ऋणानुबंध

मनुष्य जीवन अति दुर्लभ समजले जाते परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्मांचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो. माणसाला सामाजिक प्राणी मानले जाते.  समाज, कुटुंब, प्रकृती…. अनेकांबरोबर ऋणानुबंध आहेत.  संपूर्ण जीवनच त्या अनुषंगाने चालत आहे. एखादे मूल जन्माला आले कि हळूहळू त्याच्यावर मातृऋण, पितृऋण… चालू होतात. हे ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात.  कारण हे बांध आपल्याला जीवनाच्या प्रवाहामध्ये कुठे न कुठे थांबवतात.  जो पर्यंत त्याची भरपाई होत नाही तो पर्यंत सुटका नाही.

आपण सर्वच अनुभव करतो की कोणते ही बंधन आपल्याला आवडत नाही परंतु ही बंधने मनाला, तनाला तसेच आपल्या पूर्ण जीवनाला प्रभावीत करतात.  सगळ्यांनाच आपल्या मनासारखा जीवनसाथी, नोकरी, कुटुंब मिळत नाही.  काही ठिकाणी तडजोड करून ही जीवन व्यतीत करावे लागते म्हणजेच हे बंध आहेत ज्यांनी आपले जीवन बांधुन ठेवले आहे. पण सत्य हे आहे कि हे बांध कदाचित आपणच घातले आहेत.  कळत नकळत केलेला विचार, बोल, कृती…  ह्याचाच तो परिणाम आहे.

आजच्या युगात ही ‘ Give and Take ’ ह्या नियमावर लोक चालत आहेत.  कदाचित आपण त्याला आज business  (व्यवसाय) म्हणतो.  प्रत्येक संबंधामध्ये मग ते पती-पत्नी, भावंडं, मित्र-मैत्रिणी, वडील-मुलगा, चालक-मालक … असो सगळीकडे मी किती केलं आणि त्या return मध्ये समोरच्या व्यक्तिने किती केलं ह्याचा हिशोब लावला जातो.  कधी-कधी आपण बोलून दाखवत नाहीत पण मनातल्या मनात तो हिशोब चालूच राहतो.  काही वेळा तर आपण स्वतःचीच समजुत घालतो की जाऊ दे कदाचित हे पूर्वजन्माचे देणं असेल जे आज आपण फेडत आहोत.  कळत-नकळत कर्मांचे गूढ लक्षात येते.

ह्या कलियुगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार…  ह्या सर्व गोष्टी सर्रास चालतात.  अनेकानेक बातम्या कानावर पडतात तेंव्हा मनात विचार येतो कि माणसं अशी का वागतात ?  एखाद्यावर खूप प्रेम करतात आणि दुसऱ्यांना जख्मा देतात हा विरोधाभास एकाच व्यक्तीच्या कर्मांमध्ये का दिसून येतो ?  पण ह्याचे कारण ही हेच आहे कि प्रत्येक व्यक्तीबरोबरचा व्यवहार, संबंध एकाच प्रकारचा कसा असू शकतो ?  नाती वेगळी, सगळ्याबरोबरचा अनुभव वेगळा, ऋणानुबंध ही वेगळेच.

कधी-कधी एकटे बसल्यावर हा विचार येतो की एका जन्मामध्ये लहानपणापासून मरेपर्यंत आपण कमीत कमी शंभर लोकांना भेटलो असू.  काही बरोबर थोडा वेळ तर काही बरोबर पूर्ण आयुष्य घालवले असेल.  त्या जन्माचे देणे बाकी राहिले तर दुसऱ्या जन्मामध्ये तीच व्यक्ती दुसऱ्या रूपात आपल्याला भेटतेच, असे करता करता किती जणांबरोबर हे बंधन बांधले आहे. आज आपण mobile वापरतो. facebook किंवा अन्य apps द्वारे आपण अनोळखी व्यक्तींबरोबर ही संबंध जोडत आहोत.  ह्या अनोळखी व्यक्ती जाणता-अजाणता आपल्याला सुख-दुःख देऊन जातात हे पण तर पूर्वजन्माचे फळ आहे.

ऋण अर्थात केलेले उपकार, मदत ज्यांची परतफेड करावी लागते.  हे  ऋणानुबंध कधी-कधी आपल्या कडून जबरदस्तीने का होईना फेडावे लागतात. म्हणून प्रत्येक घटनेपाठी जे कर्मांचे कायदे लागू होत आहेत त्याला समजून प्रेमाने त्या परिस्थितीला हाताळण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यावी.

प्रसिद्ध लेखक एडगर केसी ह्यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की १८ व्या शतकामध्ये एका व्यक्तीच्या पाठीवर व्रण होते, खूप नानाविध उपाय केले गेले परंतु ते व्रण काही गेले नाहीत आणि भयंकर त्रास ही त्यामुळे सहन करावा लागायचा.  एक दिवशी ती व्यक्ती एडगर केसी कडे गेली.  ज्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की ते समोरच्या व्यक्तीच्या पूर्वजन्मांना बघू शकायचे.  जेव्हा एडगर केसी सुप्तावस्थेमध्ये जाऊन त्याच्या पूर्वजन्मांना बघतात तेंव्हा त्यांना दिसून येते की ही व्यक्ती तीन जन्मापूर्वी एका राजाकडे काम करीत असे. राजा खुप निर्दयी होता.  त्याचा नियम होता, त्याला कोणाला ही काही संदेश पाठवायचा असेल तर तो राज्यातल्या एका व्यक्तीला पकडून त्याच्या पाठीवर गरम लोखंडाच्या सळीने तो संदेश लिहायचा आणि पाठवायचा.  ही व्यक्ती त्या जन्मामध्ये त्याला काहीच झाले नाही पण तीन जन्मानंतर त्याच्या स्वत:च्या पाठीवर असे व्रण आले की त्याला उठता, बसता, झोपताना ही त्याचा अतिशय त्रास व्हायचा. सारांश हा कि कळत-नकळत आपणच आपल्यासाठी असे बांध घातले आहेत.  ज्यामुळे जीवनाचा खरा आनंद, सुख आपणास मिळत नाही.

वर्तमानामध्ये  प्रत्येक कर्मावर आपण लक्ष ठेवले, सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर पूर्वजन्माची सारी देणी फेडून जीवनाचा प्रवाह सरळ आणि सुखद करू शकतो.

You may also like

28 Comments