क्षमाशीलता

मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक शुभाशुभ घटना घडत राहतात. त्यांचा परिणाम सतत आपल्या मानसिकतेवर होत असतो. मनामध्ये निर्माण झालेल्या भावनांनी आपले बोलणे, चालणे, वागणे, लिहिणे आणि सर्वच प्रभावीत होत असते. म्हणून मानसिक शांती आणि निरामय आरोग्यासाठी का होईना इतरांना व स्वतःला सुद्धा  क्षमा करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर आपल्याला संपूर्ण आरोग्य आणि सुख हवे असेल तर ज्या व्यक्तींनी आपल्याला दुखवले आहे त्या प्रत्येकाला माफ करायला हवे.

ह्या छोट्याशा जीवना मध्ये जाणता अजाणता आपल्या कडून ही अशा काही चुका झालेल्या असतात की त्यांना आपण स्वतः विसरू शकत नाहीत. अपराधभाव घेऊन जगात असतो. त्या भावनेतून स्वतःला समजुतीने मुक्त करणे गरजेचे आहे नाहीतर ती चुकीची भावना ही आपल्याला दुःखाचा दरी मध्ये घेऊन जाईल. रागाच्या भरात केलेला खून, मारहाण, अपशब्द ….. ह्या सर्व घटनाचा सुद्धा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. जसे शरीरामध्ये दर अकरा महिन्यांनी प्रत्येक पेशी नव्याने तयार होतात जसे आपण नव्याने तयार होतो म्हणून झालेल्या घटनांना उगाच उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुकाची मनापासून त्या व्यक्तीची तसेच ईश्वराची माफी मागून पुन्हा ही चूक नाही होणार ह्याची शाश्वती देऊन स्वतःला मोकळे करावे.

क्षमाशीलता एक कला आहे व या कलेचा मुख्य घटक आहे क्षमा करण्याची तयारी. ज्या व्यक्तींनी दुखावले गेले आहोत अशा व्यक्तींना आपण क्षमा करण्यास सहसा तयार होत नाहीत. इतके निष्ठुर होतो की एखादया समोर आपण बोलून ही जातो की ‘काहीही झाले तरी मी हयाला माफ करणार नाही.’ किवा ‘मरे पर्यंत त्याचे तोंड ही बघणार नाही.’ अशाप्रकारच्या द्वेष, तिरस्काराने भरलेली नकारात्मक भावना मनात ठेवून आपण जीवनभर चालत राहतो. पण ह्या भावनांचा त्रास फक्त आपल्यालाच होतो. मन हे आजारांचे कारण आहे असे मानणाऱ्या मनोदेहिक वैदयकीय क्षेत्रात आज सतत या गोष्टींवर जोर दिला जातो की द्वेष, धिक्कार, पश्याताप आणि शत्रुत्व या भावनांमुळे सांधेदुखी पासून ते हृदय रोगापर्यंत अनेक आजार उद्भवतात. या नकारात्मक भावनांमधून निर्माण होणारा ताण आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला कमकुवत करतो आणि आपण कोणत्याही जन्तुसंसर्गाला (infection) सहज बळी पडू शकतो. ह्या सर्वांपासून स्वताचा बचाव करण्यासाठी सर्वप्रथम दुसऱ्याना क्षमा करण्याची तयारी ठेवावी.

दुसऱ्याना क्षमा करणे म्हणजेच स्वतःला भावनिक दृष्ट्या मुक्त करणे होय. जर आपण त्या व्यक्तींना, घटनांना वारंवार आठवत राहिलो तर तो साचलेपणा आपल्यालाच हानिकारक ठरेल. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येईल तेव्हा व्यक्तीचे भले चिंतून म्हणावे, ‘तुला शांती मिळो.’ हे सतत केल्याने काही दिवसांनी त्या व्यक्तीचे किवा त्या घटनेचे विचार कमीत कमी वेळा आपली मनात येतील व शेवटी त्याच्या खूनाही पुसून जातील.

जसे सोन खरे आहे की नाही हे पारखण्यासाठी सोनार आम्ल चाचणीचा उपयोग करतात. आपण ही आपली क्षमाशीलतेची आम्ल चाचणी (ACID TEST) करून घ्यावी. जर आपल्याला दुखावणाऱ्या, फसविणाऱ्या, लुबाडणाऱ्या व्यक्तींबद्दल कोणी खूप चांगले बोलत आहे, त्यांचे ते चांगले बोलणे ऐकून जर माझ्या काळजातून असूयेचा धूर निघू लागला तर हमखास समजावे की आपल्या मनात अजून ही त्या व्यक्तीबद्दल तिरस्काराची भावना शिल्लक आहे. म्हणजेच आपण मनापासून त्याला माफ केले नाही. जर खरोखरच आपण माफ केले असेल तर भले ती घटना आठवेल पण आता त्यातील विखार व दंश आपल्याला जाणवणार नाही. हीच खरी क्षमाशीलतेची असिड टेस्ट आहे.

खरतर प्रत्येक घटनेकडे आपण कोणत्या दृष्टीकोनाने बघतो हे जाणणे महत्वाचे आहे. चांगले वा वाईट असे काही नसतेच. विचार एखाद्या गोष्टीला चांगले वा वाईट बनवतात कारण प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. आपण त्या घटनेची कोणती बाजू पाहतोय हे आपल्या विचारांवर निर्भर असते. प्रत्येक घटनेपाठी काही चांगले लपलेले आहे ते पाहण्याचा ध्यास असेल तर आपण कोणालाही गालबोट लावणार नाहीत. उलट प्रेमाचा वर्षाव करून स्वतःला व प्रत्येकाला क्षमा करू.आपल्याला दुखावणाऱ्या साठी आनंद, जीवन आणि सदभावनेचे अभीष्टचिंतन करू.

निसर्ग, जीवन आणि ईश्वर आपल्याला सर्वांवर प्रेम करण्याची शिकवण देतात. निसर्गाचे मनुष्याने कितीही नुकसान केले तरी त्याला वेळोवेळी ऊन, पाऊस देऊन नवीन जीवन देण्यासाठी निसर्ग तयार असतो. कितीही आपण चुका केल्या तरी ईश्वर आपल्याला नवी संधी देऊन पुन्हा नव्याने उभे राहण्याची शक्ती देतो तसेच आपण ही स्वतःला व दुसऱ्यांना माफ करून त्यांचासाठी प्रेम, शांती, आनंद ह्यांची याचना करून आपल्या भावनांना द्वेष, तीरास्कारापासून मुक्त ठेवावे. हीच तर खरी जगण्याची कला आहे.

You may also like