खरे सुख

आधुनिकतेच्या प्रवाहात वाहत जाणारा आजचा मनुष्य जसे वस्तूंना वारंवार बदलतो तसेच व्यक्तींना ,नात्यांना बदलण्याची सवय हि स्वतःला लावून घेत आहे. एकाच व्यक्ती मध्ये सर्व गुण न मिळाल्यामुळे व्यक्तींना हि बदलत चालला आहे. कदाचित त्यातच त्याला सुख मिळत आहे. खरच ह्यात सुख मिळते का? कि तात्पुरता आपली गरज सरावी हा त्यापाठी मागचा उद्देश असतो? नक्की काय हवय हेच आपण स्वतः ओळखू न शकल्याने किवा पारख नसल्या कारणाने अश्या गोष्टी आपल्याकडून घडत राहतात.
मनाचे वर्णन करताना काहींनी मनाला घोडा, वारा ,माकड…. अश्या अनेक उपमा दिल्या आहेत. आज आपले मन एका वानरासारखे ह्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडे किवा एका पदार्थापासून दुसऱ्या पदार्थाकडे नजर फिरवत आहे. आपण बघितले असेल माकडाला कितीही केळी दिली तरी तो खाऊ शकतो. हातामध्ये पकडून तोंडामध्ये सुद्धा साठा करण्याची लोभवृत्ती त्यामध्ये दिसून येते. म्हन्जेच्म्जे मिळाले त्यात समाधान नाही. आणखी हवे हा ह्व्यास असतो. आज मनुष्याची गती ह्यापेक्षा वेगळी नाही. किती हवे आणि कुठपर्यंत हवे ह्याचे कोणते ही मापदंड नाही. तात्पुरते समाधान मिळते पण त्यानंतर परत एक नवीन इच्छा निर्माण होते. हे चक्र न संपणारे आहे. ह्या जीवनामध्ये ते सुख-समाधान मिळेल कि आयुष्यभर ही मृगतृष्णा अशीच राहील हा प्रश्न सर्वांचाच मनात आहे.
इंद्रीयांपासून मिळणारे सुख अल्पकालीन असल्यामुळे त्याची भूक नेहमीच राहते. जसे लहानपणापासून आपण खात आलो. कोणी आपल्याला विचारले कि आणखीन किती वर्षे खात राहणार? तर त्याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. कारण जो पर्यंत शरीर आहे तो पर्यत त्याचे संगोपन करावेच लागणार. म्हणून हा प्रश्नंच चुकीचा आहे. परंतु आज प्रत्येक इंद्रीयांपासून मिळणारे सुख हवेहवेसे वाटते.डोळ्यांनी बघण्याचे सुख मिळते. कोणी सिनेमा, painting, निसर्गाचे रूप… बघून ते सुख मिळवतो. कानाद्वारे कोणी संगीत, भजन, प्रवचन , रेदिओ वरच्या बातम्या ऐकून सुख घेतो. अश्याप्रकारे खाण्याचे,खरेदीचे , फिरण्याचे, कपड्याचे… अनेक नश्वर वस्तू-पदार्थापासून सुख घेण्याचा प्रयत्न करत राहतो. पण जर आपल्याला ह्याची सवय जडली व काही कारणास्तव ते मिळणे बंद झाले तर मनुष्य बेचैन होतो. जसे व्यसनीचे पाय नकळत मधुशालेकडे वळतात.तसेच आपले मन हि पुन्हा पुन्हा त्या व्यक्ती, वस्तू, पदार्थाकडे जाते. मन ह्या इंद्रियांच्या सुखाचा व्यसनी होऊन जातो. म्हणून मनाला नक्की कोणते सुख मिळायला हवे हे समजण्याची आवश्यकता आहे.
जसे लहान मुल रोज चोकलेट, आयस्क्रीम , कुरकुरे.. ची demand करत असेल तर त्यांना नकार दिला जातो. कारण पालकांना माहित आहे की रोज हे खाल्याने तब्येत खराब होऊ शकते. मग मुल कितीही रडले तरी त्याला आपण ते देत नाहीत. तसेच मन जर एकसारखे चुकीच्या वस्तूची demand करत असेल तर त्याला ही आपल्याला थांबवता आले पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे पैशाची टंचाई असेल व तो कोणाकडे मदत मागायला गेला. समोरच्या व्यक्तीने मदत न करता अपमान केला तर आपण बोलतो की भले मदत नका करू पण गोड शब्द तर बोला. चांगली वागणूक तर द्या. म्हणजेच पैसा हि गरज असली तरी मनाचे समाधान चांगल्या व्यवहाराने हि होते. व्यक्ती दुखी झाल्यावर ईश्वराच्या दारी जातो. माहित आहे कि व्यक्तींनी पाठ फिरवली तरी ईश्वर नक्कीच मदत करेल. ईश्वराची कृपा व्हावी म्हणून व्रत, उपवास… करतो.परंतु त्यापेक्षा जर मानाने त्याची खरी भक्ती केली तर मन शांत होते. मनाची ओढ ईश्वराकडे जर असेल तर फक्त शांत नाही पण आपण शक्तिशाली झाल्याचा अनुभव करतो.
व्यक्तीचे सान्निध्य काही वेळेसाठी मिळू शकते पण ईश्वराचे सान्निध्य जितके हवे तितके मिळू शकते. ईश्वराची सोबत मनुष्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाते. चांगले विचार करण्याची बुद्धी देते. हे चांगले विचार मनाला सुखद अनुभव करून देतात. जसे विचारांनी दुखी होतो तसेच विचारांनीच खऱ्या सुखाचा आस्वाद घेऊ शकतो. हा सहवास आपण सुरक्षित असल्याचे समाधान देते. म्हणून कार्य व्यवहार करताना थोडा वेळ ह्या सहवासासाठी काढावा. जसे मोबाईल ची battery low झाली तर आपण त्याला वारंवार charge करतो तसेच ईश्वराचे सान्निध्य आपल्यामध्ये नवी चेतना जागृत करते. प्रगतीच्या मार्गावर चालण्याचे बळ देते. म्हणून विचारांद्वारे त्या ईश्वरासोबत राहून बघा. हे सान्निध्य खऱ्या सुखाचा अनुभव देईल. आणि असे अनुभव अपेक्षे पलीकडचे असतील. हे नक्की करून पहा.

You may also like