोष्टीना विसरून सर्वाना माफ करायची शिकवण देतो.

       कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीसाठी मनात गाठ बाधून ठेवतो की मी ह्या व्यक्तीला कधीच क्षमा करणार नाही. पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे काही नुकसान नाही. त्यांचा त्रास स्वतःलाच होत राहतो. हे समजण्याची गरज आहे. म्हणून ह्या होळीच्या अग्नि मध्ये अश्या बांधलेल्या गाठीना स्वाहा करू या. कारण अग्नि हे परिवर्तन व पवित्रतेचे प्रतीक आहे. अग्नि मध्ये कोणतीही वस्तु टाकली तर त्याचे परिवर्तन होते. आपण ही ह्या अग्निमध्ये सर्व स्वाहा करून आपल्या भावनांना बदलू या. स्वतःला ही कटू भावनांतून मुक्त करू या.  भावनिक रित्या मुक्त झाले तरच सर्वांचा मनस्वी स्वीकार करू शकतो. होळी चा हिन्दी अर्थ घेतला तर हो+ली अर्थात जे झाले ते झाले, आता त्या सर्वांना पूर्णविराम देऊन नवीन सुरुवात करू या. जर ‘होली’ चा इंग्लीश अर्थ घेतला तर ‘पवित्र’. मन पवित्र तेव्हा होऊ शकते जेव्हा मनातील अनेक अशुद्ध भावनांना ह्या अग्निमध्ये दग्ध करू. अर्थातच होळी म्हणजे मनाला पवित्र करण्याचा सण.

मन शुद्ध झाले की सर्व जणू आपलेच आहेत ही भावना जागृत होते. सर्व जे व जसे आहेत त्यांना सामावून घेण्याची शक्ति आपल्यामध्ये येते म्हणून दुसऱ्या दिवशी सर्वाना रंग लावले जातात. हे रंग लावताना देहाचे भान पूर्णपणे विसरून जातो. छोटे-मोठे, जाती-धर्म, लिंग, आपले-परके सर्व काही विसरून एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. कोणी अनोळखी व्यक्तीने रंग लावला किंवा फुगा मारला तरी त्या दिवशी आपण समजून घेतो, रागवत नाहीत. म्हणजेच आपण समजूतदार पणे वागतो. पण हे रोज करण्याची आवश्यकता आहे. कारण रोज आपण छोट्या छोट्या गोष्टींचा त्रागा करतो. एकमेकांना समजून घेण्याची शक्तिच नसते म्हणून आज संबंध दुरावले आहेत. हा दुरावा कमी करण्यासाठी क्षमा करून सर्वांचा स्वीकार करा.

      होळी म्हणजे पुरणाची पोळी. होळीच्या दिवशी खास पुरणपोळी चा बेत असतो. ही पोळी बनवायला थोडी मेहनत लागते पण खाल्यावर मन तृप्त होऊन जाते. संबंधामध्ये गोडवा असेल तर जीवन सुखद वाटते. ह्या संबंधा ना जपण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. थोडासा समजूतदारपणा असेल तर ते आयुष्यभर टिकतात ही. म्हणून थोडंसं नमत घेण्याची सवय लावावी. हे जीवन किती दिवसांचे? ‘दोन घडीचा डाव’ त्यातही असे रूसवे-फुगवे, राग-द्वेष असेल तर जगण्याचे सुख किती मिळेल. म्हणून ह्या सणाच्या निमित्ताने ज्यांचाशी काही कारणास्तव बोलणे बंद केले असेल तर आज सर्व विसरून एक जवळीक निर्माण करू या. आपल्याकडून कोणी दुखावले गेले असेल तर माफी मागू या. आज पासून सर्वांना सुख मिळेल असे काहीतरी करून बघू या. स्थूल रंग लावण्याबरोबर गुणांचा रंग सर्वांना लावण्याचा प्रयत्न करू या. सुख, प्रेम, शांती, आनंद.. .. ह्या गुणांची उधळण करू या. नक्कीच ह्या रंगांनी आपले जीवन ही रंगून जाईल. हे रंग अविनाशी आहेत. ह्या रंगांची उधळण मनाला सुखद अनुभव देऊन जाईल.

You may also like