करदर्शन

 

कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती |

करमध्ये तु गोविद: प्रभाते करदर्शनम ||

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आणि मुळस्थानी सरस्वतीचा वास आहे. मध्यभागी ईश्वर आहे म्हणून सकाळी डोळे उघडताच स्वतःच्या हाताचे दर्शन करावे. असे आपली भारतीय संस्कृति शिकवते. लक्ष्मी आणि सरस्वती अर्थात वित्त आणि विद्या ह्यांना प्राप्त करण्याचे बळ आपल्या हातात आहे. तसेच ईशकृपा, ईशप्राप्ति सामर्थ्य ही आपल्याकडे आहे.

व्यावहारिक जीवनात जर आपण बघितले तर कोणतीही प्राप्ति कष्टाशिवाय होत नाही. एक मराठी गाण तुम्ही ऐकल असेल ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’. हाताला चटके मिळल्याशिवय भाकरी मिळत नाही, म्हणजेच पुरुषार्था विना काहीही साध्य होऊ शकत नाही. म्हणुनच सकाळी डोळे उघडताच स्वतःला एक शक्तिशाली विचार देण्याची प्रेरणा ह्या करदर्शनामध्ये आहे. आपल्या हातांना बघुन हा विचार करावा की ‘माझ्याकडे सर्व असंभव कार्य संभव करण्याची शक्ति आहे, कोणतेहि कार्य करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे आहे’. हे विचार रोज करावे. ह्या विचारांनी आपले बळ वाढेल व आपण क्रियाशील होऊ. ‘प्रयत्नार्थी परमेश्वर’ अर्थात प्रयत्न केला तर ईश्वर सुद्धा मिलू शकतो. ठरवले तर काहीही साध्य करू शकतो अशी विशेषता आपल्या हातामध्ये आहे.

वित्त आणि विदया ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त केल्यावर मनुष्याला अहंकार येऊ शकतो. पण ह्या दोन्हीना     ईश्वरासोबत जोडले तर मनुष्यामध्ये नम्रता आणि समर्पण भाव हे गुण येऊ शकतात. सकाळपासून सत्कर्म करण्याची प्रेरणा घेऊन दिवसभर कार्य करावे व रात्रि त्या कार्याची श्रेय ईश्वर चरणी अर्पण करून निश्चिंत व्हावे. ह्या हातांद्वारे दान, पूजा अर्चना असे अनेक सत्कर्म केले जातात पण ह्याच हातानी पापकर्म ही होतात. म्हणून केलेल्या कर्मांचे फळ हस्तरेखेद्वारे बघितले जाते. ज्या हस्तरेखेमध्ये आयुष्य, सुख, विदया, धन, आरोग्य सर्वच बघितले जाते. पण ह्या सर्वाना प्राप्त करण्याचा आधार आपले कर्मच आहेत.

दुसऱ्या दृष्टिकोनाने ह्या हातांना बघितले तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला हातांची साथ हवी. कोणताही अवयव दुखत असेल तर त्याला हाताचेच सहकार्य लाभते. डोळे, नाक, कान, पाय, डोके……. कोणताही अंग असो त्याला मालिश पालिश करुन बरे करतो. ह्या हातामध्ये सर्व काही करण्याचे सामर्थ्य आहे. जीवनाचे ध्येय साकार करणारे, मनुष्याला पुरुश्यार्थाचे प्रोत्साहन देणारे, जीवनाला कार्यशील ठेवणारे, वित्त आणि विद्या ह्यांच्या प्राप्तीसाठी सक्षम बनावणारे तसेच ईश्वराप्रति समर्पण भाव ठेवण्याची श्रेष्ठ स्मृति देणारे हे करदर्शन आहे

You may also like