कमलपुष्प सम जीवन

     ‘ अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर  आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ’

    अन्न, वस्त्र, निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा, आज त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कष्ट सोसत आहे.  सांसारिक जीवनामध्ये इतके व्यस्त झाले आहोत की स्वतः साठी वेळ काढणे सुद्धा मुश्किल. पण जो खटाटोप केला जात आहे, खरंच त्याने आपले जीवन समाधानी आहे ?  लहानपणी खेचाखेचीचा खेळ खेळायचो. एका व्यक्तीला दोन्ही बाजूंनी खेचले जायचे. पण आज फक्त दोन बाजू नाही पण चार ही दिशेने खेचले जात आहोत. ह्यामध्ये तन आणि मन दोघांची ही झीज होत राहते.  जीवनाचा आनंद घेणे तर दूरच पण आज हे ओझं बनले आहे. 

जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कमळासारखे राहायला शिकायला हवे.  कमळाचे फूल पाण्यावर एकटे दिसत असले तरी त्याचा भला मोठा संसार पाण्याखाली असतो.  ह्या संसारामध्ये खूप गुंतागुंत असली तरी ही आपले सौंदर्य जपणारे हे कमळ फूल. आयुष्यामध्ये अनेकानेक व्यक्ती, प्रसंग, साधने …….  येऊन गेली. त्यांच्याबरोबर राहताना, साधनांचा वापर करताना त्याच्यापासून अलिप्त राहण्याची कला ज्याने आत्मसात केली, तोच खरा गुणवान. म्हणूनच देवी-देवतांच्या प्रत्येक अंगाचे पूजन केले जाते.  तसेच त्यांच्या पवित्र अंगांना कमळपुष्प समान मानले जाते. जसे हस्तकमळ, नाभीकमळ, मुखकमळ, पद्मकमळ…….. पण आज ह्या देवतांच्या प्रतिमा फक्त दर्शनासाठीच राहिल्या आहेत. त्यांच्या रुपाद्वारे जे गुण आत्मसात करायला हवेत त्याकडे मात्र आपले लक्ष्य नाही. 

आज मनुष्य जे काही करतो त्याचे फळ प्राप्त करण्याची वृत्ती सुद्धा बाळगतो.  पण ‘ नेकी कर दर्या में डाल ’ फळाची अपेक्षा ही न ठेवता कर्म करण्याची प्रेरणा ‘ गीता ’ शास्त्रामध्ये वर्णली आहे.  सर्व काही करून अनासक्त वृत्ती ठेवावी. ह्याचेच प्रतीक कमळ हे आहे. मनुष्याच्या सर्व दुःखाचे कारण फक्त दोन शब्द आहेत.  ‘ मी आणि माझं ’ ह्या मध्ये अडकलेला मनुष्य तन, मन धन आणि जन ह्या चार ही गोष्टींनी दुःखी आहे. जे आपल्याला मिळाले किंवा कष्ट करून प्राप्त ही केले तरी कालांतराने त्यांचा नाश होणारच आहे.  किंवा आपल्याला ती वस्तू, व्यक्ती सोडावी लागेल, हा प्रकृतीचा नियम आपण समजून घेतला तर अनासक्त राहू शकतो. हीच अनासक्त वृत्ती आपल्याला परिस्थितींच्या प्रभावापासून मुक्त ठेवते. 

दलदलमध्ये राहून ही त्याच्या प्रभावापासून मुक्त तसेच सूर्याची उपासना करणारे हे फूल आपल्याला कोणत्याही वातावरणामध्ये राहून ही उंच ध्येय साध्य  करण्यास सांगत आहेत. परिस्थिती, व्यक्ती, वातावरण ह्यांना दोष न देता, जीवनाला उन्नत करण्याकडे लक्ष्य ठेवावे. आपल्या प्रगतीचा मार्ग आपणच काढू शकतो.  ध्येयाकडे दृष्टी ठेवून सतत कार्य करत राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये नेहमीच शुभ प्रसंग येत राहतात. ह्याची प्रचिती तर आपणा सर्वांना आहेच. म्हणूनच आपण आपले जीवन कमळपुष्पासारखे जगावे.   

You may also like